दिगंबर शिंदे
सांगली: जिल्ह्यातील सात बाजार समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या असल्या तरी सर्वात लक्ष्यवेधी निवडणुक सांगली बाजार समितीची ठरत आहे. वार्षिक एक हजार कोटींची उलाढाल आणि मिरजेसह कवठेमहांकाळ व जत हे तीन तालुके कार्यक्षेत्र असलेल्या या बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यातीन अंतर्गत साटेलोटे अंतर्गत कुरघोड्या या निमित्ताने उघड होणार आहेत. राजकीय शत्रू एकवेळ प्रबळ झाला तर चालेल, मात्र मित्र प्रबळ होणार नाही याची खबरदारी सर्वच राजकीय नेते मंडळी घेत असून पॅनेलच्या उमेदवारांची यादी जोपर्यंत निश्चित होणार नाही तोपर्यंत चर्चेचे गुर्हाळ मात्र चालूच राहणार आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गट यांनी बाजार समिती निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविल्या जातील असे जाहीर केले असले तरी याला छेद सांगलीत वसंतदादा गटाने दिला असून या निवडणुका दादा गटाच्या नेतृत्वाखाली लढविण्याचे जाहीर करीत असतानाच भाजप नेत्यांशी चर्चेचे दारे खुली ठेवून एक प्रकारे राष्ट्रवादीला पर्यायाने प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांना शह देण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर दुसर्या बाजूला इस्लामपूर बाजार समिती निवडणुकीमध्ये काँग्रेसला फारसे स्थान न देता राष्ट्रवादीच्या पॅनेलचा प्रचार शुभारंभही करण्यात आला. तर विटा बाजार समितीसाठी बोलावण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीला काँग्रेस पदाधिकार्यांनी दांडी मारत वेगळा मनसुबा दाखविला आहे. अशात महाविकास आघाडीत बिघाडी होण्याचीच जास्त शययता दिसत असल्याचे प्रथमदर्शनी जरी वाटत असले तरी राजकीय नेत्यांची करणी एक आणि कथनी वेगळीच असल्याचे दिसत आहे.
सांगली बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने नउ जागांची मागणी महाविकास आघाडीच्या बैठकीत केली आहे. तर ठाकरे गटाने चार जागांची मागणी करीत असताना या जागा कवठेमहांकाळ तालुययातील मागितल्या आहेत, तर राष्ट्रवादीने आपले पत्ते अद्याप खुले केले नसल्याने या पक्षाची किती जागांची मागणी अथवा भूक आहे हे स्पष्ट झालेले नाही. वसंतदादा गटाने मिरज आणि जत या दोन तालुययात मागणी केली असून या दोन तालुययात जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याचे या गटाचे प्रयत्न आहेत. तर व्यापारी गटातील दोन जागा आणि हमाल गटातील एक जागा या गटा-तटाच्या राजकारणापासून अलिप्त असल्या तरी अखेरच्या क्षणी ज्यांचे पारडे जड होईल त्या बाजूलाच झुकत असल्याचा आजवरचा अनुभव आहे.
आणखी वाचा-मविआच्या वज्रमुठ सभेने भाजपच्या बालेकिल्ल्याला हादरे
सांगली बाजार समितीवर आजपर्यंत दादा गटाचेच वर्चस्व राहिले आहे. मात्र, गतवेळी असलेल्या संचालक मंडळाने निवडून येताना काँग्रेसचा जयजयकार केला, तर राज्यात भाजपची सत्ता येताच खासदार संजयकाका पाटील यांचा हात धरून भाजपशी सोयरीक केली. अखेरच्या टप्प्यात करोनामुळे मिळालेल्या वाढीव मुदतीत राष्ट्रवादीत प्रवेश करीत प्रशासक नियुक्ती टाळून कार्यभार हाती राहील याची व्यवस्था केली. या संचालक मंडळातील नउ संचालकांच्या उमेदवारीला हरकत आल्याने निवडणूक निर्णय अधिकार्यांनी त्यांची उमेदवारी अवैध ठरविली असली तरी पणन संचालकांच्या कोर्टात आता काय निर्णय लागतो हे एक दोन दिवसातच समजेल या निर्णयानंतर बाजार समितीच्या निवडणुकीची फेरजुळणी होउ शकते. तोपर्यंत एकमेकांना शह-काटशह देण्याचे मनसुबे निदान चर्चेच्या माध्यमातून तरी सुरूच राहणार आहेत.