मुंबई : मुंबईतील कुलाबा, मुंबादेवी, कुर्ला त्याचबरोबर कल्याण व पुणे विधानसभा मतदारसंघांत मतदानाची टक्केवारी ४० ते ४७ टक्के इतकी कमी रहात असल्याबद्दल केंद्रीय निवडणूक आयोगाने चिंता व्यक्त केली. जम्मू-काश्मीर आणि गडचिरोलीमध्ये अधिक मतदान होते. त्यामुळे मतदारांनी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आवाहन मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शनिवारी केले.

राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या दोन दिवसांपासून विविध बैठका घेऊन निवडणूक तयारीचा आढावा घेतला. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार आणि सुखविंदरसिंग संधू यांनी त्यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

ज्यांची नावे मतदारयादीत नाहीत, त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी अजूनही नावनोंदणी करता येईल, असे सांगून राजीव कुमार म्हणाले, जम्मू-काश्मीरमध्ये नुकतेच मतदान झाले. तेथे दोडा, पूँछ भागातही ७२ व ७४ टक्के आणि महाराष्ट्रात गडचिरोलीमध्येही ७३ टक्के मतदान झाले होते. मात्र मुंबईतील काही भाग, कल्याण, पुणे या ठिकाणी मतदानाची टक्केवारी कायमच कमी राहत असल्याचे चित्र आहे. याचा मतदारांनी गंभीरपणे विचार करावा. मतदान वाढविण्यासाठी निवडणूक यंत्रणेनाही उपाययोजना करणे आवश्यक असून मतदारांनीही प्रतिसाद द्यावा, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले.

हेही वाचा >>>Haryana Assembly Election 2024 : भाजपा नेत्यांना प्रश्न विचारुन कोंडीत पकडण्यासाठी हरियाणातल्या शेतकऱ्यांना खास प्रशिक्षण; प्रशिक्षणात काय शिकवलं?

विविध उपाययोजना

● मतदानाच्या दिवशी कामगार व कर्मचाऱ्यांना भरपगारी रजा देणे बंधनकारक असून निवडणूक अधिकाऱ्यांनी असंघटित क्षेत्राकडे त्याबाबत लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले.

● वयाची ८५ वर्षे पूर्ण केलेल्या मतदारांना घरीही मतदान करण्याची सोय करण्यात आली आहे. त्यासाठी त्यांना अर्ज करावा लागेल.

● राज्यात एक लाख १८६ मतदान केंद्रे असून त्यापैकी ४२,५८५ शहरी तर ५७६०१ ग्रामीण भागात आहेत. प्रत्येक मतदानकेंद्रावर सरासरी ९५० मतदार आहेत. सुमारे निम्म्या मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही बसविण्यात येतील.

● मतदान केंद्रांपैकी ३५० केंद्रे युवा कर्मचारी, ३८८ केंद्रे महिला कर्मचारी आणि २९९ मतदान केंद्रे अपंग, विकलांग कर्मचाऱ्यांकडून संचालित केली जातील.

सुविधा पुरविण्याचे आदेश

लोकसभा निवडणुकीत मुंबई, ठाणे जिल्ह्यासह अनेक मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा होत्या आणि मतदार भर उन्हात उभे होते, मतदान केंद्रात मोबाइल व बॅग नेण्यास मनाई होती आदी मुद्द्यांबाबत आयोगाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्याबाबत राजीव कुमार म्हणाले, मतदारांना फार काळ रांगांमध्ये उभे राहावे लागणार नाही, अशी व्यवस्था या निवडणुकीत होईल. थोडा वेळ रांगेत राहावे लागले, तरी तेथे निवारा शेड, खुर्ची किंवा बाकड्यांची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मतदान केंद्रात मोबाइल नेण्यासंदर्भातही काय व्यवस्था करता येईल, याचा विचार करण्यात येत आहे. प्रत्येक मतदानकेंद्रांवर रांगामध्ये उभे राहण्यासाठी निवारा शेड, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, व्हीलचेअर, रँप आदी सुविधा पुरविण्याचे आदेश आयोगाने निवडणूक अधिकाऱ्यांना दिले.