सौरभ कुलश्रेष्ठ
मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यात मुंबईसाठी पाच विभागप्रमुख तर तीन विभाग संघटकाना पक्ष बांधणी करण्यासाठी जबाबदारी सोपविण्यात आली असून मुंबईत पदाधिकारी-संघटना पातळीवर शिंदे गटाचा विस्तार सुरू करण्यात आला आहे.
मुंबईतील शिवसेना पदाधिकारी आणि पक्षाचे नवनियुक्त सचिव आणि आमदार यांच्या उपस्थितीत मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात एक विशेष बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबईसाठी काही नेत्यांकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यात दादर-माहीम वडाळा या विभाग क्रमांक 10 मधून गिरीश धानुरकर यांची विभागप्रमुखपदी तर प्रिया गुरव यांची विभागसंघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर भांडुप विक्रोळी, मुलुंड या विभाग क्रमांक 7 मधून माजी आमदार अशोक पाटील यांची विभागप्रमुखपदी तर राजश्री मांदविलकर यांची विभागसंघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. चेंबूर, सायन, अणुशक्ती नगर विभाग क्रमांक 9 मधून अविनाश राणे यांची विभागप्रमुखपदी तर कला शिंदे यांची विभागसंघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा या विभाग क्रमांक 12 मधून दिलीप नाईक यांना विभागप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली असून विभाग क्रमांक 6 मधून आमदार मंगेश कुडाळकर यांची विभागप्रमुखपदी नियुक्ती झाली आहे.
या सर्व विभागप्रमुख आणि विभाग संघटकाना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली असून त्यांना पक्षविस्ताराचे काम सुरू करण्यास सांगण्यात आले आहे.
याआधी आमदार प्रकाश सुर्वे यांची दहिसर, बोरिवली, मागाठाणे या विभाग क्रमांक 1 या विधानसभेच्या विभागप्रमुखपदी तर आमदार दिलीप लांडे यांची घाटकोपर चांदीवली असल्फा विधानसभा मतदारसंघाच्या विभागप्रमुखपदी तर माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांची विभाग क्रमांक 11 म्हणजेच भायखळा विधानसभा मतदारसंघात विभागप्रमुखपदी नियुक्ती केल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर नव्याने या नियुक्त्या जाहीर झाल्याने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला पक्षविस्तारासाठी नवीन बळ मिळणार आहे.