उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याला १६०० प्रतिष्ठित पाहुण्यांसह सुमारे ८ हजार निमंत्रित उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि RSS सरसंघचालक मोहन भागवत मंदिराच्या उद्घाटन समारंभाला संबोधित करणार आहेत. संघ परिवार ‘सबके राम’चा नारा देत देशभर रामाचा प्रचार करणार आहे. या मोहिमेअंतर्गत RSS आणि VHP चे सदस्य ‘अक्षत (तांदूळ)’ वाटपासाठी १ जानेवारी ते १५ जानेवारीदरम्यान देशभरात घरोघरी जाऊन मोहीम राबवणार आहेत. २२ जानेवारी रोजी राम मंदिराच्या उद्घाटनानिमित्त लोकांना त्यांच्या स्थानिक मंदिरांमध्ये मेळावे आयोजित करण्यासही सांगितले जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

RSS च्या एका व्यक्तीने इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, “लोक अयोध्येवर लक्ष केंद्रित करीत आहेत, परंतु २२ जानेवारीला राष्ट्रीय पातळीवर एक मोठा कार्यक्रम होणार आहे. जगभरातही अशा पद्धतीचे काही कार्यक्रम होणार आहेत. अयोध्या प्राण प्रतिष्ठेशी जुळणारे स्थानिक कार्यक्रमदेखील ऑनलाइन लाइव्ह दाखवण्यात येणार आहेत, ज्यामुळे देशाच्या काही भागांना आणि जगाला (अयोध्येत काय घडत आहे) याची अनुभूती मिळेल.” विशेष म्हणजे संघ या कार्यक्रमातील यात्रेकरूंच्या प्रवासाची व्यवस्था पाहणार आहे. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर २८ राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेशा (UTs)तील एक लाखाहून अधिक लोक राम मंदिराच्या दर्शनासाठी २७ जानेवारी ते २२ फेब्रुवारीदरम्यान उत्तर प्रदेशातील अयोध्येला जाणार असून, ४४ विशेष गाड्यांमधून ते अयोध्येला येतील, यासाठी संघ परिवार प्रयत्नशील आहे. २२ जानेवारी रोजी होणार्‍या रामलल्ला अभिषेक सोहळ्यानंतर मंदिराचा उत्साह कमी होऊ नये, यासाठी संघ परिवार देशभरातील या भक्तांसाठी अयोध्या मंदिराचा मार्गदर्शित दौरा आयोजित करणार आहे.

हेही वाचाः आता टाटा समूह थेट नेस्लेच्या मॅगीला देणार टक्कर, ‘ही’ कंपनी खरेदी करणार

संघाच्या सूत्रांनी सांगितले की, एक लाख यात्रेकरूंमध्ये अयोध्या रामजन्मभूमी मोहिमेतील सहभागापासून मंदिरासाठी आर्थिक देणगी देण्यापर्यंत अनेक वर्षांपासून मंदिराच्या बांधकामात योगदान देणाऱ्यांचा समावेश असेल. “मंदिराच्या उभारणीसाठी ज्यांनी बलिदान दिले आहे किंवा कोणतेही योगदान दिले आहे, अशा लोकांची आणि त्यांच्या कुटुंबीयांना इथे बोलावले जाणार असून, त्यांच्या व्यवस्थेची जबाबदारी विहिंप घेणार आहे. यामध्ये रथयात्रेचे भाग राहिलेल्या कारसेवकांचा समावेश असेल, ज्यांनी देशाच्या विविध भागात आंदोलनाच्या समर्थनार्थ कार्यक्रम आयोजित केलेत, ज्यांनी राम मंदिर निधी आणि इतर कामांसाठी महत्त्वपूर्ण आर्थिक योगदान दिले,” असंही विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष आलोक कुमार यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले.

