ठाणे जिल्ह्यातील दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’हा चित्रपट मे महिन्यात प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर सव्वा महिन्याच्या कालावधीत शिवसेनेत अभुतपूर्व असे बंड झालेले पाहायला मिळत आहे. ‘धर्मवीर’च्या निमित्ताने दिघे यांच्यासोबत सावलीसारख्या वावरणाऱ्या ठाण्यातील काही व्यक्तिरेखाही चर्चेत आल्या. या चित्रपटाच्या निमित्ताने राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ठेवण्यात आलेला ‘फोकस’तेव्हापासूनच राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला. शिवसेनेत झालेल्या मोठ्या बंडाच्या पार्श्वभूमीवर जेमतेम महिनाभरापूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या निर्मितीत ठाण्यातील ‘टिम शिंदे’आणि त्यातही शिंदे यांचे खासगी सचिव सचिन जोशी यांनी बजावलेली ‘कामगिरी’ठाण्यातील राजकीय वर्तुळात अनेकांच्या डोळ्यात भरणारी होती. चित्रपट प्रदर्शनानंतर दोन दिवसानंतरच सचिन अनेकांसाठी ‘नाॅट रिचेबल’होते. एरवी शिंदे यांच्या सर्व प्रकारच्या निर्णय प्रक्रियेत ‘मोला’ची भूमिका बजाविणारे सचिन आहेत कुठे याविषयी सध्या वेगवेगळ्या चर्चांना ऊत आला आहे.
शिवसेनेत झालेल्या मोठ्या बंडाच्या पार्श्वभूमीवर जेमतेम महिनाभरापूर्वी प्रदर्शित झालेला ‘धर्मवीर‘सिनेमा चांगलाच चर्चेत राहीला. हा चित्रपट, त्यात साकारण्यात आलेल्या व्यक्तिरेखा, हिंदुत्वाची नेमकी मांडणी आणि ‘धर्मवीरां‘चे पट्टशिष्य म्हणून शिंदे यांना दिले गेलेले महत्व राजकीय वर्तुळात अनेकांच्या डोळ्यात भरणारे ठरले. दिघे यांना मानणारा, त्यांच्या कार्यपद्धतीविषयी कमालीची उत्सुकता असणारा एक मोठा वर्ग आजही ठाणे, पालघर जिल्ह्यात आहे. दिघे यांचे व्यक्तिमत्व संपूर्ण राज्याला कळावे यासाठी या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली, असे त्यावेळी सांगण्यात आले. शिवसेनेतील मोठ्या बंडाच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित झालेला हा चित्रपट राज्यात सध्या सुरु असलेल्या नाट्यमय घडामोडींचा ‘ट्रेलर’ होता का अशी चर्चाही आता सुरु झाली आहे. या चित्रपटाची निर्मिती साहिल मोशन आर्ट आणि मंगेश देसाई यांच्या मार्फत करण्यात आलेली असली तरी या प्रक्रियेत एकनाथ शिंदे यांचे खासगी सचिव सचिन जोशी यांची भूमिका महत्वाची होती, अशी चर्चा आहे.
जोशी यांच्याकडून नेपथ्य रचना?
एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासात सचिन जोशी हे त्यांच्या समवेत अगदी सुरुवातीपासून राहिले आहेत. शिंदे यांच्याकडे मोठ्या राजकीय जबाबदाऱ्या जशा येत गेल्या तसे माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधण्याचे काम जोशी यांच्याकडे आले. शिंदे आणि माध्यमांमधील दुवा म्हणून जोशी कार्यरत असत. शिंदे यांची प्रतिमा संवर्धन, त्यांची भाषणे लिहून देणे, महत्वाच्या मुद्दयांची आखणी करणे, प्रशासकीय बैठकांमधील सूचना, मुद्दयांची आखणी करण्याचे कामही पुढे जोशी यांच्या खांद्यावर आले. राज्यात शिवसेना-भाजपची सत्ता येताच शिंदे यांच्याकडे असलेल्या विभागांच्या अनेक बैठकांना जोशी यांची थेट उपस्थिती वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही अचंबित करणारी होती.
गेल्या अडीच वर्षांच्या काळात सचिन जोशी यांचे मंत्रालय कामकाजातील महत्व कमालीचे वाढल्याचे स्पष्ट दिसत होते. शिंदे यांचे प्रशासकीय सचिव म्हणून बालाजी खतगावकर यांच्याकडे महत्वाची जबाबदारी असली तरी प्रशासकीय नियुक्त्या, शिंदे यांची स्थानिक राजकारणातील आर्थिक गणिते, राजकीय आखणीला मूर्त स्वरुप देण्यात सचिन जोशी यांची भूमिका निर्णायक ठरु लागली होती. धर्मवीर प्रदर्शित झाल्यानंतर सव्वामहिना जोशी ‘नाॅट रिचेबल’ झाले. ते गावी गेले आहेत, फिरण्यासाठी गेले आहेत, साहेबांच्या कामानिमित्त बाहेर आहेत अशा चर्चा राजकीय तसेच प्रशासकीय वर्तुळात सातत्याने सुरू होत्या. केंद्रीय तपास यंत्रणांचे त्यांच्यावर लक्ष असल्याच्या चर्चाही अगदी जोमात सुरु झाल्या होत्या. शिंदे यांचे सुरतेतील बंड आणि पुढे गुवहाटीपर्यंतचा प्रवास सुरु होताच जोशी यांच्या मागील महिनाभरापासून ‘गायब’होण्यामागील अर्थ आता अनेकांना उलगडू लागला आहे. अर्थात इतके सगळे सुरु असतानाही जोशी मात्र अद्याप अनेकांसाठी ‘भूमिगत’च आहेत हे विशेष !