सांगली : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आपण थोरल्या म्हणजेच शरद पवार यांच्या नेतृत्वाखालीच कायम राहणार असल्याचे सांगत फुटीर गट अथवा भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचे निक्षून सांगितले. मात्र, त्यांच्या खुलाशाने जिल्ह्यातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मनातील संशय दूर झाला असला तरी भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते अद्याप विश्‍वास ठेवण्यास तयार नाहीत. कार्यकर्ते साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण असे जरी म्हणत असले तरी संशयाचे मानेवरील भूत उतरण्यासाठी एखाद्या निवडणुकीचा उताराच जालीम ठरू शकतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आमदार पाटील हे केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांना भेटले, चर्चा केली, त्यांच्यासाठी राष्ट्रवादीच्या कोट्यातील एक मंत्रीपद राखीव ठेवण्यात आले, अगदी त्यांना पूर्वीचेच म्हणजे जलसंपदा खाते देण्यात येणार, स्वातंत्र्यदिनापूर्वी म्हणजे १५ ऑगस्टपूर्वी साहेबांचा शपथविधी होणार अशा बातम्या येत होत्या. मात्र, आमदार पाटील यांनी रविवारी या वृत्ताचे खंडण करीत आपण पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर पक्ष वाढीसाठी कायम प्रयत्नशील राहणार, प्रसारित करण्यात येत असलेल्या बातम्या या तथ्यहिन, बदनामी करण्यासाठीच असून आपले या बातम्यामुळे मनोरंजन होत असल्याचे सांगितले. मात्र, चर्चेचा उडालेला धुरळा अद्याप खाली बसलेला नाही. कारण याच पद्धतीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी चर्चेचा खुलासा करीत असताना मरेपर्यंत आपण राष्ट्रवादी सोडणार नसल्याचे वक्तव्य करीत दिलेला शब्द पाळत सवती चूल मांडत सरकारमध्ये सहभागी झाले हा काल – परवाचा इतिहास आहे. राजकारणात जे करायचे ते कधी ओठात बाहेर पडणार नाही याची दक्षता नेते घेत असतात. यामुळे आज जरी आमदार पाटील थोरल्या पवारांसोबत असल्याचे सांगत असले तरी यावर सहजासहजी विश्‍वास ठेवायला कार्यकर्ते राजी नाहीत.

हेही वाचा – NTC सुधारणा विधेयक आज राज्यसभेत, सर्व खासदारांनी उपस्थित राहावे यासाठी काँग्रेसकडून व्हीप!

लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. येणार्‍या निवडणुकीत इंडिया विरुद्ध भाजप प्रणित एनडीए अशी लढत होणार असे दिसत आहे. या पार्श्‍वभूमीवर भाजपला अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी तडजोडीही कराव्या लागत आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रामध्ये सांगली आणि हातकणंगले मतदारसंघात भाजपला निर्विवाद वर्चस्व हवे आहे. यासाठी भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सांगलीची जागा विनासायास मिळावी यासाठी पडद्याआडच्या हालचालींनी गती घेतली आहे.

गत निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांची उमेदवारी भाजपच्या पथ्यावर पडली. आता वेगळी चाल खेळली जाण्याची शक्यता दिसत असून भाजपचेच माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी उमेदवारीसाठी पक्षाअंतर्गत प्रयत्न सुरू केले आहेत. विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांना पक्षाअंतर्गत विरोधाला तोंड द्यावे लागण्याची चिन्हे दिसत आहेत. याचबरोबर हातकणंगले मतदारसंघामध्ये शिराळा आणि वाळवा हे दोन मतदारसंघ महत्त्वाचे असून या मतदारसंघामध्ये आमदार पाटील यांची ताकद आहे. ही ताकद जर भाजपला मिळाली तर हवीच आहे. यासाठी विरोधकांच्या तंबूमध्ये अविश्‍वासाचे वातावरण तयार करण्यासाठीच चर्चेचे भूत उभे केले असण्याची शक्यता असू शकते. मात्र आज जरी आमदार पाटील यांनी भाजप अथवा अजितदादा गटात सहभागी होणार नसल्याची ग्वाही दिली असली तरी चर्चेचे भूत उभे करण्यात विरोधक आहेत असा थेट आरोप न करता त्यांनी चर्चेच्या मुळाशी माध्यमेच असल्याचे सांगून भाजपला थेट प्रत्युत्तर देण्याचे टाळले. आमदार पाटील यांचा नकार येताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांची आणि आमदार पाटील यांची भेटच झाली नसल्याचा खुलासा तातडीने केला. यातून कार्यकर्त्यांनी काय बोध घ्यायचा तो त्यांच्या त्यांच्या कुवतीवर सोडण्यात आला. मात्र, आमदार पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने राष्ट्रवादीपेक्षा भाजपमध्ये अस्वस्थता अधिक निर्माण झाली आहे. कारण आमदार पाटील यांना विरोध करूनच अनेक भाजप कार्यकर्त्यांची राजकीय मोर्चेबांधणी होत आली आहे.

हेही वाचा – अलिबागच्या पारपत्र कार्यालयावरून राजकीय श्रेयवाद

अगदी अजित पवार यांच्या भ्रष्ट कारभाराचा वेळोवेळी पंचनामा करत या कार्यकर्त्यांनी भाजपच्या गडाची बांधणी केली आणि अचानकपणे पवारच सरकारमध्ये सहभागी झाले. आताही तसेच होणार नाही याची खात्री कोण देणार? महापालिकेत जनतेने सत्ता देऊनही आमदार पाटील यांनी करेक्ट कार्यक्रम करत महापालिकेत सत्ता बळकावली. यामुळे निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी राष्ट्रवादीला आता तळागाळापर्यंत पुन्हा पोहोचावे लागणार आहे. संशयाचे मानेवरील भूत उतरण्यासाठी एखाद्या निवडणुकीचा उताराच जालीम ठरू शकतो.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Even after jayant patil disclosure suspicion remains among party workers print politics news ssb