Nagpur South West Vidhan Sabha Constituency Election 2024 : विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख निवडणूक लढणार याबाबत निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी कमालीची चर्चा रंगली होती. या चर्चेला देशमुख यांच्यावरील आरोप, त्यानंतर त्यांना झालेली अटक व सुटका या संपूर्ण घटनाक्रमाची पार्श्वभूमी होती. त्यामुळे ही लढत खरच होणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील जागा वाटपाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती आणि अजूनही संपली नाही. मात्र पहिली यादी जाहीर करण्यात भाजपने आघाडी घेतलती व त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुन्हा त्यांच्या पारंपारिक दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढणार हे स्पष्ट झाले. त्यामुळे प्रतीक्षा होती ती राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या यादीची. ती यादीही अखेर गुरुवारी जाहीर झाली आणि त्यात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे नाव त्यांच्या काटोल या पारंपारिक मतदारसंघासाठीच जाहीर झाले. त्यामुळे आजी-माजी गृहमंत्री हे त्यांच्याच मतदारसंघातून निवडणूक लढणार, हे स्पष्ट झाले. त्यामुळे आजी-माजी गृहमंत्री यांच्यात लढत होईल याकडे डोळे लावून बसलेल्यांची निराशा झाली.

दोघेही बलाढ्य उमेदवार

दक्षिण-पश्चिममधून निवडणूक लढणारे विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सलग सहाव्यांदा विधानसभा निवडणूक लढवत असून ते अद्याप एकदाही पराभूत झाले नाही. सुरुवातीला पश्चिम नागपूर या मतदारसंघातून सलग दोन वेळा आणि त्यानंतर दक्षिण-पश्चिम नागपूर या मतदारसंघातून सलग तीन वेळा असे एकूण पाच वेळा ते निवडणूक जिंकले. यावेळी त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीने काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे यांना रिंगणात उतरवले आहे.
नागपूर ग्रामीणमधील काटोल हा अनिल देशमुख यांचा मतदारसंघ आहे. तेथून ते प्रथम १९९५ पासून सातत्याने लढत आले. त्याला २०१४ ची निवडणूक अपवाद होती व ते त्यात पराभूत झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर ते प्रथमच काटोलमध्ये रिंगणात उतरणार आहेत. महाविकास आघाडीचे सरकार असताना अनिल देशमुख यांना गृहमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. अडिच वर्षाची त्यांची कारकीर्द कोविड आणि त्यांच्यावरच्या आरोपांमुळे गाजली व त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.

हे ही वाचा… Wani Assembly Constituency: वणी विधानसभेत बंडखोरी होण्याची शक्यता; चौरंगी लढत झाल्यास भाजपच्या पथ्यावर पडणार

दोन्ही मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष

दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणूक लढवणार असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या मतदारसंघातील लढतीकडे असणार आहे. २०१९ मध्ये ते मुख्यमंत्री म्हणून निवडणूक रिंगणात होते आता ते उपमुख्यमंत्री म्हणून निवडणूक लढणार आहेत. त्याच बरोबर माजी गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख यांच्या काटोल मतदारसंघातील लढतीकडेही राज्याचे लक्ष असणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Election fight between former home minister anil deshmukh and home minister devendra fadnavis turned out to be rumors finally print politics news asj