मुंबई : आमदारांच्या फुटीबाबत पक्षांतरबंदी कायदा आहे. शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार बरोबर नसतील तर त्या सर्वांवर अपात्रतेची कारवाई होईल. दोन तृतीयांश आमदार जरी शिंदे यांच्याकडे गेले तरी त्या कायद्यानुसार एकनाथ शिंदे यांच्या गटाला भाजपमध्ये किंवा बच्चू कडू यांच्या प्रहार मध्ये विलीन व्हावे लागेल शिवसेनेचा भगवा त्यांच्या खांद्यावर राहणार नाही असे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी राज्यभरातील सर्व शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख व संपर्कप्रमुखांशी संवाद साधला. त्याप्रसंगी नीलम गोऱ्हे यांनी एकनाथ शिंदे गटाकडून पक्षफुटीबाबत होणाऱ्या प्रचारावर पक्षांतर बंदी कायदा आणि त्याचे नियम यांचा दाखला देत भाष्य केले. एकनाथ शिंदे गट बाहेर गैरसमज पसरवत आहे.
शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आणि पक्ष आपल्या गटाकडे येईल असा प्रचार ते करत आहेत. पण या सर्व गोष्टी पक्षांतर बंदी कायदा दोन तृतीयांश सदस्यांची फूट आणि राजकीय पक्षाची घटना यावर ठरतात. कायदा आणि नियमांच्या पलीकडे काहीही होत नाही. शिवसेनेची एक घटना आहे, जी निवडणूक आयोगाच्या नियमानुसार तयार झाली आहे. त्यामुळे विधिमंडळ पक्ष वेगळा आहे आणि मूळ शिवसेना पक्षसंघटना वेगळी आहे. पक्षांतर बंदी कायद्या नुसार पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले दोन तृतीयांश आमदार कुठले तर त्यांची आमदारकी वाचू शकते. त्या पेक्षा कमी सदस्य असतील तर सर्वांची आमदारकी रद्द होते. अपात्रतेच्या कारवाईचे विधिमंडळाचे अधिकार व नियम आहेत. दोन तृतीयांश आमदार जरी एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेले तरी एकनाथ शिंदे यांना त्या कायद्याप्रमाणे भाजपमध्ये किंवा बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षामध्ये विलीन व्हावे लागेल. म्हणजेच एकनाथ शिंदे गटातील आमदारांच्या खांद्यावर शिवसेनेचा भगवा राहणार नाही, असे नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.