बुलढाणा : उद्धव ठाकरेंविरुद्ध बंडात (उठावात) सुरत मार्गे गुवाहाटी पर्यंत साथ देणारे मेहकर आमदार संजय रायमूलकर आणि बुलढाणा आमदार संजय गायकवाड यांना एकनाथ शिंदे यांनी पुन्हा उमेदवारी देण्याचा शब्द दिला होता. त्याचे पालन शिंदे यांनी केले असून शिवसेना शिंदे गटाच्या पहिल्या यादीत वरील दोन्ही विद्यमान आमदारांची नावे आहेत.
महायुतीतील मोठा भाऊ असलेल्या भाजपने १९ ऑक्टोबरला आपल्या पहिल्या यादीमध्ये ९९ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्या पाठोपाठ काल २२ ऑक्टोबरला मध्यरात्रीच्या सुमारास शिवसेना शिंदे गटाच्या ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. यामध्ये बुलढाण्यातूनआमदार संजय गायकवाड तर मेहकर मतदारसंघातून डॉक्टर संजय रायमुलकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या दोघांची उमेदवारी निश्चित होतीच, त्यामुळे अधिकृत घोषणा केवळ औपचारिकताच ठरली होती.
हेही वाचा : Sonam Wangchuck : सोनम वांगचूक यांचे उपोषण मागे; लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळणार?
संघर्ष नंतरच आमदार
दरम्यान सामान्य शिवसैनिक ते विधानसभा आमदार अशी या दोघ्या नेत्यांची राजकीय वाटचाल राहिली आहे. तुलनेने गायकवाड यांना खडतर परिश्रम करावे लागले. मेहकर एकसंघ शिवसेना आणि खासदार प्रतापराव जाधव यांचा बालेकिल्ला राहिल्याने रायमूलकर यांना तयार मैदान मिळाले होते. मेहकर विधानसभा मधून प्रतापराव जाधव यांनी १९९९ ते २००९ अशी आमदारकीची हॅट्ट्रिक केली. ते राज्य मंत्री देखील होते.२००९ मध्ये मेहकर मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव झाला. त्यांनी आपले एकनिष्ठ सरदार रायमूलकर यांना मैदानात उतरविले.त्यांनी पहिल्याच लढतीत राष्ट्रवादी चे साहेबराव सरदार याना पराभूत करून एकतर्फी विजय मिळविला. त्यानंतर २०१४ आणि २०१९ च्या लढतीत त्यांनी काँग्रेसचा पराभव केला. मागील लढतीत तर त्यांनी एक लाखापेक्षा जास्त मते घेत विक्रमी विजय मिळविला. यातुलनेत गायकवाड यांचा आमदारकीचा संघर्ष अधिक खडतर होता. त्यांना तीनदा विजयाने हुलकावणी दिली! चौथ्या लढतीत (२०१९) ते विजयी झाले. शिवसेनेचे तत्कालीन आमदार विजयराज शिंदे यांच्याशी वितुष्ट झाल्यावर त्यांनी शिंदें विरुद्ध १९९९ मध्ये अपक्ष लढत दिली .त्या लढतीत त्यांना जेमतेम ५३६० मते मिळाली . त्याने हिम्मत न हारता त्यांनी छावा संघटनेच्या माध्यमाने बांधणी करून २००४ ची निवडणूक लढवीत ३२ हजार ३५१ मते घेतली. २००९मध्ये ते मैदानात उतरले नाही. २०१४ मधे त्यांनी मनसे कडून निवडणूक लढवीत ३५ हजार ३२४ मते मिळविली. मात्र कालांतराने खासदार जाधव आणि आमदार शिंदे यांच्यात बेबनाव निर्माण झाला, गटबाजी झाली. २०१९ मध्ये शिंदेंना तिकीट नाकारण्यात आले, त्यांच्या जागी खासदार जाधव यांनी ‘मातोश्री’ वर प्रतिष्ठेची बाब केल्याने गायकवाड यांना सेनेची उमेदवारी मिळाली. दीर्घ संघर्षांनंतर गायकवाड यांचे आमदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण झाले. आता ते दुसऱ्यांदा मैदानात उतरणार आहे.
युतीचे पाच उमेदवार ठरले
गेल्या १९ऑक्टोबरला भाजपाने त्यांच्या ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती, त्यामध्ये मातृतिर्थ बुलढाणा जिल्ह्यातून आ .श्वेता महाले, आ .आकाश फुंडकर व आ. संजय कुटे यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्या पाठोपाठ काल २२ ऑक्टोबरला शिवसेना शिंदे गट पक्षाने आपल्या ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये बुलढाणा आणि मेहकरचा समावेश आहे. भाजपचा मलकापूर चा तिढा असून तिथून माजी आमदार चैनसुख संचेती ऐवजी मानिष लखानी यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. सिंदखेड राजा संघात राष्ट्रवादी अजित दादा गटाने उमेदवार घोषित केला नाही.