प्रबोध देशपांडे
अकोला : अकोला शिवसेनेतील माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांचा मोठा गट फोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गळाला लावला आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी दोन ट्विट करून गोपीकिशन बाजोरिया यांचे स्वागत करण्यासोबतच अकोला विधानसभेत शिवसेनेचा भगवा पुन्हा डौलाने फडकावा, असे सूचक आवाहन केले. अकोला पश्चिम व पूर्व विधानसभा मतदारसंघात गत अनेक वर्षांपासून भाजपचे आमदार प्रतिनिधित्व करीत आहेत. एकनाथ शिंदे यांनी ट्विटद्वारे दिलेल्या संकेतानुसार शिंदे गट आता भाजपच्या मतदारसंघांवर दावेदारी ठोकणार का, या प्रश्नाने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
अकोल्यातून शिंदे गटाला सक्षम समर्थकांची गरज असताना शिवसेनेत नाराज असलेले माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यांचे पुत्र हिंगोली-परभणी स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार विप्लव बाजोरिया हे देखील त्यांच्यासोबत शिंदे गटात सहभागी झाले आहेत. मुंबईत काल सायंकाळी गोपीकिशन बाजोरिया, विप्लव बाजोरिया, विठ्ठल सरप यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक शिंदे गटात सहभागी झाले. याविषयी एकनाथ शिंदे यांनी दोन ट्विट केले आहेत. ‘माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया व त्यांच्या असंख्य समर्थकांनी युती सरकारला पाठिंबा जाहीर केला. त्यांचे स्वागत करत अकोल्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी मदत करू, असे आश्वस्त केले. अकोला विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा डौलात, फडकावा यासाठी आतापासूनच कामाला लागावे असे आवाहन केले.’ असे ट्विटमध्ये नमूद आहे. एकनाथ शिंदे यांचे हे ट्विट आता चर्चेचा विषय ठरले आहे. संपर्क प्रमुख म्हणून गोपीकिशन बाजोरियांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्यावर मोठी जबाबदारी राहणार आहे.
हेही वाचा… लोणार सरोवराच्या विकासाला चालना, शिंदे समर्थक आमदार-खासदारांचे राजकीय वजन वाढणार
अकोल्याचा समावेश अकोला पश्चिम व अकोला पूर्व विधानसभा मतदासंघात होतो. अकोला पश्चिम मतदारसंघात गेल्या सलग सहा विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचे गोवर्धन शर्मा विजयी झाले आहेत. भाजपचा अभेद्य गड म्हणून हा मतदारसंघ ओळखला जातो. या मतदारसंघातून शिवसेना कधीही निवडून आलेली नाही. सध्याचा अकोला पूर्व व पूर्वीचा बोरगाव मंजू मतदारसंघ भाजप-शिवसेना युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला होता. २०१४ मध्ये युती तुटल्यावर भाजपचे आ. रणधीर सावरकर विजयी झाले. त्यावेळी शिवसेना स्वबळावर लढली त्यावेळेस गोपीकिशन बाजोरिया यांनीच अकोला पूर्वमधून निवडणूक लढली होती. मात्र, त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतही आ. रणधीर सावरकरांनी मोठ्या मताधिक्याने जागा कायम राखली. त्यामुळे या मतदारसंघावरही भाजपने आता आपली मजबूत पकड केली. एकनाथ शिंदे यांनी अकोला विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी केलेले सूचक विधान नेमके कुठल्या मतदारसंघासाठी केले, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी भाजपच्या मतदारसंघावरच शिंदे गटाला दावा ठोकावा लागेल. बदलेल्या समीकरणांमुळे आगामी काळात भाजप व शिंदे गटातच संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचा… आरक्षणामुळे प्रस्थापितांची कोंडी, जिल्हा परिषद निवडणुकीचे रायगडकरांना वेध
बाळापूर राहणार लक्ष्य
युतीमध्ये बाळापूरमधून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आ. नितीन देशमुख निवडून आले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरुवातीला ते सुरत व गुवाहटीला गेले होते. मात्र, नंतर ते उद्धव ठाकरेंकडे परतले. अकोला जिल्ह्यातील राजकारणात गोपीकिशन बाजोरिया व आ. नितीन देशमुख एकमेकांचे विरोधक समजले जातात. एकनाथ शिंदे यांनी बाजोरियांवरच मोठी जबाबदारी दिली. त्यामुळे आता शिंदे गटाकडून अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघाला लक्ष्य करण्याची शक्यता आहे.
‘भाजपची त्यागाची भूमिका’
एकनाथ शिंदे यांच्या ट्विटनंतर निर्माण झालेल्या राजकीय चर्चेवर काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ता डॉ. सुधीर ढोणे यांनी खोचक टोला लगावला आहे. भाजपची त्यागाची भूमिका राहिली आहे. त्यामुळे शिंदे गटासाठी भाजप आपले मतदारसंघ देखील सोडतील, अशी उपरोधिक टीका त्यांनी केली आहे.