मुंबई : आझाद मैदानावर गुरुवारी महायुती सरकारच्या पार पडलेल्या शपथविधी सोहळ्याला सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेच्या (शिंदे) कार्यकर्त्यांनी चक्क पाठ फिरवली होती. सरकारातील दुसरा घटक पक्ष अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे पाठीराखे या सोहळ्याला तुरळक प्रमाणात होते. शपथविधी समारंभावर सारी छाप ही भाजपची होती. महायुती सरकारची लाडकी बहीण योजना यशस्वी ठरल्याच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींची उपस्थिती मोठी होती.
शपथविधी समारंभासाठी चार मंडप होते. त्यांचे कापड भगवे होते. अगदी स्टॉलसुद्धा भगव्या कापडाचे होते. मंडपामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अहिल्यादेवी होळकर, बिरसा मुंडा, दीनदयाळ उपाध्याय, बाळासाहेब ठाकरे यांच्या मोठ्या प्रतिमा लावल्या होत्या. मैदान परिसरात महायुतीच्या तिन्ही पक्षांचे झेंडे होते, तरी उपस्थितांमध्ये बहुतांश कार्यकर्ते केवळ भाजपचे होते. ‘एक है तो सेफ है’ घोषणेचे टी- शर्ट परिधान केलेले कार्यकर्ते हजरोंच्या संख्येत होते. कार्यकर्त्यांच्या हाती ‘देवाभाऊ’ लिहिलेले फलक होते. नरेंद्र मोदी यांचे मुखवटे लाऊन अनके कार्यकर्ते कार्यक्रमस्थळी होते.
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी आज गुलाबी जॅकेट्स परिधान केली होती, तरी लाडक्या बहिणी कमळ चिन्हाच्या भगव्या साडीत आल्या होत्या. घड्याळाचा कार्यकर्ता क्वचित दृष्टीस पडत होता. उपस्थितांमध्ये मुंबईतील आणि त्यातही हिंदीभाषक महिला-पुरुष यांचा मोठा भरणा होता. मैदानावर धूळ असल्याने प्रवेशदारी मास्क दिले जात होते.