Eknath Shinde : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीचा महाप्रचंड असा विजय झाला. या निवडणुकीत भाजपाला १३२ जागा मिळाल्या. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सलग तिसऱ्यांदा भाजपा शंभरी पार जाणारा पक्ष ठरला. त्यामुळे देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील ही बाब निश्चित झाली होतीच. ५ डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्याआधी मुख्यमंत्री कोण होणार? यावरुन बऱ्याच विविध चर्चा झाल्या. धुसफूस, रुसवेफुगवे सगळं समोर आलंच. दरम्यान डिसेंबर महिन्यात जे हिवाळी अधिवेशन पार पडलं त्या अधिवेशनात उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ही भेट आणि त्यानंतर आदित्य ठाकरेंनी दोनदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटणं हे एकनाथ शिंदेंना आणि त्यांच्या शिवसेनेला पटलेलं दिसत नाही. एकनाथ शिंदे यांनी केलेलं एक वक्तव्य आणि त्यांच्या एका शिलेदाराने केलेलं वक्तव्य हे बरंच काही सांगून जातं आहे.
एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी काय म्हटलं होतं?
“घटनाबाह्य सरकार, घटनाबाह्य मुख्यमंत्री असं काही लोक मला म्हणत होते. तसंच देवेंद्र फडणवीस यांना फडतूस म्हणणारे, देवेंद्र फडणवीस यांना तू राहशील किंवा मी राहीन म्हणणारे एवढ्या लवकर रंग बदलतील असं वाटलं नव्हतं. सरडाही रंग बदलतो पण अशा प्रकारची नवी जात आताच पाहिली. ज्यांना लोकांनी झिडकारलं, बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा करणाऱ्यांना लोकांनी जागा दाखवून दिली. जनतेने त्यांचा कचरा केला. त्यामुळे कुठेतरी आता तुम लढो हम कपडा संभालते हैं सारखं तुम लढो हम बुके देकर आते है असं चाललं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कुणीही भेटू शकतं. सामान्य माणूस असो किंवा कुठल्या पक्षाचा नेता असो तो भेटू शकतो. मलाही अनेक लोक भेटायचे”
एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची तुलना रंग बदलणाऱ्या सरड्याशी केली आहे. तर दुसरीकडे आदित्य ठाकरेंवरही त्यांनी टीका केली. या टीकेला अवघे चार ते पाच दिवस उलटत नाहीत तोच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने एक बैठक घेतली. या बैठकीत एक ठराव मंजूर करण्यात आला. हा ठराव काय होता ते रामदास कदम यांनी सांगितलं.
रामदास कदम यांनी काय म्हटलं?
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटवण्याचा प्रस्ताव शिवसेनेच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. रामदास कदम म्हणाले, “बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या अध्यक्षपदी राहण्याचा उद्धव ठाकरे यांना कोणताही अधिकार नाही. त्यांची हकालपट्टी केली पाहिजे. मला उद्धव ठाकरे यांना विचारायचं आहे की आता तुमचा स्वाभिमान कुठे गेला आहे? तुम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोललात, अमित शाह यांच्यावर टीका केलीत. देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केलीत आणि आता त्याच देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही भेटत आहात. तुम्ही तुमचा स्वाभिमान गहाण ठेवला आहे का? देवेंद्र फडणवीसांना भेटताना तुम्हाला लाज वाटत नाही का?”
एकनाथ शिंदेंना ठाकरे फडणवीस भेट खटकली आहे का?
एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य आणि त्यानंतर रामदास कदम यांनी शिवसेना बैठकीत झालेला ठराव सांगणं हे दोन्हीही उद्धव ठाकरेंच्या विरोधातलं आहेच. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेला उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट खटकली आहे का? असा प्रश्न निर्माण होतो आहे. कारण मागच्या महिन्यात झालेली ही भेट होती. तसंच आदित्य ठाकरेंनी गेल्या दोन महिन्यांत तीनवेळा देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामागचाच हा राग होता असं म्हणायला वाव आहे. कारण पाच दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे आणि मंगळवारी रामदास कदम हे उद्धव ठाकरेंच्या विरोधात चांगलेच आक्रमक झालेले पाहण्यास मिळाले. ज्यांना विरोध करुन आपण बंड केलं त्याच उद्धव ठाकरेंचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सलोख्याचे राजकीय संबंध निर्माण झाले तर काय होईल? याची चिंता कदाचित एकनाथ शिंदेंना आणि त्यांच्या शिवसेनेला असावी.
उद्धव ठाकरेंमुळे वादाचे नवे अंक?
एकनाथ शिंदे त्यांना मुख्यमंत्री होता न आल्याने नाराजीच्या चर्चा जवळपास दहा दिवस रंगल्या होत्या. तसंच अमित शाह यांच्याबरोबर जी बैठक झाली त्या बैठकीतला त्यांचा हास्य लोप पावलेला चेहराही बरंच काही सांगून जात होता. ५ डिसेंबरच्या दुपारी अमित शाह यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते उपमुख्यमंत्री व्हायला तयार झाले, अशाही राजकीय चर्चा रंगल्या. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट ही काही एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेला रुचल्याचं दिसत नाही. महायुतीत वादाची ठिणगी पडण्यासाठी हे कारण पुरेसं ठरणार का? की आणखी काही वादाचे अंक समोर येणारे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे