मुंबई : ‘मी पुन्हा येईन’, अशी ग्वाही तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ मध्ये विधानसभेत झालेल्या शेवटच्या अधिवेशनातील भाषणात काव्यपंक्ती सादर करून दिली होती. मात्र त्यावर बरीच टीकाटिप्पणी झाली आणि फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. यंदा मात्र विधानसभेच्या शेवटच्या अधिवेशनातील अखेरच्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांपैकी कोणीही ‘मी पुन्हा येईन,’ असा दावा न करता महायुती सत्तेवर येईल, अशी ग्वाही दिली. शिंदे यांनी ‘बोलावे मोजके, खमंग खमके आणि तोलावा शब्द बोलण्यापूर्वी’ या संत तुकारामांच्या ओव्यांचा दाखला दिला. फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या शेवटच्या अधिवेशनात मी पुन्हा येईन, ही कविता सादर केली आणि ती राज्यभरात चांगलीच गाजली. आपल्या सरकारने पाच वर्षांत केलेल्या कामगिरीमुळे फडणवीस यांना पुन्हा सत्तेवर येण्याचा आणि मुख्यमंत्री होण्याचा आत्मविश्वास होता. पण विरोधकांनी या मुद्द्यावरून बरीच टीकाटिप्पणी केली. विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला बहुमत मिळाले खरे, पण महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले. पुन्हा सत्तेवर येण्यासाठी भाजपला अडीच वर्षे लागली. त्यातही फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद मिळू शकले नाही.
हेही वाचा >>> शिवडीत ठाकरेंच्या शिवसेनेत अंतर्गत खदखद
या अनुभवातून आणि नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणूक निकालानंतर शिंदे, फडणवीस आणि पवार या महायुतीतील तीनही नेत्यांनी आपल्या विधिमंडळातील अखेरच्या भाषणात कोणतेही दावे करणे टाळले आणि महायुती सत्तेत येईल, असा विश्वास प्रकट केला. शिंदे यांनी संत तुकारामांच्या ओव्यांचा दाखला देत ‘घासावा शब्द, तासावा शब्द, बोलावे मोजके, खमंग खमके, तोलावा शब्द बोलण्यापूर्वी, बोलावे बरे, बोलावे खरे, कोणाच्याही मनावर पाडू नये चरे, कोणाचाही जात-पात-धर्म काढू नये, शब्दामुळे मंगल, शब्दामुळे दंगल, जिभेवरी ताबा, सर्व सुखदाता’ असे बोल विधानसभेतील भाषणात ऐकविले.
मुख्यमंत्री कोण?
विधानसभा निवडणूक महायुती एकत्रितपणे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढेल, असे भाजपचे वरिष्ठ नेते जाहीरपणे सांगत असले, तरी निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपद शिंदे यांना मिळेल की भाजपचा मुख्यमंत्री होईल, याबाबत भाजप पक्षश्रेष्ठींनी कोणतीही घोषणा केलेली नाही. त्यामुळे राज्यातील नेतेही सावध असून ‘ मी मुख्यमंत्री होईन,’ असा दावा करणे या नेत्यांनी टाळले आहे.