काँग्रेस नेते गौरव गोगोई यांची पत्नी एलिझाबेथ गोगोई यांचे पाकिस्तानच्या गुप्तहेर संस्थेशी कथित संबंध असल्याच्या आरोपांवरून काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष (भाजपा) यांच्यात आसाममध्ये तणाव निर्माण झाले आहे. या वादावर दोन्ही पक्षांनी कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. आसाममध्ये पुढील वर्षीच्या सुरुवातीला निवडणुका होणार असल्याने या मुद्द्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मुख्यमंत्री आणि भाजपा नेते हिमंता बिस्वा सरमा यांनी गोगोई यांच्या पत्नीच्या परदेशी नागरिकत्वावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. संपूर्ण देशभर या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. काय आहे हे प्रकरण? कोण आहेत एलिझाबेथ गोगोई? जाणून घेऊ.

कोण आहेत एलिझाबेथ गोगोई?

ब्रिटनममध्ये कोलबर्न कुटुंबात जन्मलेल्या एलिझाबेथ हवामान धोरणाच्या क्षेत्रात काम करतात. एलिझाबेथ गोगोई यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (एलएसई) मधून आंतरराष्ट्रीय राजकीय अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी २०१३ मध्ये काँग्रेस नेते आणि आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचा मुलगा गौरव गोगोई यांच्याशी लग्न केले. एलिझाबेथ गोगोई यांनी मार्च २०११ ते जानेवारी २०१५ दरम्यान क्लायमेट अँड डेव्हलपमेंट नॉलेज नेटवर्क (सीडीकेएन) साठी काम केले. सीडीकेएन वेबसाइटवरील त्यांच्या प्रोफाइलनुसार, त्यांनी भारत आणि नेपाळमधील ‘सीडीकेएन’च्या कार्यक्रमाचे समन्वयन केले. त्यांनी आपल्या कारकिर्दीत काही काळ पाकिस्तानमध्ये काम केले होते. सीडीकेएनमधलं त्यांचं काम भाजपाच्या चाचण्यांखाली आलं आहे.

भाजपाने काय आरोप केले?

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी एलिझाबेथ गोगोई यांच्या परदेशी नागरिकत्वाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत आणि त्यांच्यावर पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय)शी संबंध असल्याचा आरोप केला आहे. १३ फेब्रुवारी रोजी त्यांनी तत्कालीन पाकिस्तानी राजदूत अब्दुल बासित आणि गौरव गोगोई यांच्या नेतृत्वाखालील तरुणांच्या शिष्टमंडळादरम्यान नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात २०१५ मध्ये झालेल्या बैठकीचे छायाचित्र ट्विट केले. यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरमा यांनी काँग्रेस खासदारावर अखेरीस संवेदनशील संरक्षण प्रकरणांवर संसदेत प्रश्न उपस्थित केल्याचा आरोप केला. याला उत्तर देताना गोगोई म्हणाले की, त्यांनी आणि काही सहकाऱ्यांनी २०११ मध्ये युथ फोरम ऑन फॉरेन पॉलिसी नावाची संस्था स्थापन केली होती, जेणेकरून भारतीय विद्यार्थी आणि तरुण व्यावसायिकांना परराष्ट्र धोरण आणि आंतरराष्ट्रीय संबंधांवर चर्चा करण्याची संधी मिळेल.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी एलिझाबेथ गोगोई यांच्या परदेशी नागरिकत्वाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

आसामच्या मुख्यमंत्र्यांनी एलिझाबेथ गोगोई यांच्यावरही आरोप केले आणि पाकिस्तानच्या नियोजन आयोगाचे माजी सल्लागार अली तौकीर शेख यांच्या नेतृत्वाखाली सीडीकेएनबरोबर इस्लामाबादमधील त्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गोगोई यांच्या पत्नीवर टीका करत, सरमा यांनी दावा केला की त्या यापूर्वी पाकिस्तानमध्ये होत्या, जिथे त्यांनी इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस (आयएसआय) ची आघाडी मानल्या जाणाऱ्या संस्थेबरोबर काम केले होते. पाकिस्तानी नागरिक असणारे तौकीर शेख २००९ ते २०१६ या कालावधीत ‘सीडीकेएन’चे आशिया संचालक होते. त्यांचा संदर्भ देत, सरमा म्हणाले, “त्यांच्या सोशल मीडियावर भारताच्या अंतर्गत घडामोडी आणि संसदीय बाबींवर संपूर्ण भाष्य समाविष्ट आहे. त्यात भारताच्या हितसंबंधांची तडजोड आणि नुकसान करण्याचा या व्यक्तीचा हेतू आहे, जो चिंताजनक आहे.” एलिझाबेथ गोगोई यांच्यावर टीका करताना सरमा म्हणाले , “आम्हाला आशा आहे की आसामच्या खासदारांची पत्नी म्हणून, जरी त्या ब्रिटीश नागरिक असल्या तरी त्या या चौकशीत सहकार्य करतील आणि आम्हाला मदत करतील. तसेच त्यांचा पासपोर्ट, व्हिसा आणि प्रवासाची कागदपत्रे आमच्याबरोबर शेअर करतील.”

