छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी विरोधाचा कौल ‘ मुस्लिम- दलित आणि मराठा’ मतांच्या बेरजेतून व्यक्त होत असल्याचे लक्षात आल्यानंतर ‘ शिवसेने’ बरोबर आपला प्रासंगिक करार आहे, असे वक्तव्य करणारे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांना संभाजीनगरच्या पालकमंत्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावरुन विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मंत्री अतुल सावे यांना पालकमंत्री करावे ही निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांची मागणी डावलण्यात आली. त्यामुळे आता भाजप पदाधिकाऱ्यांच्या शब्दाला सत्ताकारणात किंमत उरली नसल्याची टीका त्यांनी समाज माध्यमांवर केली आहे.

कृषी मंत्री म्हणून ‘ वादग्रस्त’ ठरलेल्या मंत्री सत्तार यांना पणन व अल्पसंख्याकही खाती देण्यात आली. हे पद मिळाल्यापासून लोकसभा निवडणुकीतही मंत्री सत्तार काहीसे मागच्या बाकावर ढकलेले गेले. याच काळात ते आजारीही होते. मात्र, जालना लोकसभा निवडणुकीमध्ये रावसाहेब दानवे यांचा पराभव झाल्यानंतर त्यांची राजकीय वक्तव्ये पुन्हा चर्चेत येऊ लागली. लोकसभा निवडणुकीनंतर पालकमंत्री पदी संदीपान भुमरे यांनीच रहावे अशी तजवीज करण्यात आली होती. मात्र, त्यांना आता राजीनामा द्यावा लागल्याने संभाजीनगरच्या पालकमंत्री पदी अतुल सावे की अब्दुल सत्तार असा प्रश्न विचारला जात होता. ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे या शर्यतीमध्ये माध्यमांमध्ये चर्चेत नव्हते. मात्र, भाजपच्या एका गटाने आचारसंहिता लागेपर्यंत सावे यांना मंत्री पद द्यावे अशी मागणी केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत विचार करण्याचे आश्वासन कार्यकर्त्यांना दिले होते. मात्र, आता मंत्री सत्तार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा : “आम्ही तुम्हाला का घाबरायचं?”; बसपाच्या नेत्याच्या हत्येनंतर दिग्दर्शक पा रंजीत काढलेल्या मोर्चामुळे राजकारण तापले

विविध न्यायालयीन प्रकरणांमध्ये ताशेरे ओढल्यानंतर आणि कार्यशैलीवर सातत्याने प्रश्नचिन्ह निर्माण होऊनही सत्तार यांच्याकडे पालकमंत्री पदाची धुरा सोपविण्यात आली आहे. संभाजीनगर जिल्ह्याच्या वार्षिक आराखड्यास मंजुरी देताना तरतुदी बाबतचे निर्णय आता मंत्री सत्तार यांच्या हातात असणार आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वीच्या विकास आराखड्याच्या मंजुरीवरुन आता वाद होऊ शकतात, असे सांगण्यात येत आहे. सत्तार यांच्यामुळे सिल्लोडचे पाकिस्तान झाले आहे, असे वादग्रस्त वक्तव्य माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले होते. त्यामुळे सत्तार यांना भाजप आता कडाडून विरोध करेल असे चित्र राजकीय पटलावर निर्माण झालेले असताना सत्तार यांची पालकमंत्री पदी नियुक्ती करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे पडसाद उमटू शकतात, असे सांगण्यात येत आहे.