प्रबोध देशपांडे
अकोला : २०२४ मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या अकोला जिल्ह्यात पक्षांतराचे वारे वाहू लागेल आहेत. शिवसेना ठाकरे गटातील २५ ते ३० आजी-माजी पदाधिकारी शिंदे गटात जाण्याच्या तयारीत आहेत, तर माजी आमदार हरिदास भदे राष्ट्रवादी सोडून ठाकरे गटात सहभागी होण्यासाठी त्यांच्या संपर्कात आहेत. भविष्यात अनुकूल वातावरण राहण्याच्या दृष्टीने नेत्यांकडून चाचपणी करण्यात येत असून त्यानंतरच पक्ष प्रवेशांचे राजकीय सोहळे रंगणार असल्याची माहिती आहे.
लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक एप्रिल-मे महिन्यात होणार आहे. त्यानंतर राज्यात ऑक्टोबर महिन्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू होईल. या निवडणुकांसाठी प्रमुख पक्षांनी राजकीय मशागतीला सुरुवात केली. नेत्यांसह इच्छूकांकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. पक्षांचाही संघटनात्मक बांधणीवर भर आहे. राज्यात शिवसेना व राष्ट्रवादीत फाटाफूट झाल्यानंतर नाराजांपुढे अनेक पर्याय उपलब्ध झालेत. कार्यकर्त्यांचा आग्रह किंवा ‘विकासा’च्या गोंडस नावावर स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी कोण नेता कुठेल्या पक्षात जाईल, याचा अंदाज बांधणे देखील आता अवघड होऊन बसले आहे. अकोला जिल्ह्यात सध्या नाराजांकडून पक्षांतराच्या हालचाली केल्या जात आहेत. माजी आमदार हरिदास भदे हे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या संपर्कात आहेत. मुंबई येथे त्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटीची वेळ मागितली असून, २ सप्टेंबरला ही बैठक होणार आहे. त्यानंतर पक्ष प्रवेशावर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा- चांद्रयान-३ च्या यशानंतर काँग्रेसकडून पंडित नेहरू, इंदिरा गांधींची आठवण, भाजपाची खोचक टीका!
हरिदास भदे सन २००४ आणि २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत सध्याच्या अकोला पूर्व मतदारसंघातून तत्कालीन भारिप-बमसंच्या तिकीटावर निवडून आले होते. सन २०१४ च्या निवडणुकीत भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांनी त्यांचा पराभव केला. २०१९ मध्येही ते पराभूत झाले. मतभेद व पक्षात नाराज असल्याने त्यांनी वंचित बहुजन आघाडी सोडून बाळापूरचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीत मात्र ते फारसे सक्रिय झाले नाहीत. आता निवडणुका जवळ आल्याने त्यांनी शिवसेना ठाकरे गटाची वाट निवडली आहे. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन ते शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी त्यांनी अकोला जिल्हाप्रमुख गोपाल दातकर व इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत माजी आमदार भदे यांनी पक्ष प्रवेशावर चर्चा करण्यासाठी वेळ मागितली आहे. त्यानुसार २ सप्टेंबर रोजी त्यांची पक्ष प्रवेशावर सविस्तर चर्चा होणार असून, त्यानंतर पक्ष प्रवेशाची तारीख ठरविली जाणार असल्याची माहिती आहे. बळीराज सिरस्कार यांनी यापूर्वीच राष्ट्रवादीचे घड्याळ सोडून कमळ हातात घेतले आहे.
दरम्यान, अकोला जिल्ह्यातील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील एक मोठा गट एकनाथ शिंदे सेनेच्या संपर्कात आहे. माजी जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी, जुन्या शिवसैनिकांचा त्यात समावेश आहे. ते पक्षात अस्वस्थ आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नाराजांवर शिंदे गटाचे लक्ष आहे. एकनाथ शिंदेंसोबत त्यांची प्राथमिक स्तरावरील बोलणी झाली. मुख्यमंत्र्यांचे सुपूत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी अकोला जिल्ह्याच्या ठाकरे गटातील नाराज नेत्यांसोबत छत्रपती संभाजीनगर येथे एक बैठक देखील घेतली. मुख्यमंत्र्यांशी बोलणी करून लवकरच मुंबईमध्ये त्यांचा पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याचे कळते. निवडणुकांच्या तोडावर सोयीस्कर पक्षात दाखल होण्याकडे नेत्यांचा कल असून वरिष्ठ नेतृत्व देखील पक्ष वाढविण्यावर जोर देत आहेत.
बेरजेचे राजकारण
शिवसेना व राष्ट्रवादी गटातटात विभागाल्याने ते कमकुवत झाले आहेत. तळागाळातून पक्ष नव्याने उभे करण्याचे आव्हान आहे. सध्या भाजप वगळता सर्वच पक्षांना चांगला जनाधार असलेल्या नेत्यांची गरज आहे. त्यामुळे पक्ष प्रवेशावर अधिक भर दिला जातो. पक्षसंघटन बळकट करण्यासाठी पक्षप्रमुखांकडून बेरजेचे राजकारण केले जात आहे.