“विरोधी पक्षाचे उपनेते गौरव गोगोई यांच्या पत्नी एलिझाबेथ कोलबर्न यांचे पाकिस्तान नियोजन आयोगाचे सल्लागार अली तौकीर शेख आणि आयएसआय यांच्याशी त्यांचे संबंध आढळून आले आहेत. ही अत्यंत चिंतेची आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित बाब आहे, त्यामुळे राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि गौरव गोगोई पाकिस्तान आणि ‘आयएसआय’बरोबरचे त्यांचे संबंध स्पष्ट करतील अशी अपेक्षा आहे,” असे भाजपा नेते गौरव भाटिया यांनी गेल्या आठवड्यात सांगितले.

आसामच्या मुख्यमंत्र्यांनी असेही नमूद केले आहे की, मोठ्या ‘भारतविरोधी’ षड्यंत्राचा भाग म्हणून काँग्रेस नेत्याला फसवले गेले किंवा ब्लॅकमेल केले गेले असावे. “आम्ही या विषयावर एका खासदाराबद्दल चर्चा करायला सुरुवात केली, पण आता ती खूप वरच्या पातळीवर गेली आहे. त्याचा आता केवळ गौरव गोगोई यांच्याशी संबंध नाही. आता यामागे भारतविरोधी शक्ती सक्रियपणे कार्यरत असल्याचा पुरावा किंवा माहिती आमच्याकडे आहे,” असे सरमा यांनी रविवारी पत्रकारांना सांगितले. सरमा यांच्या निर्देशांवरून काल आसाम पोलिसांनी तौकीर शेख विरुद्ध तक्रार नोंदवली आहे. त्यांच्या मंत्रिमंडळाने पोलिस महासंचालकांना भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये स्पष्ट सहभाग म्हणून गुन्हा दाखल करण्याचे
आदेश दिले आहेत.

काँग्रेसने काय प्रत्युत्तर दिले?

काँग्रेसने सरमा आणि भाजपाचे आरोप फेटाळून लावले आहेत. जोरहाटचे काँग्रेस खासदार गोगोई यांनी त्यांच्या पत्नीवरील आरोपांना हास्यास्पद म्हटले आहे. “जर माझी पत्नी पाकिस्तानची आयएसआय एजंट असेल तर मी भारताचा रॉ एजंट आहे. ज्या कुटुंबावर विविध खटले आहेत आणि अनेक आरोप आहेत ते माझ्यावर आरोप करत असतील तर मला हरकत नाही. आसामचे मुख्यमंत्री हे आरोप फक्त भाजपाचे लक्ष वळवण्यासाठी करत आहेत,” असे गोगोई यांनी रविवारी सांगितले. पुढील वर्षी आसाम विधानसभा निवडणुकीमुळे त्यांना आणि त्यांच्या पत्नीला लक्ष्य केले जात आहे, असेही ते म्हणाले. “मला याची जाणीव होती की, जोरहाट लोकसभा निवडणुकीनंतर त्यांना माझ्याबद्दल काळजी वाटत होती. ते आता पसरवत असलेली चुकीची माहिती आसाम भाजपाचा कमकुवतपणा, कमजोरी सिद्ध करते. कदाचित मुख्यमंत्र्यांना त्यांच्या संघटनात्मक रचनेतील बदलांची चिंता वाटत असेल. पक्षात पूर्वीचे त्यांचे नियंत्रण आता राहिलेले नाही, विशेषत: झारखंड निवडणुकीच्या निकालानंतर.” काँग्रेस खासदार म्हणाले, २०२४ च्या झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या पराभवाचा संदर्भ देणारे सरमा हे भाजपाचे सह-प्रभारी होते.

गोगोई यांनी यापूर्वी भाजपावर त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता आणि कायदेशीर कारवाईची धमकी दिली होती. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनीही गोगोई यांच्या कुटुंबावरील आरोपांना वाईट म्हटले आणि फेटाळून लावले. सरमा यांची खिल्ली उडवत असा दावा केला की, आसामची जनता त्यांना १२ महिन्यांत माजी मुख्यमंत्री करतील आणि त्यानंतर ते विरोधी पक्षात बसतील. यावर सरमा प्रत्युत्तर देत म्हणाले,” माजी आणि विद्यमान मुख्यमंत्री कोण हे आसामचे लोक ठरवतील, तुम्ही नव्हे. २०१४ पासून काँग्रेसला झालेल्या अपमानास्पद पराभवाची मी आठवण करून देऊ इच्छित नाही.”

Story img Loader