उमाकांत देशपांडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : भाजपच्या केंद्रीय पक्षसंघटनेत आणि केंद्रीय मंत्रिमंडळात बदलाचे संकेत असून त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणार की दूर ठेवले जाणार, हे महाराष्ट्रातील राजकारणाच्या दृष्टीने महत्वाचे ठरणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात  किमान दोन जागा मिळाव्यात, अशी शिंदे गटाची मागणी अद्याप पूर्ण झाली नसून यावेळी स्थान मिळाल्यास  कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता आहे.

हेही वाचा >>> भाजपमध्ये पंकजा मुंडेच्या विरोधात नवनव्या खेळी

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक १६-१७ जानेवारी नवी दिल्लीत होत असून राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. भाजप गुजरात प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांच्यासह काही नेत्यांना पक्ष संघटनेत आणि केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले जाणाची शक्यता आहे. मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचे प्रतिनिधीत्व पुरेसे असले तरी आणखी एक-दोन खासदारांना संधी मिळण्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर शिवसेनेच्या दोन जागांवर शिंदे गटाने दावा केला असून ही मागणी आता तरी पूर्ण होईल, अशी अपेक्षा त्यांना वाटत आहे.

हेही वाचा >>> महाविकास आघाडीतील जागावाटपासाठी अजित पवारांचा तोडगा

मुख्य मंत्री शिंदे यांच्या दिल्ली भेटीदरम्यान त्यांनी भाजप पक्षश्रेष्ठींशी चर्चा केली असून त्यात या मुद्द्यांचाही समावेश होता, असे सूत्रांनी सांगितले. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल, असे आश्वासन शिंदे गटातील इच्छुकांना दाखविण्यात आले होते. पण ते पूर्ण न झाल्याने शिंदे गटात अस्वस्थता आहे. मंत्रिमंडळात समावेश न झालेले आमदार नाराज होणार आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व नाराज आमदार ठाकरे गटाकडे परत फिरण्याची भीती यामुळे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार टाळण्यात आला.

केंद्रीय मंत्रीपद मिळविण्यासाठीही शिंदे गटातील खासदारांमध्ये चढाओढ आहे. पण मंत्रीपद न मिळालेल्या खासदारांच्या नाराजीचीही भीती आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, तर त्यात शिंदे गटाला स्थान मिळणार की नाही, याबाबत प्रश्न चिन्ह आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde group get a place in the central cabinet expansion print politics news ysh
Show comments