सौरभ कुलश्रेष्ठ
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कारवाई केली किंवा पदावरून दूर हटवले तरी आपण पूर्ण शक्तीने पाठीशी उभे राहू असा संदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांच्यावरील कारवाईची संधी साधत दिला आहे. त्यामुळे पक्ष संघटनेवरील नियंत्रणासाठी शिंदे गट आक्रमक झाला असून त्यावरून शिंदे गट आणि शिवसेनेत आगामी काळात मोठा राजकीय संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.
हेही वाचा- द्रौपदी मुर्मू गुरुवारी मुंबईत; ठाकरे यांना निमंत्रण नाही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात आमदार संतोष बांगर सामील झाल्यानंतर शिवसेनेने हिंगोली जिल्हाप्रमुख पदावरून बांगर यांना हटविले. बांगर यांनी त्या निर्णयास आव्हान देत आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह मुंबईत येऊन शक्तिप्रदर्शन केले. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून बंडखोर आमदारांच्या शिवसेना पक्ष संघटनेवरील नियंत्रणासाठी ही आपण पाठीशी उभारणार असल्याचे व प्रसंगी आक्रमक भूमिका घेणार असल्याचे संकेत दिले.
हिंगोली जिल्हाप्रमुख म्हणून तुम्हीच काम करायचे. इतके लोक पाठीशी असताना दुसरा कसा काम करू शकेल, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संतोष बांगर यांचे मनोधैर्य वाढवले. पुढील अडीच वर्षांत एकाही शिवसैनिकाच्या केसाला हात लावण्याची हिंमत कोणाची होणार नाही. आम्ही कोणाच्या वाटेला जात नाही. पण कोणी शिवसैनिकाच्या वाटेला गेला तर आम्ही सोडत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले.
हेही वाचा– नामांतरप्रश्नी काँग्रेस, राष्ट्रवादीची कोंडी; भाजप टीकेच्या रिंगणाबाहेर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या गटातील कोणत्याही आमदाराची व त्याच्या समर्थकांची पक्ष संघटनेतील पदांवरून हकालपट्टी केली तरी आता मुख्यमंत्री शिंदे यांचे पाठबळ असल्याने आपल्या राजकीय भवितव्यास धोका नाही असा विश्वास शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण करून त्यांना आपल्याकडे आकर्षित करण्याची शिंदे गटाची ही रणनीती आहे. त्यातून आता शिंदे गट आणि शिवसेनेतील नवनियुक्त पदाधिकारी यांच्यात राज्यात ठिकठिकाणी राजकीय संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.