संजीव कुलकर्णी
नांदेड : भारत जोडो यात्रा आता दोन हजार ६०० किलोमीटर चालून राजस्थानमध्ये पोचली असून पहिल्या टप्प्यात पायाला आलेले फोड, चालून होणारी दमछाक आता अंगवळणी पडली असली तरी भारत जोडोतील उत्साह १०० दिवसांनीही तेवढाच असल्याचे यात्रेत सहभागी असणारे भारत यात्री डॉ. श्रावण गोविंदराव रॅपनवाड यांनी सांगितले. येत्या काही दिवसात हरियाणा मार्गे ही यात्रा दिल्ली येथे पाेहोचणार असून येथे यात्रेचा दहा दिवस मुक्काम असणार आहे. या कालावधीमध्ये भारत यात्री व सिव्हिल सोसायटीतील कार्यकर्ते आपापल्या घरी जाऊन येऊ शकतात. मात्र, यात्रेतील उत्साह एवढा आहे, की तीन हजार ५७१ किलोमीटर चालत भारत भ्रमण करत काश्मीर गाठणे हे संविधान वाचविण्यासाठी आहे, हे माहीत असल्याने यात्रेतील कार्यकर्त्यांचा संकल्प दृढ होत असल्याचे आवर्जून सांगण्यात येत आहे !
तामिळनाडूमधून कन्याकुमारी येथून काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात प्रारंभ झालेली भारत जोडो यात्रा येत्या काही दिवसात हरियाणात पोहोचणार आहे. राहुल गांधी एवढे चालतील का, असा प्रश्नही कार्यकर्त्यांच्या मनात हाेता. अगदी चार- आठ दिवसात परत येऊ असेही काहींनी घरी सांगितले होते. पण निर्धार अधिक दृढ होत गेला आणि आता यात्रेने दोन हजार ६०० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे. पहिल्या टप्प्यात ‘माना पांव में छाले हैं,हम नहीं रुकनेवाले हैं’ या घोषवाक्याने उत्साह वाढविला. आता पुढील दीड महिन्यात एक हजार किलोमीटर चालण्याचा संकल्प नव्याने केला जात आहे.
हेही वाचा… किशोर कुमेरिया : लढवय्या शिवसैनिक
केरळात प्रवेश करताच यात्रेने विशाल रूप धारण केले हाेते. केरळातील काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या केरळातून के.सी.वेणुगोपाल असल्यामुळे एका शिस्तीत यात्रा पुढे जात हाेती. कर्नाटकातही खूप गर्दी होती पण त्याला शिस्त मात्र नव्हती. पोलिसांचा यात्रा अयशस्वी करण्याचा प्रयत्न दिसून येत होता. भाजपा सरकार असल्याचा परिणाम अगदी चालणाऱ्यांनाही जाणवत होता. पण डी.के.शिवकुमार व सिद्धरामय्यांसह सर्व नेत्यांनी ईडी च्या नोटीसला न घाबरता यात्रा यशस्वी केली. आंध्रप्रदेशात यात्रा कालावधी कमी, त्यामुळे प्रतिसादही जेमतेमच होता. त्याची उणीव तेलंगणात भरून निघाली, पण येथेही पोलीस विरोध करत असल्याचे वाटत राहिले. पण लोकांनी खूप साथ दिली असे रॅपनवाड आवर्जून सांगतात.
हेही वाचा… उस्मानाबादमध्ये शिंदे गटाला बळ
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या सूक्ष्मनियोजनात तयार प्रवेशसोहळ्याने सर्वांच्या अपेक्षा उंचावल्या. त्यामुळे महाराष्ट्रातील स्वागत कमालीचे चांगले असल्याची चर्चा आजही आहे. महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात भारत जोडो यात्रा गेल्यावर सुरुवातीला नियोजन लागायला अडचणी आल्या, पण नंतर खूप चांगला प्रतिसाद लाभला. तर सध्या राजस्थानात भारत जोडो यात्रा असून सर्वच बाबतीत उत्तमोत्तम आहे. आज भारत जोडो यात्रेचा शंभरावा दिवस असून राजस्थानात जयपूर येथे शुक्रवारी साजरा होणार आहे. आता यात्रेत रघुराम राजन यांच्यासह मेधाताई पाटकर, अमोल पालेकर,पूजा भट आदीचेहरेही सहभागी झाले. विविध क्षेत्रातील मान्यवरांमुळे यात्रेचे महत्व दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा… Maharashtra News Live : महाराष्ट्रातील प्रत्येक महत्त्वाची घडामोडी एका क्लिकवर…
ऊन,पाऊस, वारा अन आता कडाक्याची थंडी या कुठल्याही परिस्थितीत अद्यापि पदयात्रेची सकाळी सहाची वेळ चुकलेली नाही. वृद्ध, विकलांग, मुले, शेतकरी, महिला, दलित, युवक यांच्याशी संवाद करत यात्रा पुढे जाते आहे. शंभर दिवसांनी पुन्हा नवा उत्साह संचारला आहे.