महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात झालेली भेट राजकीय नव्हती वगैरे असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं. मात्र या भेटीचे राजकीय अर्थ निघतातच हे महाराष्ट्रालाही माहीत आहे. जेव्हा दोन महत्त्वाचे नेते भेटतात तेव्हा राजकीय चर्चा होणार नाही यावर आता कुणीही विश्वास ठेवू शकत नाही. शिवाय २०१९ नंतर महाराष्ट्राचं राजकारण इतकं ढवळून निघालं आहे की कधी काय होईल हे सांगता येणं खरंच कठीण आहे. या सगळ्या गोष्टी विचारांत घेतल्या तर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंची भेट महत्त्वाची ठरली आहे. काय शक्यता असू शकतात चला आपण जाणून घेऊ.

अमित शाह यांची आणि एकनाथ शिंदेंची मागील आठवड्यात भेट

मागच्या आठवड्यात अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली तेव्हा महायुतीत ऑल इज नॉट वेल असल्याच्या चर्चा रंगल्या. पण आमच्या धुसफूस नाही तर सगळं खुशखुश आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले. मात्र मंगळवारी रात्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहचले आणि दोघांनी दीड तास चर्चा केली. या भेटीकडे साधीसुधी अनौपचारिक भेट म्हणून नक्कीच पाहता येणार नाही. कारण २०२२ पासून प्रलंबित असलेल्या महापालिका निवडणुका या वर्षी होणार आहेत. त्या अनुषंगाने ही भेट महत्त्वाची मानली जाते आहे. मनसेकडून आणि एकनाथ शिंदेकडून हे सांगितलं गेलं आहे की ही भेट बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणी जागवल्या त्यासंदर्भातलीच होती आणि बऱ्याच दिवसांपासून भेटायचं होतं त्यामुळे ही भेट झाली. मात्र थोडंसं मागे गेलं तर या भेटीचे अर्थ लावता येतात.

विधानसभा निवडणुकींच्या वेळी काय घडलं होतं?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी राज ठाकरे हे एकनाथ शिंदेंमुळे महायुतीचा भाग होऊ शकले नाहीत आणि नाराज झाले अशा चर्चा होत्या. कारण या दोघांनाही नाशिक आणि मुंबईतल्या ज्या जागा हव्या होत्या त्यावरुन संघर्ष झाला. खासकरुन अमित ठाकरे ज्या माहीम मतदारसंघातून उभे होते तिथून शिवसेना (एकनाथ शिंदे) उमेदवार सदा सरवणकर यांनी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे अमित ठाकरेंचा पहिल्याच निवडणुकीत पराभव झाला. सदा सरवणकर यांनी जी भूमिका घेतली त्यामुळे राज ठाकरे एकनाथ शिंदेंविरोधात आक्रमक झाल्याचं पाहण्यास मिळालं. शिवसेना हे नाव आणि चिन्ह घ्यायला नको होतं, इथपासून पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील असंही विधान राज ठाकरेंनी केलं. त्यामुळे या दोघांमधले संबंध ताणले गेले होते.

DCM Eknath Shinde Meets Raj Thackeray
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची भेट (फोटो-एकनाथ शिंदे, एक्स पेज)

शिवसेना मनसे युती होईल का?

विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर महायुतीची सत्ता आली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झाले. आता महापालिका निवडणुकांची प्रतीक्षा आहे. या निवडणुकांमध्ये विधानसभेप्रमाणे संघर्ष टाळले गेले पाहिजेत म्हणून ही भेट झाल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे आणि मनसेची दिलजमाई झाल्यास महापालिका निवडणुकींच्या वेळी जंबो महायुती निर्माण होईल आणि उद्धव ठाकरेंसमोर मोठं आव्हान निर्माण होईल. त्या अनुषंगाने एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात दिलजमाई झाली तर महापालिका निवडणुका सुकर होतील. या सगळ्या गोष्टी या भेटीमागे दडलेल्या असू शकतात.

ताणलेले गेलेले राजकीय संबंध पूर्ववत करण्यासाठी भेट?

एका वरिष्ठ भाजपा नेत्याने इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंशी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाली असावी. मात्र त्याचे तपशील सध्या सांगता येणार नाहीत. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात ही चर्चा झालेली असू शकते. मनसेने मराठीचा मुद्दा उचलून धरला आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत मनसेची भूमिका निर्णायक ठरू शकते. या पार्श्वभूमीवरही या भेटीकडे पाहिलं जातं आहे. राज ठाकरेंशी जे काही मतभेद विधानसभेच्या वेळी निर्माण झाले होते ते मिटवण्यासाठीही ही भेट घडली असावी अशी शक्यता शिवसेनेच्या सूत्रांनी वर्तवली आहे. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे हे दोघंही शिवसेनेसाठी झटलेले नेते आहेत. उद्धव ठाकरेंमुळे दोघंही दुखावले आहेत. त्यामुळे आता महापालिका निवडणुकीच्या वेळी उद्धव ठाकरेंना आव्हान द्यायचं असेल तर एकत्र येणं चांगलं हा मुद्दाही चर्चेत निघालेला असू शकतो. एकनाथ शिंदे यांनी अनपौचारिक भेट म्हणत राजकीय चर्चा झाल्याचं नाकारलं आहे. आता येत्या काळात नेमकं काय घडलं राज ठाकरे महायुतीत येतील का? हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे.