Rahul Gandhi Alleges Voter Fraud In Maharashtra : गेल्या वर्षी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवला; तर महाविकास आघाडीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. महायुतीनं विधानसभेच्या २८८ पैकी तब्बल २३० जागा जिंकून राज्यात सलग दुसऱ्यांदा सत्ता स्थापन केली. दुसरीकडे महाविकास आघाडीला फक्त ४८ जागांवरच समाधान मानावं लागलं. या निकालाला तीन महिन्यांहून अधिक कालावधी लोटला असला तरी काँग्रेसचे नेते अजूनही निकालावर शंका घेताना दिसून येत आहेत. निवडणुकीत महायुतीला मिळालेली मतं आणि जिंकलेल्या जागांमध्ये तफावत असल्याचं विरोधी पक्षातील नेत्यांचं म्हणणं आहे.

निवडणुकीत खरंच घोटाळा झालाय का?

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. सोमवारी (२१ एप्रिल) त्यांनी बोस्टन शहरातील ब्राउन विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या एका सत्रामध्ये सहभाग घेतला. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राहुल गांधींनी भारतातील निवडणूक प्रक्रियेवर पुन्हा एकदा बोट ठेवलं. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थित करताना निवडणूक आयोगानं निकालात तडजोड केल्याच्या आरोप राहुल गांधींनी केला. यावेळी त्यांनी मतदान करताना लागत असलेल्या वेळेची उदाहरणंही दिली. काँग्रेस खासदाराच्या या आरोपांमुळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत खरंच घोटाळा झाला आहे का, असा प्रश्न अनेकांना पडला. दरम्यान, राहुल गांधींच्या या आरोपांचं निवडणूक आयोगानं खंडन केलं आहे.

नेमके काय म्हणाले राहुल गांधी?

“महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत तरुणांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केल्याचं दिसून आलं. हे एक वास्तव आहे. मात्र, निवडणूक आयोगानं आम्हाला संध्याकाळी ५.३० पर्यंत झालेल्या मतदानाचीच आकडेवारी दिली. त्यानंतर संध्याकाळी ५.३० ते ७.३० या कालावधीत जेव्हा मतदानाची वेळ संपलेली असते, त्या कालावधीत ६५ लाख मतदारांनी मतदान केलं. असं घडणं केवळ अशक्य आहे. कारण- एका मतदाराला मतदान करायला साधारण तीन मिनिटं लागतात. जर ही वेळ लक्षात घेतली, तर रात्री २ वाजेपर्यंत मतदार रांगेत उभे होते आणि त्यानंतर पहाटेपर्यंत मतदान प्रक्रिया चालली, असा अर्थ होतो. पण, असं कुठेही घडल्याचं पाहण्यास मिळालं नाही.” असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा : देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ दाव्यावरून स्टॅलिन यांनी भाजपाला कसं खिंडीत गाठलं?

“निवडणूक आयोगाने तडजोड केली“

“आम्ही निवडणूक आयोगाला विचारलं होतं की, मतदान प्रक्रियेची व्हिडीओग्राफी केली जाणार आहे का? त्यावर त्यांनी स्पष्ट नकार दिला. त्यांनी कायद्यातही बदल केला. त्यामुळे तुम्हाला वाटलं की, कुणालाही वाटलं तरीही ते मतदान प्रक्रियेचा व्हिडीओ काढू शकत नाहीत. याचा अर्थ सरळ आहे. निवडणूक आयोगाने तडजोड केली. निवडणूक प्रक्रियेत गंभीर घोळ आहेत हे अगदी स्पष्ट झालं आहे” असा आरोपही राहुल गांधींनी केला. तसंच मी हा मुद्दा याआधीही उपस्थित केला होता, असंही ते म्हणाले.

राहुल गांधींच्या आरोपांचं निवडणूक आयोगाकडून खंडन

राहुल गांधी यांनी केलेले आरोप निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी फेटाळून लावले आहेत. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पारदर्शक पद्धतीने पार पडली आहे. तरीही काँग्रेसच्या नेत्यांना निवडणुकीत घोटाळा झाल्याची शंका आली असेल, तर त्यांनी नियुक्त केलेल्या मतदान प्रतिनिधींनी योग्य वेळी निवडणूक निर्णयाधिकाऱ्यांकडे आक्षेप का नोंदवले नाहीत, असा प्रश्नही निवडणूक आयोगातील सूत्रांनी विचारला. “प्रत्येक मतदान केंद्रावरील मतदान उमेदवारांकडून किंवा राजकीय पक्षांकडून अधिकृतपणे नियुक्त केलेल्या मतदान प्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडले. काँग्रेसच्या उमेदवारांनी किंवा त्यांच्याकडून अधिकृत प्रतिनिधींनी मतमोजणीच्या वेळी निवडणूक निर्णयाधिकारी (RO) आणि निवडणूक निरीक्षकांसमोर कोणत्याही प्रकारच्या अनियमित मतदानाची ठोस तक्रार नोंदवलेली नाही,” अशी माहिती निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिली.

महाराष्ट्रातील निवडणुकीत खरंच मतदार वाढले?

भारताच्या निवडणूक प्रक्रियेच्या सर्वोच्च संस्थेने सांगितले, “मतदानाच्या शेवटच्या तासात अचानक मतदान वाढल्याचा आरोप कोणत्याही आधाराविना आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या वेळेत एकूण ६,४०,८७,५८८ मतदारांनी मतदान केले. त्यानुसार सरासरी दर तासाला सुमारे ५८ लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या सरासरीप्रमाणे शेवटच्या दोन तासांत जवळपास एक कोटी १६ लाख मतदार मतदान करू शकले असते. प्रत्यक्षात केवळ ६५ लाख मतदारांनी दोन तासांत मतदान केलं आहे, जे सरासरीपेक्षा खूपच कमी आहे,” असे निवडणूक आयोगातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

निवडणूक याद्यांमध्ये खरंच घोळ झालाय का?

“महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांची अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर, एकूण ९,७७,९०,७५२ मतदारांपैकी फक्त ८९ मतदारांवर आक्षेप घेण्यात आला होता. तशी तक्रारही राजकीय पक्षांनी दाखल केली होती. दुसऱ्या अपिलीय प्राधिकरणाकडे (CEO) केवळ एक तक्रार दाखल झाली. त्यामुळे हे स्पष्ट होतं की, काँग्रेस किंवा इतर कोणत्याही पक्षांनी निवडणुकीपूर्वी कोणतीही गंभीर तक्रार केली नव्हती,” असेही निवडणूक आयोगातील सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा : अटलबिहारी वाजपेयींच्या काळानंतर भाजपाचे नेते हिंदीकडे कसे वळले?

महाराष्ट्रातील १,००,४२७ मतदान केंद्रांसाठी, ९७,३२५ बूथस्तरीय अधिकारी नेमण्यात आले होते. तसेच सर्व राजकीय पक्षांकडून एकूण १,०३,७२७ बूथस्तरीय प्रतिनिधी नियुक्त करण्यात आले होते, त्यात काँग्रेसकडून २७,०९९ प्रतिनिधी होते, अशी माहिती निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांनी दिली. महाराष्ट्रातील मतदार यादीबाबत काँग्रेसनं केलेले आरोप तथ्यहीन असून राज्याचा अपमान करणारे आहेत. डिसेंबर २०२४ पासून महाराष्ट्रातील निवडणुकीची सर्व माहिती निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. त्यामुळे या स्पष्टीकरणाकडे दुर्लक्ष करून आरोप पुन्हा पुन्हा करणे हे केवळ द्वेषपूर्ण हेतूचं प्रतीक आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

“राहुल नेहमीच परदेशात भारताची बदनामी करतात”

राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील निवडणूक निकालांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर भाजपाच्या नेत्यांनी या मुद्द्यावरून त्यांना लक्ष्य केलं. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी काँग्रेस खासदाराच्या या विधानाचा चांगलाच समाचार घेतला. “भारतीय मतदारांचा विश्वास जिंकू न शकलेले लोकशाहीविरोधी राहुल गांधी यांनी परदेशात भारतीय लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करायला सुरुवात केली आहे. राहुल नेहमीच परदेशात भारताची बदनामी का करतात? ‘जॉर्ज सोरोसचा एजंट, भारतीय राज्याशी लढत आहे. राहुल गांधी आज तेच करू इच्छितात”, अशी टीका भंडारी यांनी केली.

देवेंद्र फडणवीसांनी घेतला राहुल गांधींचा समाचार

दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राहुल गांधी यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला. “राहुल गांधी परदेशात जाऊन सातत्याने भारताची बदनामी करत आहे, ही निंदनीय बाब आहे. वारंवार निवडणुकांमध्ये हरल्यानंतर त्यांच्या मनावर परिणाम झालेला दिसतो आहे. माझा राहुल गांधींना सल्ला आहे की, त्यांनी जनतेत जाऊन काम केलं पाहिजे. जगभरात फिरुन आणि भारताची बदनामी करुन त्यांची विश्वासार्हता वाढणार नाही. जनतेत जर त्यांनी विश्वासार्हता निर्माण केली तरच त्यांची मतं वाढतील. पण त्याऐवजी भारताला बदनाम करण्याचं काम त्यांचं चाललं आहे. महाराष्ट्रात हरले, हरियाणात हरले, दिल्लीत हरले. त्यांनी भारताची बदनामी करणं बंद करावं” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.