सांगली : राजकीय वारसा कुटुंबातील व्यक्तींनाच देण्याचा पायंडा पडला असताना आता सहकार क्षेत्रातील कार्याचाही वारसा वारसदारांच्याच हाती देण्याचा पायंडा रुजू झाला आहे. वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्षपद दादांचे नातू विशाल पाटील यांच्या हाती येऊन दोन दशकांचा कालावधी झाल्यानंतर इस्लामपूरच्या राजारामबापू सहकारी साखर कारखान्याची सूत्रे प्रतिक पाटील यांच्या हाती सोपविण्यात आली. हाच कित्ता कुंडलच्या क्रांती सहकारी साखर कारखान्याबाबत गिरवण्यात आला असून कारखान्याची सूत्रे शरद लाड या युवा नेतृत्वाकडे सोपविण्यात आली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिल्ह्याला सहकाराची परंपरा लाभली आहे. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, गुलाबराव पाटील, राजारामबापू पाटील, आबासाहेब शिंदे आदींनी जिल्ह्यात सहकार चळवळ रूजवली. एकेकाळी जिल्ह्याची अर्थ वाहिनी असलेली ही सहकारी चळवळ अंतिम घटका मोजत आहे. सहकारातील विविध संस्थांमुळे पश्‍चिम महाराष्ट्रात आर्थिक स्थिरता लाभली. आज सहकाराचे जाळे गावपातळीपासून विणले गेले आहे. गाव पातळीवरच्या विकास सोसायटींनी सामान्य माणसाला पत मिळवून देण्याचे काम करताना आर्थिक पाठबळही मिळवून दिले. यामुळे सहकाराची गरज कायम राहणारच आहे. यातूनच गावखेड्याचा विकास साध्य होणार आहे हे त्रिवार सत्य असताना गेल्या काही वर्षांमध्ये सहकारी संस्था म्हणजे राजकीय अड्डे बनल्याने आर्थिक घडीच विस्कटली आहे. अशा स्थितीत या क्षेत्रात नवे तरुण उमदे नेतृत्व येत असेल तर समाजाला आणि सहकाराला नवी दिशा देण्यासाठी ही आश्‍वासक सुरुवात म्हणता येईल.

हेही वाचा – दिल्लीत १८ जुलै रोजी NDA ची बैठक, सर्व पक्षांना आमंत्रण; लोकसभा निवडणुकीवर होणार महत्त्वाची चर्चा!

बंद पडलेला वसंतदादा साखर कारखाना निदान भाडेकराराने तर चालू झाला. कार्यक्षेत्रातील उसाला यामुळे गळिताची संधी तर मिळाली. राजारामबापू कारखान्याचे सध्या चार युनिट सुरू असून गाळपही चांगले होत आहे. आता इथेनॉल उत्पादनाकडे लक्ष वळविले असल्याने अतिरिक्त साखर उत्पादनाची समस्या काही प्रमाणात सुसह्य झाली आहे. नवीन तंत्रज्ञान यामध्ये येऊ घातले आहे. राजकीय सोयीसाठी होणारी कामगार भरतीही आता बंद होत आली असून खासगी कारखानदारीप्रमाणे सहकारातही व्यावसायिकता येऊ लागली आहे. तरुण पिढीच्या समस्या, तरुणांच्या अपेक्षा या आता बदलल्या आहेत. या बदलाची जाणीव सहकारातील तरुण नेतृत्वाने ठेवली तर निश्‍चितच स्वागतार्ह म्हणावे लागेल.

ज्याप्रमाणे राजारामबापू, वसंतदादा या कारखान्याच्या नेतृत्वात बदल झाले, त्याच पद्धतीने कुंडलच्या क्रांती कारखान्यातही नेतृत्व बदल झाला आहे. शिराळ्याच्या विश्‍वास कारखान्यातही विराज नाईक यांच्यासारख्या नव्या तरुणाला संचालकपदाची संधी देण्यात आली आहे. सहकारात आलेला नव्या वारसदारांचा धडाका कसा आहे हे कळायला आणखी काही काळ द्यावा लागणार असला तरी नव्या पिढीच्या कल्पना नव्याने रुजविण्याची संधी या नेतृत्वाने साधली तर निश्‍चितच सहकारामध्ये आशादायक चित्र दिसू शकेल. अन्यथा राजकीय अड्डे झाले तर डोंगराई, तासगाव, यशवंत, माणगंगा, महांंकाली या कारखान्याची झालेली अवस्था सगळे पाहतच आहेत. तीच गत या कारखान्याची होण्यास वेळ लागणार नाही.

हेही वाचा – ममता बॅनर्जी, अभिषेक बॅनर्जी विरोधकांच्या बैठकीला उपस्थित राहणार, काँग्रेसवर नाराजी व्यक्त करण्याची शक्यता!

आमदार जयंत पाटील यांचे पुत्र प्रतिक पाटील यांचे पहिले पाऊल सहकाराच्या क्षेत्रातून पडले आहे. मात्र, शरद लाड यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपला राजकीय प्रवास सुरू केला आहे. जिल्हा परिषदेत त्यांनी राष्ट्रवादीचे पक्ष प्रतोद म्हणून काम केले आहे. क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड यांचा वारसा आमदार अरुण लाड यांच्या माध्यमातून त्यांना मिळाला आहे. आता सहकाराच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी या तरुणांना मिळाली आहे. त्याचा उपयोग राजकारणासाठी केला जातो की समाजकारणासाठी यावर त्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून असणाार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Even in cooperatives handing over leadership to the heirs began print politics news ssb