अकोला : विधानसभा निवडणूक तोंडावर असताना जिल्ह्यात महाविकास आघाडीमध्ये मतदारसंघाच्या जागा वाटपाचे चित्र अस्पष्ट आहे. ‘मविआ’तील घटक पक्षांमध्ये मतदासंघांसाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली. कुठला पक्ष कोणत्या मतदारसंघातून लढणार हे निश्चित झाले नसल्याने इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिल्ह्यातील विधानसभेच्या पाच मतदारसंघांपैकी काँग्रेस व शिवसेना ठाकरे गट प्रत्येकी दोन, तर राष्ट्रवादी शरद पवार गट एका जागेवर लढण्याची शक्यता आहे. अकोला पूर्व मतदारसंघावरून काँग्रेस व शिवसेनेत पेच निर्माण होऊ शकतो.

जिल्ह्यात विधानसभा निवणुकीचे वारे वाहू लागले आहेत. राजकीय पक्षांसह इच्छुकांकडून तयारी सुरू झाली. महाविकास आघाडीमध्ये आता काँग्रेस, राष्ट्र्रवादीसह शिवसेना ठाकरे गटाचा समावेश असल्याने जागा वाटपाच्या चर्चेने जोर धरला. २००९ पासून जिल्ह्यात काँग्रेस व राष्ट्रवादी भोपळाही फोडू शकलेली नाही.

हेही वाचा >>>Delhi Politics : दिल्लीत भाजपा ‘आप’चा खेळ बिघडवणार? विधानसभेसाठी आखली ‘ही’ योजना

बाळापूर मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख प्रतिनिधित्व करीत असले तरी ते गेल्या वेळेस ते युतीमध्ये विजय झाले होते, हे वास्तव नाकारता येणार नाही. जागा वाटपावरून ‘मविआ’मध्ये ताण-तणावाची स्थिती आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीमध्ये अकोला पश्चिम, अकोला पूर्व व अकोट मतदारसंघातून काँग्रेस, तर मूर्तिजापूर आणि बाळापूर मतदारसंघातून राष्ट्रवादी लढली होती. आता शिवसेना ठाकरे गटाच्या रूपाने ‘मविआ’मध्ये तिसरा वाटेकरी आहे. बाळापूरमध्ये विद्यमान आमदार असल्याने ही जागा शिवसेना ठाकरे गटासाठी सोडली जाईल. उर्वरित चार मतदारसंघांमध्ये ओढाताण होण्याची चिन्हे आहेत.

भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या अकोला पश्चिम मतदारसंघात काँग्रेसच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. २०१९ मध्ये काँग्रेसने भाजपला कडवी झुंज दिली होती. त्यानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा काँग्रेसने आघाडी घेत भाजपची पिछेहाट झाल्याचे समोर आले. त्यामुळे अकोला पश्चिममधून पुन्हा एकदा भाजपच्या विरोधात काँग्रेस उतरणार असल्याचे निश्चित आहे. अकोट मतदारसंघावर काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना पक्षांचा दावा आहे. काँग्रेस पक्ष परंपरागतरित्या अकोटमधून सातत्याने लढत आला आहे. इतर पक्ष दावा करीत असले तरी काँग्रेस ही जागा सोडेल, असे चित्र नाही.

हेही वाचा >>>मंत्रालयात विधानसभा उपाध्यक्षांसह आमदारांच्या जाळ्यांवर उड्या मुख्यमंत्री भेट देत नसल्याने टोकाचे पाऊल

अकोला पूर्व मतदारसंघात काँग्रेसला सातत्याने पराभवाचा सामना करावा लागला असून पक्षाची कामगिरी देखील सुमार राहिली. त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटासाठी सोडण्याची मागणी होत आहे. शिवसेनेतील इच्छुकांमधून तयारी देखील सुरू केली. काँग्रेसकडेही इच्छुक आहेत. परंपरागत हा मतदारसंघ काँग्रेसचाच असल्याने तो पक्षाकडेच कायम राखण्यासाठी पदाधिकारी आग्रही आहेत. या मतदारसंघावरून काँग्रेस व शिवसेनेत ओढाताण होण्याचा अंदाज आहे. मूर्तिजापूर मतदारसंघातून पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा पवार गट लढण्याची दाट शक्यता आहे. जिल्ह्यातील जागा वाटपावरून मविआत संघर्षाची चिन्हे आहेत.

‘अकोला पश्चिम’साठी काँग्रेसमध्ये गर्दी अकोला पश्चिम मतदारसंघात पोषक वातावरण लक्षात घेता काँग्रेसमध्ये इच्छुकांची गर्दी आहे. येथून लढण्यासाठी काँग्रेसमध्ये १९ जण इच्छुक आहेत. उमेदवारी मिळवण्यावरूनच इच्छुकांमध्येच तीव्र स्पर्धा लागली. इच्छुकांची मोठी संख्या लक्षात घेता पक्षांतर्गत गटबाजी उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Embarrassment in mahavikas aghadi from akola east constituency assembly elections 2024 print politics news amy