अविनाश पाटील
राजकारण आणि धर्मकारण वेगवेगळे ठेवण्याची गरज व्यक्त होत असली तरी दोहोंची सरमिसळ होत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाच्या व्यासपीठावर आपापसातील मतभेद, राजकारण दूर ठेवणे आवश्यक असताना नाशिक येथील कार्यक्रमात मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन हे एकमेकांशी कायम गुफ्तगू करीत असताना त्यांच्यापासून अंतर राखून बसलेले एकनाथ खडसे यांचे एकाकीपण प्रकर्षाने सर्वांनाच जाणवले. बाहेर मुसळधार पाऊस सुरू असतानाही थंडाव्याऐवजी व्यासपीठावरील एकाकीपणामुळे खडसेंना मात्र ग्रीष्मातील झळांचाच जणूकाही दाह जाणवत होता.
येथील डोंगरे वसतिगृह मैदानात भगवान श्री चक्रधर स्वामी अष्टशताब्दी जन्मोत्सवानिमित्त अखिल भारतीय महानुभाव संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाचे स्वरुप संपूर्णपणे धार्मिक असले तरी दुसरा दिवस उपमुख्यमंत्री फडणवीस, मंत्री महाजन यांसह स्थानिक पातळीवरील भाजपचे आमदार, माजी आमदार यांच्या उपस्थितीमुळे धार्मिक विषयांपेक्षा राजकीयच अधिक ठरला. मुळात या संमेलनाच्या स्वागत समितीत इतरांसह भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप, माजी नगरसेवक दिनकर पाटील, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांचा समावेश असल्याने काही प्रमाणात राजकीय नेत्यांची उपस्थिती अनिवार्यच ठरणार होती. व्यासपीठावर भाजपमधील मंडळींची ठळक उपस्थिती असतानाही लक्ष वेधून घेतले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीने. मान्यवरांनी आपल्या भाषणांमध्ये राजकीय विषयांना फाटा दिला तरीही व्यासपीठ मात्र न बोलताही बरेच काही सांगून गेले. फडणवीस आणि महाजन हे एकमेकांशेजारी बसले असताना खडसे हे मात्र दुसऱ्या टोकाला होते.
कधीकाळी भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेले खडसे हे पक्षांतंर्गत राजकारणात मागे पडले. फडणवीस हे त्यांच्यापेक्षा कितीतरी पुढे निघून गेले. भाजपमध्ये आपली आता कोणतीच पत राखली जात नसल्याचे लक्षात आल्यावर खडसे यांनी राष्ट्रवादीशी घरोबा केला. त्यानंतर फडणवीस, महाजन आणि खडसे यांच्यातील राजकीय आरोप-प्रत्यारोपांना अधिकच धार आली. विशेषत: महाजन तर खडसेंवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. महानुभाव संमेलनानिमित्त हे तिघेही एका व्यासपीठावर आले असताना खरे तर त्या दिवशीची एक घडामोड खडसेंसाठी आनंद घेऊन आली होती. जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक मंडळ बरखास्त करण्याच्या शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयाला औरंगाबाद खंडपीठाने अवैध ठरविले होते. दूध संघ खडसे यांच्या ताब्यात असल्याने त्यांना हा मोठा दिलासा मिळाला असतानाही संमेलनातील व्यासपीठावर उपस्थित खडसेंच्या चेहऱ्यावर त्याचा कोणताही आनंद दिसत नव्हता. अर्थात, व्यासपीठावर एक-दोन अपवाद वगळता सर्व भाजपचीच मंडळी दिसत असल्याचाही तो परिणाम असावा.
खडसे यांनी भाषणात महानुभाव पंथाशी आपल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीपासून कसा संबंध आला, त्याचा दाखला दिला. त्यावेळी महानुभाव पंथाच्या माध्यमातून आपल्या विजयाचा विडा उचलला गेला होता. त्यामुळेच नाथाभाऊ उभा राहिल्याचे नमूद केले. आपल्या मुक्ताईनगर मतदारसंघातील चांगदेव, कनाशी येथे चक्रधर स्वामी येऊन गेल्याचे सांगत त्यांनी अशा गावांना राज्य शासनाने तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची विनंती केली. अद्याप पालकमंत्री जाहीर झालेले नसतानाही त्यांनी भाषणात गिरीश महाजन यांचा नाशिकचे पालकमंत्री असा उल्लेख केल्याने फडणवीसही चकीत झाले. भाषणानंतर खडसे हे फडणवीस यांच्याजवळ गेले आणि त्यांच्या कानात एक-दोन मिनिटे काही सांगून पुन्हा अंतर राखून दूर जाऊन बसले. व्यासपीठावर या दोन नेत्यांमध्ये आलेली हीच काय ती जवळीक. नंतर पुन्हा दोघांची तोंडे दोन दिशांना. अंतर केवळ व्यासपीठावरच नव्हे तर, मनातही असल्याचे दाखविणारी दोघांची कृती, अशा धार्मिक व्यासपीठावर मतभेद बाजूला सारण्याच्या संकेतांना फारकत देणारीच ठरली.