सुहास सरदेशमुख
औरंगाबाद: मराठवाड्यातील आठ जिल्ह्यापैकी जालना जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांना अर्जुन खोतकर यांच्या रुपाने बळेबळे का असेना पण समर्थक मिळाला. बीड जिल्ह्यात सुरेश नवलेही शिंदे गटात सहभागी झाले. असे असले तरी लातूर व परभणी जिल्ह्यात मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून समर्थकांचा शोध अद्याप सुरूच असल्याचे चित्र आहे.
लातूर जिल्ह्यात पूर्वीपासूनच शिवसेनेचे वर्चस्व असे नव्हते. त्यामुळे फाटाफूट होऊन समर्थक मिळण्याची शक्यताच या जिल्ह्यात नाही. परभणी जिल्ह्यात खासदार संजय जाधव आणि डॉ. राहुल पाटील यांनी शिवसेनेत फाटाफूट होऊ दिली नाही. त्यामुळे लातूर व परभणी जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थक शोधावे लागणार आहेत.
लातूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला. गोपीनाथ मुंडे व विलासराव देशमुख यांच्या मैत्रीमुळे शिवराज पाटील चाकुरकर यांना पराभूत करुन रुपाताई पाटील निलंगेकर खासदार झाल्या. तत्पूर्वी लातूरमध्ये भारतीय जनता पक्ष यश मिळविण्यासाठी चाचपडत होता. २०१४ नंतर गणिते बदलत गेली आणि मराठवाड्यात लातूर हेच भाजपचे प्रमुख केंद्र अशी ओळख झाली. त्यामुळे लातूर जिल्ह्यात शिवसेनेचा मागमूसही सापडत नाही. रेल्वेने पाणीपुरवठा केल्यानंतर लातूर महापालिकेतही भाजपची सत्ता होती. शिवसेनेचे राजकीय अस्तित्व अगदी तोंडी लावण्यापुरतेही नव्हते. अशा वातावरणात २०१९ मध्ये लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेने पदरात पाडून घेतली. शिवसेनेचे उमेदवार सचिन देशमुख यांच्यापेक्षा एक लाख २१ हजार ४८२ अधिक मते घेऊन धीरज देशमुख विजयी झाले. या मतदारसंघात ‘नोटा’ ची मते सर्वाधिक म्हणजेच २७ हजार ४४९ एवढी होती. शिवसेना उमेदवारापेक्षा नोटाला मिळालेली मते लक्षणीय होती. त्यामुळे शिवसेनेला लातूरमध्ये कधीच पाय रोवता आले नाहीत. तशी संधीही शिवसेनेच्या नेतृत्वाने स्वीकारली नाही. त्यामुळे लातूर जिल्ह्यात शिवसेनेत फाटाफूट होईल आणि त्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समर्थक मिळतील ही शक्यताच सध्या दिसत नाही. त्यामुळे लातूरमध्ये मुख्यमंत्री आले तरी त्यांच्यामागे भाजप कार्यकर्त्यांचीच गर्दी असेल, असे सध्याचे चित्र आहे.
हेही वाचा… थेट नगराध्यक्ष निवडीमुळे जयंत पाटील सावध, इस्लामपूरमध्ये कोपरा सभांचा धडाका
दुसरीकडे परभणी जिल्ह्यातील शिवसेना एकसंघ राहिली. खरे तर राष्ट्रवादी विरोधातील पहिला आवाज परभणीचे खासदार संजय जाधव यांनी उठवला होता. नवाब मलीक हे परभणीचे पालकमंत्री असताना त्यांनी शिवसेना कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले. पालकमंत्री नवाब मलिक राष्ट्रवादी वाढवत आहेत, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून खासदार जाधव यांनी कळविले होते. परभणी जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीपूर्वी खासदारांनी पक्षांतर करण्याचा इतिहास असतानाही खासदार जाधव यांनी मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच राहणे पसंत केले. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांना परभणी जिल्ह्यातही अद्याप समर्थकांचा शोध घ्यावाच लागणार आहे.
मराठवाड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना औरंगाबाद जिल्ह्यातून सर्वाधिक समर्थन मिळाले. संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार या मंत्र्यासह प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, प्रा. रमेश बोरनारे आदी आमदार शिंदे गटात सहभागी झाले. महापालिकेच्या पातळीवर युवा सेनेचे राज्यस्तरीय नेते राजेंद्र जंजाळ हेही शिंदे समर्थक म्हणून बाहेर पडले. आता त्यांना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख हे पद देण्यात आले आहे. औरंगाबादसह उस्मानाबादमधूनही आमदार ज्ञानराज चौगुले व आमदार तानाजी सावंत यांनी शिवसेनेत बंडखोरी केली. आता जालना व बीड जिल्ह्यातही मुख्यमंत्र्यांना समर्थक मिळाले असले तरी परभणी व लातूरमध्ये मात्र समर्थकांचा शोध सुरूच असल्याचे चित्र राजकीय पटलावर दिसून येत आहे.