आपटीबार : हल्ला पुरे!

म्ही कशाला राणेंच्या वाटेवर चालायला जाता. वारंवार टीका कराल तर आणखी सहानुभूती वाढेल त्यांची. उगीच कशाला त्यांचा फायदा करून देता?

eknath shinde attack uddhav thackeray
प्रातिनिधिक फोटो लोकसत्ता

श्री. फ. टाके

काय तुम्ही शिंदे साहेब? अहो किती छळाल तुमच्या माजी नेतृत्वाला. पक्ष फोडून झाली की अडीच वर्षे. आता तरी विसरा त्या जुन्या घडामोडी व नव्याने वाटचाल सुरू करा. तसेही कोकणात मिळाले ना तुम्हाला लोकसभेत यश. मग पुन्हा तिथेच जाऊन उद्धवजींच्या कद्रूपणाची चर्चा कशाला? तुम्ही पाडलेली पक्षातली फूट त्यांच्या कद्रूपणामुळे होती की तुमच्या महत्त्वाकांक्षेमुळे असा प्रश्न कुणी विचारलाच तर काय उत्तर द्याल तुम्ही? तसेही सध्या काँग्रेसच्या नानाभाऊंनी त्यांना हैराण करून सोडलेय. एकेका जागेसाठी लढावे लागत आहे त्यांना तिकडे. अशा दमणुकीत कशाला त्यांच्या वाया गेलेल्या दिल्ली वारीची चर्चा उकरून काढता? तुम्ही साथ सोडली म्हणून जुळवून घेत आहेत ते विरुद्ध विचारांच्या पक्षाशी. करू द्या की त्यांना त्यांचे काम. तुम्ही कशाला जखमेवरची खपली काढता? तुमच्या बंडामुळे शिवसेना जिवंत राहिली अन्यथा लोप पावली असती हे विधान जरा अतिच होते हो! हे मान्य की तुम्हाला पक्षाचे मूळ नाव मिळाले.

हेही वाचा >>> Congress Candidate List 2024 : काँग्रेसच्या पहिल्या यादीत जुनेच चेहरे; पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, वडेट्टीवार यांना उमेदवारी

धनुष्यबाणही हाती आला पण खरी सेना कोणती याचा फैसला व्हायचा आहे ना अद्याप? त्यामुळे २३ नोव्हेंबरपर्यंत कळ सोसा की जरा! आता राणे घराण्यातले कुलदीपकही तुमच्या साथीला आले. जुन्या बंडाचे एक वर्तुळ पूर्ण झाले. याचा आनंद साजरा करा ना! कुणी कुणाचा विश्वासघात केला हे जनतेला ठरवू द्या. लोकसभेत तुमची सरशी झाली. आता विधानसभेतही व्हावी यासाठी हे चिमटे काढणे सुरू आहे का? राजकारणात दीर्घकाळ द्वेष करुन मोठे होता येत नाही हे लक्षात असू द्या. राणे पितापुत्र नेहमी कडक बोलतात त्यांच्याविषयी. त्यांना करू द्या की त्यांचे काम. तुम्ही कशाला राणेंच्या वाटेवर चालायला जाता. वारंवार टीका कराल तर आणखी सहानुभूती वाढेल त्यांची. उगीच कशाला त्यांचा फायदा करून देता?

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Eknath shinde attack uddhav thackeray for harassment in party print politics news zws

First published on: 25-10-2024 at 06:19 IST
Show comments