निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्यानंतर येथे शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता आहे. खासदार, आमदारांनी आम्ही ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ यांच्यासोबत आहोत याचा पुनरुच्चार केला असला तरी ‘धनुष्यबाण’ या पक्षचिन्हाशिवाय या पुढील निवडणुका कशा लढवायच्या, असा शिवसैनिकांपुढे पेच आहे. दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला अजूनही जिल्ह्यात पाय रोवण्यासाठी जागा शोधावी लागत आहे. शिवसेनेच्या परंपरागत बालेकिल्ल्यात आपल्याला शिरकाव करता येत नसल्याची सल एकनाथ शिंदे गटाला आहे.
गेल्या आठवड्यात येथे पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला येणाऱ्या मुख्यमंत्री शिंदे यांचा दौरा अचानक रद्द झाल्याने त्याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले गेले. शहरात सर्वत्र मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे ‘होर्डिंग्ज’ लागले होते. हा दौरा रद्द झाल्याने शिंदे यांच्या शिवसेनेला प्रासंगिक वातावरण निर्मितीची संधी मात्र हुकली. मुख्यमंत्र्यांचा दौरा झाला असता तर राजकीय पटलावर का होईना पण जिल्ह्यात शिवसेनेच्या दोन गटांतील राजकीय संघर्ष पहावयास मिळाला असता. दोन्ही बाजूंनी राजकीय विधाने व्यक्त झाली असती, पण यातले काहीच घडले नाही.
हेही वाचा – राज्यसभेत गोंधळ घालणं पडलं महागात; १२ खासदारांना हक्कभंगाची नोटीस
निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर पुन्हा एकदा जिल्ह्यात ‘धनुष्यबाण’ चर्चेत आला. धनुष्यबाणाशिवाय निवडणुकीला सामोरे जाण्याची मानसिकता शिवसैनिकांमध्ये कितपत राहील, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये या निर्णयाचा कार्यकर्त्यांच्या आत्मविश्वासावर किती परिणाम होईल, हे प्रश्न अगदीच तोंडावर आले आहेत. विशेषतः ज्या जिल्ह्याने सेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळवून दिली त्या जिल्ह्यात शिवसैनिकांमध्ये मोठी अस्वस्थता पाहायला मिळत आहे. जे पक्षचिन्ह तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी कष्ट उपसले ते गमावण्याची पाळी आल्याने कार्यकर्ते सैरभर झाले आहेत.
नव्वदच्या दशकात मराठवाड्यात ग्रामीण भागात शिवसेनेची लाट आल्यानंतर काँग्रेसचे पारंपरिक सत्तेचे अनेक गड ढासळले. त्यात परभणीचाही समावेश होतो. तरुणाईच्या बळावर शिवसेनेने राजकारणातली ही उलथापालथ केली. १९८९ च्या निवडणुकीत अशोक देशमुख यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. राजकीय पक्ष म्हणून शिवसेनेला मान्यता नव्हती त्यामुळे देशमुख यांची त्यावेळची उमेदवारी ही अपक्षच होती. काँग्रेसच्या रामराव लोणीकर यांचा पराभव करून मताधिक्याने निवडून आले. अशोक देशमुख आणि विलास गुंडेवार (हिंगोली) यांच्या विजयानेच शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली. शिवसेनेची निवडणूक निशाणी असलेला ‘धनुष्यबाण’ हाच पुढे या पक्षाला राज्याच्या सत्तेत वाटेकरी मिळवून देणारा ठरला. त्या विजयाची नांदी परभणीने घातली आहे.
१९९१ च्या लोकसभा निवडणुकीत श्री. देशमुख हे शिवसेनेच्या अधिकृत चिन्हावर निवडून आले. पुढे त्यांनी पक्षाशी द्रोह केला. त्यांना १९९६ च्या निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारीही मिळाली. त्यांच्याविरुद्ध सुरेश जाधव या त्यावेळच्या अतिशय सामान्य कार्यकर्त्याला शिवसेनेने उमेदवारी दिली. तेव्हा केवळ गंगाखेडचे तालुकाप्रमुख हीच त्यांची ओळख होती. त्यांनी अशोक देशमुख यांचा दारुण पराभव केला. पुढे सातत्याने शिवसेनेने परभणी लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला. लोकसभेच्या १९९८ च्या मुदतपूर्व निवडणुकीत काँग्रेसने सुरेश वरपूडकर यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी शिवसेनेच्या सुरेश जाधव यांचा सरळ लढतीत पराभव केला. एवढा एकमेव असा पराभव अपवादात्मकरीत्या शिवसेनेच्या वाट्याला आला. अर्थात निवडून आलेले खासदार पक्षद्रोह करतात अशी या मतदारसंघातील शिवसेनेची परंपरा आहे.
हेही वाचा – वायएस शर्मिला तेलंगणा पोलिसांच्या ताब्यात; पदयात्रेची परवानगीही केली रद्द
निवडून आलेल्या खासदारांनी शिवसेनेशी द्रोह करण्याची परंपरा गेल्या निवडणुकीपासून खंडित झाली. २०१४ साली लोकसभा निवडणुकीत संजय जाधव यांनी विजय संपादन केल्यानंतर पुन्हा २०१९ मध्ये पक्षाने त्यांनाच उमेदवारी दिली आणि या निवडणुकीतही ते विजयी झाले. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाचा परभणी जिल्ह्यात फारसा परिणाम झाला नाही. आज जिल्ह्यात खासदार संजय जाधव आणि आमदार राहुल पाटील हे दोघेही मोठे नेते उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहेत. महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांपैकीही कोणीच अद्याप तरी शिंदे यांना साथ दिलेली नाही.
परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि याच जिल्ह्याने शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळवून दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर अलोट प्रेम करणारा हा जिल्हा आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाला भाजपाच्या कृपेने पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळाले तरी जनाधार त्यांच्यासोबत नाही. आपल्याशिवाय एकही हिंदुत्ववादी पक्ष शिल्लक राहू नये ही भारतीय जनता पक्षाची नीती आहे. आज शिवसेनेला राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला या पापाची फळे भोगावे लागतील, असे परभणीचे खासदार संजय जाधव म्हणाले.
केंद्र आणि राज्य सरकार यंत्रणांचा दुरुपयोग करत आहे. ही हुकूमशाही कदापी खपवून घेतली जाणार नाही. धनुष्यबाण चिन्ह हिरावून घेतले गेले असले तरी निष्ठावान शिवसैनिकांसह सर्वसामान्य नागरीकांच्या हृदयात धनुष्यबाण कायम आहे़. परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, येथील शिवसैनिक हे ठाकरे कुटुंबावर प्रेम करणारे आहेत. यात तसूभरही फरक पडणार नाही. देशातील सर्व महत्त्वाच्या स्वायत्त संस्था या केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर काम करत आहेत. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम या सरकारने केले आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीकडे गहाण ठेवलेल्या राज्य सरकारला जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असे परभणीचे आमदार राहुल पाटील म्हणाले.