नाशिक : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा १३ फेब्रुवारी रोजी शहरात आभार दौरा असताना स्थानिक पातळीवर शिवसेनेत (एकनाथ शिंदे) गटबाजी पुन्हा उफाळून आली आहे. या दौऱ्याची पूर्वतयारी आणि नियोजनाची वेगवेगळ्या गटांनी स्वतंत्रपणे तयारी चालविल्याने शिवसैनिक संभ्रमात पडले आहेत.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर शिंदे गटात अंतर्गत धुसफूस सुरू झाली. एकसंघ शिवसेनेतून काही जण प्रारंभीच शिंदे गटात दाखल झाले होते. त्यातील काहींची महत्वाच्या संघटनात्मक पदावर वर्णी लागली. स्थानिक पातळीवर पक्षाची सूत्रे त्यांच्या हाती आली. कालांतराने शिवसेनेतून (उध्दव ठाकरे) मातब्बर पदाधिकारी व माजी नगरसेवकांचा ओघ वाढला. पक्षाची ताकद वाढविणाऱ्यांना शिंदे गटात महत्वाची पदे बहाल करण्यात आली. या घटनाक्रमात संघटनेवर वर्चस्व राखण्याच्या स्पर्धेतून परस्परांना शह देण्याची धडपड सुरू झाल्याचे सांगितले जाते. पक्षीय कार्यक्रमांत परस्परांच्या नावांचा उल्लेख टाळला जातो, परस्परांच्या बैठका वा कार्यक्रमांपासून अंतर राखले जाते.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला विजयी केल्याबद्दल जनतेचे आभार मानण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभार दौरा यात्रा सुरू केली आहे. त्या अंतर्गत १३ फेब्रुवारी रोजी शिंदे हे नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी उपनेते आणि जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, महिला आघाडी संपर्क प्रमुख संगीता खोडे, महिला विभाग जिल्हाप्रमुख सुवर्णा मटाले आदींनी सहा विभागांमधील ३१ प्रभागांमध्ये नियोजन दौऱ्याची सुरुवात केली आहे. दुसरीकडे आभार यात्रेच्या तयारीसाठी उपनेते तथा लोकसभा संपर्कप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख बंटी तिदमे यांसह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शनिवारी सिडको विभागातील प्रभागांसाठी उत्कर्ष सभागृहात आणि सातपूर विभागातील प्रभागांसाठी मसाला झोन येथे बैठकीचे नियोजन करण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या आभार यात्रेची गटनिहाय वेगवेगळी तयारी सुरू असल्याचे चित्र आहे. या दौऱ्यात उपमुख्यमंत्री शिंदे यांची आभार सभा होणार आहे. त्यासाठी त्र्यंबक रस्त्यावरील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, ठक्कर डोमसमोरील मैदान, डोंगरे वसतिगृह अशा तीन ते चार स्थळांची चाचपणी करण्यात आली. रविवारी शिक्षणमंत्री दादा भुसे हे पाहणी करतील आणि सभास्थळावर शिक्कामोर्तब होईल, असे शिंदे गटातून सांगितले जाते. उपमुख्यमंत्री यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, शिंदे गटातील दुही प्रकर्षाने समोर येत आहे. या संदर्भात पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्याशी भ्रमणध्वनीवर वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही प्रतिसाद मिळाला नाही.

Story img Loader