काँग्रेस नेते राहुल गांधींनी त्यांच्या कुटुंबाशी संबंधित इतिहास, महात्मा गांधींच्या दक्षिण आफ्रिकेतील रेल्वे घटनेचा आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास सांगताना चूक केल्यानंतर ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. काँग्रेस पक्षातील त्यांचे सहकारी संदीप दीक्षित यांनी राहुल गांधी यांची मुलाखत घेतली. राहुल गांधी यांच्या एक्स हँडलवर आणि यूट्यूब चॅनेलवर हे संभाषण पोस्ट करण्यात आले आहे. यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले, “महात्मा गांधींना यूकेमध्ये ट्रेनमधून बाहेर फेकण्यात आले. त्यानंतर त्यांचे पणजोबा आणि त्यांच्या चुलतभावांनी अपमानाचा बदला घेतला. भाजपाचे नेते अमित मालवीय यांनी एक्सवर पोस्ट करीत राहुल गांधींवर टीका केली आहे. “राहुल गांधींना असे व्लॉग्स बनवण्याची आवड आहे आणि त्यांची भाषणं ऐकणाऱ्यांना ते फ्री पास देतात. ” ७ जून १८९३ रोजी राहुल गांधींनी दावा केल्याप्रमाणे दक्षिण आफ्रिकेतील पीटरमॅरिट्झबर्ग रेल्वेस्थानकावर महात्मा गांधींना ट्रेनमधून बाहेर फेकण्यात आले होते; इंग्लंडमध्ये नाही. ते प्रथम श्रेणीच्या डब्यातून प्रवास करीत होते, ज्याचं तिकीट त्यांच्याकडे नव्हतं. मात्र, तिथल्याच एका ब्रिटीश प्रवाशाने गांधींच्या प्रथम श्रेणी डब्यातून प्रवास करण्याबाबत आक्षेप घेतला. महात्मा गांधींच्या विरोधाला न जुमानता त्यांना जबरदस्तीने ट्रेनमधून उतरवण्यात आले”, असे मालवीय यांनी म्हटले आहे.

अमित मालवीय पुढे म्हणाले, “राहुल गांधींचे पणजोबा जवाहरलाल नेहरू त्यावेळी फक्त तीन वर्षे सात महिन्यांचे होते. त्यामुळे त्यांनी अलाहाबाद रेल्वेस्थानकावर जाऊन काही ब्रिटिशांना सूड म्हणून हाकलून लावले, असा दावा करणं हे निव्वळ हास्यास्पद आहे. तरीही राहुल गांधी नियमितपणे अशी गरळ ओकत असतात आणि काही माध्यमं ती अनाठायीपणे वापरतात”. राज्यसभेचे खासदार लहर सिंग सिरोया यांनीही राहुल गांधींच्या या चुकीच्या विधानाकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, “राहुल यांच्याकडून कोणीही इतिहास शिकू नये. यूकेमध्ये महात्मा गांधींना ट्रेनमधून बाहेर फेकल्याची घटना कधी घडलीच नव्हती. “मी ही मुलाखत उत्सुकतेने पाहिली कारण- राहुल गांधी त्यांचे पणजोबा पंडित नेहरूंबद्दल बोलत होते. असं असतानाही जेव्हा मी त्यांना महात्मा गांधींना इंग्लंडमध्ये ट्रेनमधून बाहेर फेकल्याचे ऐकले तेव्हा मी खूप निराश झालो,” असे सिरोया यांनी म्हटले. महात्मा गांधींना इंग्लंडमध्ये नाही, तर दक्षिण आफ्रिकेत ट्रेनमधून बाहेर फेकण्यात आलं होतं हे भाजपा आमदारानं निदर्शनास आणलं.

