नागपर: “ माझ्याच पक्षातील नेते आणि भाजप नेत्यांनी माझ्या विरुद्धचा प्रतिस्पर्धी पक्षातील उमेदवार ठरवण्याचे काम केले, त्यामुळे माझे मताधक्य कमी झाले,” असा आरोप शिवसेना शिंदे गटाचे बुलढाण्याचे नवनिर्वाचित आमदार संजय गायकवाड यांनी केला. तसेच “ मध्य नागपूरमधून तिकीट देण्यासाठी काँग्रेस नेत्याने पैशाची मागणी केली होती व ही रक्कम देण्याची तयारी भाजप नेत्याने दर्शवली होती,” असा सनसणीखेज आरोप मध्य नागपूरमधून पराभूत काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांनी केला. वरील दोन्ही नेत्यांच्या आरोपाचा विचार केला तर त्यातून एक प्रश्न निर्माण होतो. तो म्हणजे स्वपक्षातीलच नव्हे तर प्रतिस्पर्धी पक्षाचा उमेदवार कोण असावा हे सुद्धा सत्तेतील पक्ष ठरवू लागले का ? .

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गायकवाड आणि शेळके यांच्या आरोपामुळे वेगळ्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.बुलढाण्यात शिवसेना शिंदे गटाचे संजय गायकवाड विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाच्या जयश्री शेळके यांच्यात अटीतटीची लढत झाली. गायकवाड यांचा निसटता विजय झाला. मोठ्या मताधिक्याने विजयी होण्याचा त्यांचा संकल्प त्यांच्या विरुद्ध प्रथमच निवडणूक रिंगणात उतरलेल्या जयश्री शेळके यांनी दिलेल्या चुरशीच्या लढतीमुळे फोल ठरला. शेळके यांना ऐनवेळी उमेदवारी जाहीर झाली होती. हा धागा पकडून गायकवाड यांनी “ माझ्याविरुद्ध जयश्री शेळकेंना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळावी म्हणून स्वपक्षीय नेते व भाजप नेत्यांनी ठाकरे गटातील नेत्यांशी संपर्क साधला होता, असा थेट आरोप केला. माध्यमांमध्ये हे वृत्त ठळकपणे झळकले. पण त्यावर भाजपकडून कोणताही खुलासा आला नाही, सेनेच्या नेत्याने केलेला खुलासा उपरोधिक स्वरुपाचा होता. त्यामुळे गायकवाड यांनी केलेल्या आरोपात तत्थ्य आहे का ? असा प्रश्न पडतो.

हेही वाचा >>>कोण आहे ‘मतदारांच्या मनातील आमदार’…साकोलीतील फलकाची जोरदार चर्चा

अशाच प्रकारचा आरोप नागपूरमध्ये काँग्रेसच्या पराभूत उमेदवाराने केला.मध्य नागपूरमधून काँग्रेसचे बंटी शेळके यांचा दुसऱ्यांदा पराभव झाला. भाजपचे विधान परिषद सदस्य प्रवीण दटके यांनी त्यांचा पराभव केला. निवडणुकीनंतर शेळके यांनी प्रदेश नेतृत्वावर संताप व्यक्त करताना त्यांच्याऐवजी इतराला उमेदवारी मिळावी म्हणून काँग्रेस नेत्याला पैसे देण्याची तजवीज स्थानिक भाजप नेत्याने केली होती. पण ते शक्य झाले नाही, कारण दिल्लीतून उमेदवारी निश्चित झाली, असा गौप्यस्फोट केला. याचा दुसरा अर्थ शेळकेंच्या ऐवजी सोयीचा उमेदवार उभा राहावा, असा प्रयत्न प्रतिस्पर्धी पक्षाकडून झाला असा होतो. याचाही खुलासा अद्याप संबंधित पक्षाने केला नाही हे येथे उल्लेखनीय. प्रदेश काँग्रेसने बंटी शेळके यांना नोटीस बजावली आहे.

हेही वाचा >>>शिवशाही बस अपघात प्रकरणी धक्कादायक माहिती; चालकाने या पूर्वी ५ वेळा …

सामान्यपणे प्रत्येक पक्षात नेत्याचे पक्षांतर्गत विरोधक असतात. निवडणुकीत त्याला पाडण्यासाठी विरोधी उमेदवाराला मदत करणे, त्याला रसद पोहचवणे असे प्रकार केले जातात. यात नावीन्य नाही. मात्र प्रतिस्पर्धी पक्षाचा उमेदवारही ठरवण्याचे आरोप प्रथमच या निवडणुकीच्या निमित्ताने झाले आहेत. विशेष म्हणजे सत्ताधारी (शिवसेना) पक्षाच्या आमदाराने हे आरोप करावे , हे महत्वाचे आहे. एकीकडे ईव्हीएमवर संशय घेतला जात असताना दुसरीकडे सत्तापक्षच विरोधकांचे उमेदवारही ठरवत असेल तर निवडणुकीचा फार्स कशाला ? असा प्रश्न या निमित्ताने विचारला जात आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde shivsena mla sanjay gaikwad allegations on bjp senior leaders in vidhan sabha election print politics news amy