५० खोके एकदम ओके’ या घोषणेनंतरच्या राजकीय उखाळ्या- पाखाळयातून शिवसेनेतील बंडाळी पूर्वीच्या आर्थिक व्यवहारांवरून आरोप सुरू झाले आहेत. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी एकनाथ शिंदे यांच्याकडून २० लाख रुपये आणले होते असा आराेप पालकमंत्री तथा रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे यांनी केला. तर भमुरे यांनी मंत्री पदाच्या कार्यकाळात ३० टक्क्यांपर्यंत कमीशन मागितले होते, असा चंद्रकांत खैरे यांचा आरोप आहे. तर वैजापूरचे आमदार प्रा. रमेश बोरनारे यांच्या एका वक्तव्यामुळे बंडाळीपूर्वी नगरविकासमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची कार्यशैलीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
हेही वाचा- गुलाबरावांच्या आरोपांच्या दांडपट्ट्यास हिलाल माळींचे आक्रमक उत्तर
हिंदू गर्व गर्जनाच्या मेळाव्या बोलताना प्रा. बोरनारे म्हणाले ‘ माझ्या मुलीच्या लग्नाला जर एकनाथ शिंदे यांनी एक कोटी रुपये दिले असतील तर त्याचा मला अभिमानच आहे. एका गरीब आमदारास त्यांनी मदत केली. तुमच्याकडेही अनेकदा आली मुलगी पण तुम्ही कधी शंभर रुपये तरी हातावर टिकवले का ? ’, असे वक्तव्य वैजापूरचे आमदार प्रा. रमेश बोरनारे यांनी हिंदू गर्जना मेळाव्यात केले. या वक्तव्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरत व गुवाहटी येथे जाण्यापूर्वीच्या कार्यशैलीवर प्रकाश पडू लागला आहे. मुलीच्या लग्नास शिंदे यांनी मदत केल्याची चर्चा गेल्या काही दिवसापासून वैजापूर मतदारसंघात होती. त्यावर आमदार बोरनारे यांनी जाहीर भाष्य केले.
हेही वाचा- पृथ्वीराज चव्हाण यांना दिल्लीचे वेध; राज्यातील कोणत्या नेत्याला संधी मिळणार ?
बोरनारे यांनी मतदारसंघात होणाऱ्या आरोपांना उत्तर देताना शिवसेनेच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, नारंगी- सारंगीमध्ये पाणी आणण्यासाठी प्रयत्न करावेत, रामकृष्ण उपसा सिंचन योजना सुरू करावी तसेच साखर कारखाना सुरू करण्याची मागणी होती. ही सारी कामे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्ण करण्याचे ठरविले आहे. पण ५० खोके एकदम ओके या घोषणेबरोबर आमदार बोरनारे यांच्या मुलीच्या लग्नाला एकनाथ शिंदे यांच्याकडून एक कोटी रुपये घेतल्याची चर्चा सर्वत्र होती. अशी रक्कम घेण्याचा अभिमान आहे, असेही त्यांनी जाहीरपणे सांगितले. एखाद्या गरीब आमदाराला अशी मदत मिळायला हवी, असेही ते बोलण्याच्या ओघात सांगून गेले. वैजापूरच्या विकासात येत्या काळात मोठे बदल होतील, असेही ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे नगरविकास मंत्री म्हणून काम करताना एकनाथ शिंदे यांची नक्की कार्यशैली कशी होती, याचा खुलासा जाहीरपणे पुढे आला आहे.
हेही वाचा- Bharat Jodo Yatra : राहुल गांधींच्या ‘पराठ्या’वरून काँग्रेस आणि सीपीएममध्ये रंगला वाद
दरम्यान मुख्यमंत्री शिंदे समर्थक आमदारांवर आरोप करण्याची एकही संधी न सोडता शिवसेना नेते चंद्रकांत खैरे म्हणाले, ‘त्यांनी अमाप संपत्ती कमावली. जमिनी तर मिळविल्याच शिवाय दारूची दुकानेही पैठण मतदारसंघात घेतली. त्यामुळे त्यांच्या आरोपाकडे लक्ष देण्याची गरज नाही. गेली अनेक वर्षे शिवसेनेतील अनेक कार्यक्रमांचा खर्च एकट्याने केला आहे.’ आरोप- प्रत्यारोपासाठी गर्दीही जमवली जात आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा गर्दी जमविण्यासाठी कुरघोड्यांचा खेळ जिल्हापातळीवर रंगला आहे. मात्र, त्यातून आर्थिक व्यवहारातील अनागोंदी कारभार राजकीय कार्यकर्त्यांमध्ये चर्चेत येऊ लागला आहे.