“मी माझ्या दुसऱ्या फोनवर व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे जेणेकरून नंतर ते लपवण्यासाठी एडिट करू शकतात. मी यूट्यबुच्या कॅप्शनचादेखील फोटो काढून ठेवला आहे. राहुल गांधी नेमके काय म्हणालेत ते यात आहे. राहुल यांच्याकडून कोणीही इतिहास शिकू नये. माझ्यासारख्या उच्चशिक्षित नसेल्या व्यक्तीलासुद्धा माहीत आहे की, गांधींजींना दक्षिण आफ्रिकेत ट्रेनमधून बाहेर काढण्यात आलं होतं. नेहरू सेंटरच्या लोकांना आणि सर्व बुद्धिमान काँग्रेसजनांना आणि संदीप दीक्षित यांच्यासारख्या व्यक्तीला व्हिडीओ प्रसिद्ध करण्यापूर्वी ही चूक लक्षात आली नाही हे दु:खद आहे”, असे भाजपा खासदार पुढे म्हणाले. १८९३ मध्ये महात्मा गांधींसोबत ही घटना घटली तेव्हा जवाहरलाल नेहरू फक्त चार वर्षांचे होते, असे म्हणत सिरोया यांनीही राहुल यांच्यावर टीकास्त्र सोडले. “राहुल यांनी व्हिडीओमध्ये असेही म्हटले की, त्यांचे पणजोबा आणि त्यांचे चुलतभाऊ महात्मा गांधीजींच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी काही ब्रिटिशांना प्रथम श्रेणीच्या डब्यातून हाकलून लावण्यासाठी अलाहाबाद रेल्वे स्टेशनवर गेले होते. अवघा चार वर्षांचा मुलगा अलाहाबादच्या रेल्वे स्टेशनवर निषेध करण्यासाठी गेला होता का?” असेही ते म्हणाले.

पीटरमॅरिट्झबर्ग रेल्वे स्टेशनची घटना
७ जून १८९३ या दिवशी पीटरमॅरिट्झबर्ग रेल्वे स्टेशनची घटना घडली. एक तरूण वकील, महात्मा गांधी यांना दक्षिण आफ्रिकेतील प्रथम श्रेणीच्या रेल्वे डब्यातून बाहेर काढण्यात आले. ही घटना वांशिक भेदभावाचा परिणाम होती. त्यावेळी केवळ रंगाने गोरे असलेल्यांनाच प्रथम श्रेणीच्या रेल्वे डब्यात प्रवेश दिला जात. महात्मा गांधींच्या आयुष्यात आणि वांशिक भेदभावाविरूद्धच्या त्यांच्या लढाईत एक महत्त्वाचा टप्पा असल्याने या घटनेला महत्त्व आहेच. ही घटना राजकीय बदलाकडे गांधीजींचा दृष्टिकोन बदलण्यात महत्त्वाची ठरली. याचा परिणाम शेवटी भारतीय स्वातंत्र्य चळवळीवर झाला.

जवाहरलाल नेहरूंचे कौतुक
३२ मिनिटांच्या या संभाषणात राहुल गांधींनी त्यांच्या राजकीय प्रवासामागच्या प्रेरणांबाबत खुलासा केला. त्यांचे पणजोबा जवाहरलाल नेहरूंकडून त्यांनी प्रेरणा घेतल्याचे राहुल गांधींनी सांगितले. या पॉडकास्टमधील संभाषणावर राहुल गांधी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “संदीप दीक्षित यांच्याशी झालेल्या संभाषणात मी मला प्रेरणा कशी मिळते, सत्याचा शोध आणि त्यासाठी प्रयत्न कसे करावेत याबद्दल बोललो आहे. माझे पणजोबा फक्त एक राजकारणी नव्हते, तर ते एक महान विचारवंत होते. त्यांचा सर्वांत मोठा वारसा हा त्यांच्या सत्यासाठीच्या अथक पाठपुराव्यांमध्ये आहे. त्यांनी आम्हाला राजकारण शिकवले नाही. त्यांनी आम्हाला भीतीचा सामना करायला आणि सत्यासाठी उभं रहायला शिकवलं. शोधण्याची, प्रश्न विचारण्याची, कुतूहलात राहण्याची गरज याबाबत शिकवलं आणि हे माझ्या रक्तात आहे,” असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले आहे.