हेही वाचाः Nifty At All time High: निफ्टीनं रचला तेजीचा नवा विक्रम, ऐतिहासिक उच्चांक गाठला, आयटी कंपन्यांचे शेअर्स वधारले

२२ जानेवारीच्या समारंभानंतर केवळ “राम मंदिराचा दिवा राष्ट्रीय चेतनेत तेवत ठेवेल,” असे नाही तर मंदिराच्या उभारणीसाठी ज्यांनी आपापल्या परीने योगदान दिले, त्यांच्याबद्दल “कृतज्ञता व्यक्त”सुद्धा केली जाणार आहे. अयोध्येतील अभिषेक सोहळ्याला ज्या कार्यकर्त्यांना आमंत्रित करता आले नाही, त्यांना अयोध्येला बोलावण्यात येणार आहे. तसेच विहिंपने आधीच देशभरातील आपल्या कार्यकर्त्यांना त्यासाठी कामाला लावले असून, त्यांच्याकडे अशा निमंत्रितांची ओळख पटवण्याची आणि अयोध्येला त्यांच्या प्रवासाची व्यवस्था करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

“संपूर्ण देश ४५ झोनमध्ये विभागला गेला आहे आणि प्रत्येक झोनमध्ये सुमारे १५०० ते २५०० यात्रेकरूंचा कोटा आहे, जे अयोध्येसाठी प्रवास करणार आहेत. यासाठी २७ जानेवारी ते २२ फेब्रुवारीदरम्यान ४४ विशेष गाड्या चालवण्याची विनंती रेल्वे मंत्रालयाला करण्यात आली आहे. यात्रेकरू आल्यानंतर त्यांची राहण्याची, भोजन आणि दर्शनाची सर्व व्यवस्था आमच्याकडून केली जाणार आहे,” असेही आलोक कुमार म्हणाले. गैर हिंदी भाषिक राज्यांतील लोकांना तीर्थक्षेत्रासाठी मार्गक्रमण करताना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी संघ परिवाराने अशा राज्यांतील आपल्या कार्यकर्त्यांना त्यांच्या मदतीसाठी ठेवण्याची योजना आखली आहे. विशेष म्हणजे या कार्यकर्त्यांना यात्रेकरूनच्या आगमनाच्या १० दिवस आधी अयोध्येला बोलावले जाणार आहे. या कार्यकर्त्यांना गुजरात, महाराष्ट्र, ओडिशा आणि पश्चिम बंगाल व्यतिरिक्त दक्षिणेकडील अशा राज्यांतील अभ्यागत गटांशी जोडण्यात येणार असून, ते प्रवाशांची काळजी घेणार आहेत.

“हे स्वयंसेवक शहराभोवती यात्रेकरूंना मार्गदर्शन करतील, त्यांना त्यांच्या मुक्कामास मदत करतील, मंदिराला भेट देतील आणि तेथे प्रार्थना करतील,” असे विश्व हिंदू परिषदेच्या नेत्याने सांगितले. हे यात्रेकरू दोन दिवस अयोध्येत राहण्याची अपेक्षा आहे, असे सांगून विहिंपचे प्रवक्ते विनोद बन्सल म्हणाले की, त्यांच्यासाठी तंबू उभारलेल्या शहरात विशेष व्यवस्था केली जाणार आहे. त्यापैकी पहिला गट उत्तराखंड, त्यानंतर दिल्ली आणि झारखंडमधून इतर राज्यांतून येण्याची अपेक्षा आहे, असेही त्यांनी सांगितलं.

बन्सल म्हणाले की, जेथे रेल्वे सेवा नाहीत, तेथील लोकांना त्यांच्या जवळच्या रेल्वे स्थानकावर नेण्यासाठी विविध भागांमध्ये व्यवस्थादेखील केली जात आहे. “हे केवळ आयोजन (इव्हेंट) नाही, तर ही एक महायोजना आहे. हे पूर्ण झाल्यानंतर असे आणखी टूर नियोजित केले जाऊ शकतात,” याशिवाय २५ जानेवारीनंतर देशातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून सुमारे १० हजार लोकांना अयोध्येची सैर घडवून आणण्याची सत्ताधारी भाजपची योजना आहे. या संदर्भात निर्णय घेण्यात आला आल्यास त्याची कार्यपद्धतीसुद्धा पक्षाकडून तयार केली जाणार आहे आहे. एप्रिल-मेमध्ये लोकसभा निवडणुका होणार असल्याने मार्च अखेरपर्यंत ही कसरत सुरू राहणार असल्याचं बोललं जात आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Even after the inauguration of ram mandir the sangh parivar will make ayodhya turn what is the exact plan vrd
Show comments