सुजित तांबडे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचा उमेदवार निश्चित करण्यासाठी महाविकास आघाडीची संयुक्त बैठक अद्याप झाली नसताना काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी मिळण्यासाठी निवडणुकीला भावनिक रंग देण्यास सुरुवात केली आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म पुण्यात कसबा येथे झाला असल्याने हा मतदार संघ शिवसेनेला मिळावा, असा आग्रह शिवसेनेच्या ठाकरे गटाने धरला आहे. तर टिळक कुटुंबातील भाजपचा उमेदवार असेल तरच बिनविरोध निवडणूक करण्याचा निर्धार काँग्रेसने केला आहे. आतापर्यंत ही निवडणूक न लढविण्याच्या भूमिकेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने भूमिकेत बदल करून भाजपने यापूर्वीच्या पोटनिवडणुकांमध्ये उमेदवार दिल्यामुळे निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली आहे.
कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, महाविकास आघाडी आणि भाजपचा उमेदवार निश्चित झालेला नाही. भाजपने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत महाबैठक घेऊन दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश आणि मुलगा कुणाल; तसेच माजी सभागृह नेते गणेश बीडकर, धीरज घाटे आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने या पाच नावांची शिफारस केली आहे. पक्षाच्या राज्यस्तरावरून त्यापैकी तीन नावे केंद्र स्तरावर पाठविली जाणार असून, त्यानंतर एका नावावर शिक्कामार्तब होणार आहे.
हेही वाचा… पदवीधर’च्या निमित्ताने नगर जिल्ह्याचे राजकारण वेगळ्या वळणावरच, विखे-थोरात संघर्षालाही नवा आयाम
महाविकास आघाडीमध्ये उमेदवार निश्चित करण्यासाठी अद्याप प्राथमिक चर्चा झालेली नाही. काँग्रेसचे शहरातील प्रमुख नेते हे भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी काश्मिरला गेल्यामुळे महाविकास आघाडीची संयुक्त बैठक लांबणीवर पडली आहे. त्यापूर्वी तिन्ही पक्षांनी उमेदवारी मिळण्यासाठी दावा करत निवडणुकीला भावनिक रंग देण्यास सुरूवात केली आहे. गेल्या २५ वर्षांपासून कसबा विधानसभा मतदार संघात शिवसेना ही भाजपला साथ देत आली आहे. आता युती संपुष्टात आल्यामुळे पहिल्यांदाच या मतदार संघावर शिवसेनेच्या ठाकरे गटाने दावा केला आहे. त्यासाठी शिवसेनेने भावनिक मु्द्दा पुढे केला आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म पुण्यात कसबा येथे झाला. त्यामुळे यावेळी शिवसेेनेला उमेदवारी मिळावी, अशी मागणी केली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये शहरप्रमुख संजय मोरे यांना उमेदवारी देण्याचा ठराव करण्यात आला आहे.
हेही वाचा… काँग्रेसच्या अप्रतिष्ठेस जबाबदार कोण ?
याबाबत संजय मोरे म्हणाले, ‘कसबा मतदार संघासाठी शिवसेनेला उमेदवारी देण्याबाबतची मागणी करण्यात आली आहे. याबाबतची माहिती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कळविण्यात आली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म कसब्यातील आहे. त्यामुळे ही जागा शिवसेनेला मिळाली पाहिजे, असा आग्रह आहे. कसब्यामध्ये शिवसेनेची ताकद आहे. मात्र, मागील २५ वर्षे पक्षाने भाजपला साथ दिली. आता शिवसेनेला संधी आहे’.
हेही वाचा… कोकण शिक्षकमध्ये वाढलेल्या मतदानाचा फायदा कोणाला ?
काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्यासाठी प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी नगरसेवक रवींद्र धंगेकर, माजी महापौर कमल व्यवहारे, राज्य प्रवक्ते आणि माजी नगरसेवक गोपाळ तिवारी, शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा संगीता तिवारी यांची नावे चर्चेत आहेत. काँग्रेसनेही उमेदवारी मिळण्यासाठी भावनिक मुद्दा उपस्थित केला आहे. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील एकाला उमेदवारी दिल्यास निवडणूक बिनविरोध करण्याची भूमिका घेतली आहे. याबाबत काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी म्हणाले, ‘टिळक कुटुंबातील उमेदवार असल्यास काँग्रेस उमेदवार देणार नाही. मात्र, तसा प्रस्ताव भाजपकडून आला पाहिजे. अंतिम निर्णय हा पक्षश्रेष्ठींकडून घेतला जाईल’
हेही वाचा… स्थगितीच्या श्रेयासाठी काँग्रेसमध्येच संघर्ष! गोंडवाना विद्यापीठ सभागृह नामकरण प्रकरण
राष्ट्रवादी काँग्रेसने सुरुवातीला ही निवडणूक न लढविण्याचे जाहीर केले होते. मात्र, भाजपकडून पाच नावांची शिफारस आल्यानंतर तसेच शिवसेना आणि काँग्रेसकडून उमेदवारीसाठी दावा सुरू झाल्यावर या मतदार संघातील निवडणूक बिनविरोध करण्याची भूमिका बदलली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही उमेदवारांची चाचपणी सुरू केली असून, त्यासाठी आज बैठक घेण्यात येणार आहे.