नागपूर : विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या दणदणीत यशाचे श्रेय कोण्या एका पक्षाचे किंवा त्या पक्षाच्या नेत्याचे नव्हे तर आपण मुख्यमंत्री म्हणून अडिच वर्षांत घेतलेल्या धडाकेबाज निर्णयाला आणि राबवलेल्या योजनांना आहे, असे स्पष्ट शब्दात सांगत माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीच्या यशाचे श्रेय एकट्याने घेऊ पाहणाऱ्या भाजपला अप्रत्यक्षरित्या सूचित केले.
विधिमंडळाच्या अधिवेशनानिमित्त संपूर्ण नागपूर शहर नेत्यांच्या फलकांनी गजबजले आहेत. त्यात बहुतांश फलक हे ‘भाजप ने लावलेले देवाभाऊ’चे आहेत. यातून निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशाचे श्रेय एकच पक्ष घेत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत शिंदे यांनी हीच बाब वेगळ्या पद्धतीने मांडल्याचे दिसून आले.
हेही वाचा – राणा दाम्पत्याच्या महत्वाकांक्षेला राजकीय लगाम
फडणवीस यांचे ते पुन्हा मुख्यमंत्री झाले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतानाच शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेले यश कसे सामूहिक आहे व यासाठी आपल्या कार्यकाळात घेतलेले धडाकेबाज निर्णय कसे कारणीभूत ठरले हे सांगण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. अधिवेशन विदर्भात होत असल्याने शिंदे यांनी ते मुख्यमंत्री असताना या भागासाठी कायकाय केले याची जंत्रीच सादर केली.
गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागडमध्ये लोहखाणीचा उल्लेख केला, त्याच प्रमाणे धान उत्पादक शेतकरी, कापूस उत्पादक शेतकरी यांना केलेल्या मदतीचाही हवाला दिला. मराठीला अजात भाषेचा दर्जा मिळवून दिला हेसुद्धा त्यांनी आवर्जून सांगितले. मुख्यमंत्री म्हणून ८५० हून अधिक निर्णय घेतले हे सांगण्यासही शिंदे विसरले नाहीत. धडाकेबाज काम केल्यानेच जनतेने मोठा जनादेश दिला, असे सांगून शिंदे यांनी हा विजय कोण्या एकाचा नव्हे तर सामूहिक प्रयत्नांचा असल्याचे सुतोवाच केले. विशेष म्हणजे फडणवीस यांच्या उपस्थितीत हे सांगणे याला राजकीय अर्थ आहे, त्यामुळेच शिंदे यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
साधारणपणे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या पत्रकार परिषदेत सरकारीपक्षाकडून त्यांनी केलेल्या कामगिरीची प्रामुख्याने माहिती दिली जाते. याचाच आधार घेऊन शिंदे यांनी ते मुख्यमंत्री असताना केलेल्या कामांची उजळणी केली व त्याची सांगड महायुतीला मिळालेल्या यशाशी घातली. मात्र ते करताना त्यांनी त्यांच्यावर वरचढ होण्याचा प्रयत्न करणाऱ्या मित्रपक्षाचेही कान टोचले. हे येथे उल्लेखनीय.
उपकाराची परतफेड
मी मुख्यमंत्री झाल्यावर फडणवीस माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले होते. आता ते मुख्यमंत्री आहेत, आणि मी उपमुख्यमंत्री, त्यामुळे मी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार, असे शिंदे यांनी सांगून त्यांच्यात आणि फडणवीस यांच्यात दुरावा निर्माण झाल्याच्या वृत्ताचा इन्कार केला. मात्र देहबोलीतून तो दिसून येत नव्हता. पत्रकार परिषदेतील आसन व्यवस्था या दोघांमधील दुरावा अधिक वाढवणारी होती तर फडणवीस-पवार हे परस्परांना खेटून बसले होते. पत्रकार परिषदेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रथम आले, काहीवेळाने शिंदे आले.