भंडारा : जिल्ह्यात भंडारा, साकोली आणि तुमसर हे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. २०१४ मध्ये या तीनही मतदारसंघांवर भाजपचे वर्चस्व होते. २०१९ मध्ये मात्र भाजपला सपशेल अपयश आले. आता भाजपची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेनेसोबत (शिंदे गट) युती आहे. या दोन्ही मित्रपक्षांनी जिल्ह्यातील तीनही मतदारसंघांवर दावा केल्याने भाजपसमोर पेचप्रसंग उभा ठाकला आहे. भाजप आता युती धर्म पाळून हक्काच्या जागा सोडणार, की मित्रपक्षांची मनधरणी करून आपलाच उमेदवार उतरवणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने तुमसर आणि साकोली मतदारसंघांवर दावा केला आहे, तर शिंदेसेना भंडारा मतदारसंघासाठी आग्रही आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांना न दुखावता तुमसर आणि साकोली मतदारसंघ आपल्याकडे कायम राखणे आणि भंडाऱ्यात शिवसेनेचे विद्यमान आमदार असल्याने ही जागा मिळवणे भाजपला कठीण जाणार असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दाव्यांमुळे तीनही मतदारसंघातील भाजपचे इच्छुक, नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे.

हेही वाचा >>>खडकवासला मतदारसंघातील समीकरणे बदलणार ?

भंडारा-पवनी मतदारसंघातून विद्यमान आमदार नरेंद्र भोंडेकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी हवी आहे. पक्षही त्यासाठी अनुकूल आहे. मात्र, भाजपकडून त्यांच्या उमेदवारीला विरोध आहे. भाजप जिल्हा महामंत्री आशू गोंडाणे, अनुप ढोके हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. मात्र, ही जागा शिंदेसेनेच्याच वाट्याला जाणार, हे जवळजवळ निश्चित झाले आहे.

हेही वाचा >>>तब्बल २० वर्षांनी निलेश राणे धनुष्यबाण हातात घेणार

साकोली मतदारसंघासाठी राष्ट्रवादीने आग्रह धरला आहे. आघाडीचे संभाव्य उमेदवार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मात देण्यासाठी त्यांचे पारंपरिक विरोधक खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दंड थोपाटले आहे. मात्र, ही जागा राष्ट्रवादीला सोडल्यास सामूहिक राजीनामे देणार, राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही, असा इशारा स्थानिक भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दिला आहे. येथून भाजपचे माजी आमदार बाळा काशिवार, डॉ. सोमदत्त करंजेकर, प्रकाश बाळबुधे यांच्या नावांची चर्चा आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अविनाश ब्राह्मणकर यांचे नाव समोर केले जात आहे. तुमसर मतदारसंघासाठीही महायुतीत रस्सीखेच सुरू आहे.

बंडखोरीची शक्यता

महायुतीतील इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे बंडखोरीची दाट शक्यता आहे. अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तीनही पक्षांतील हिरमोड झालेले इच्छुक इतर पक्षांकडून वा अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात. असे झाल्यास तीनही मतदारसंघात तिरंगी वा बहुरंगी लढत होऊन महायुती आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांचे राजकीय गणित बिघडण्याची शक्यता आहे.