मुंबई : मंत्रिमंडळात समावेश करताना शिवसेनेनेही काही ज्येष्ठ नेत्यांसाठी धक्कातंत्र वापरले असून आधीच्या मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांना डच्चू दिला आहे. तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर व संजय राठोड यांच्या समावेशासाठी भाजपचा आक्षेप होता. त्यापैकी बंजारा समाजातील राठोड वगळता अन्य तीन नेत्यांना शिंदे यांनी मंत्रिमंडळातून डच्चू दिला आहे. शिवसेनेत मंत्रीपदासाठी इच्छुक नेत्यांची संख्या मोठी असल्याने अडीच वर्षांसाठी फिरते मंत्रीपदाचा तोडगा काढण्यात आला आहे. मात्र, मंत्रिमंडळात शिवसेनेच्या मंत्र्यांची निवड करताना शिंदे यांना तारेवरची कसरत करावी लागली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवसेनेला किमान १३ मंत्रीपदांची अपेक्षा होती. पण त्यांच्या वाट्याला १२ मंत्रीपदे आली आहेत. पक्षातील इच्छुकांची मोठी संख्या व आग्रह पाहून शिंदे यांनी अडीच वर्षांसाठी आलटून पालटून मंत्रीपदे देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेला गृह, नगरविकास, महसूल, आरोग्य व अन्य महत्वाची खाती मिळावीत, असा शिंदे यांचा आग्रह होता. खातेवाटप व मंत्र्यांची संख्या यावरुन बराच खल झाला आणि मंत्रिमंडळ विस्तार तब्बल तीन आठवडे लांबला होता.

आणखी वाचा-राष्ट्रवादीचे ‘फिरते’ मंत्री भुजबळ, वळसे-पाटील यांना नारळ

अखेर शिंदे व फडणवीस यांच्यात चर्चा झाल्यावर आणि भाजप पक्षश्रेष्ठींनी मंत्र्यांच्या यादीला मान्यता दिल्यावर शपथविधी समारंभ पार पडला. राठोड यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार किंवा नाही, याविषयी बरीच उलटसुलट चर्चा झाली. मी पूर्ण कार्यक्षमतेने काम केले, असे राठोड यांचे म्हणणे होते. त्यांच्या मंत्रिमंडळातील समावेशासाठी पोहरादेवी देवस्थानमधील संत-महंतांनीही मागणी केली होती. बंजारा समाजाला प्रतिनिधीत्व देण्यासाठी राठोड यांचा समावेश करण्यात आला आहे. कोणाचा मंत्रिमंडळात समावेश करायचा, यावरुन शिंदे यांच्यावर नेत्यांकडून व भाजपकडूनही दबाव होता. अनेक नेत्यांना संधी देता यावी, यासाठी शिंदे यांनी अडीच वर्षांचे मंत्रीपद हे सूत्र स्वीकारून संबंधित मंत्र्यांकडून अडीच वर्षांनंतर राजीनामा देण्यासाठी शपथपत्रही लिहून घेतले असल्याचे समजते.

आणखी वाचा-Rahul Gandhi : ‘एकलव्य अन् त्याच्या अंगठ्याप्रमाणेच….’; संविधानावरील चर्चेत राहुल गांधींनी मांडले महत्त्वाचे निरीक्षण

शिंदे यांनी काही जुने मंत्री वगळून प्रताप सरनाईक, भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रकाश आबिटकर, आशिष जैस्वाल, योगेश कदम अशा काही नवीन नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. तर उदय सामंत, शंभूराज देसाई, दादा भुसे अशा काही आधीच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना पुन्हा संधी दिली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shindes struggle while selecting shiv sena ministers in cabinet print politics news mrj