लोकसत्ता वार्ताहर
उदयपूर येथील काँग्रेस पक्षाच्या चिंतन शिबिरात मांडण्यात येणाऱ्या राजकीय ठरावाच्या समितीत महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना स्थान देताना काँग्रेस श्रेष्ठींनी दुसरे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज (बाबा) चव्हाण यांना या शिबिराच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्यात कोठेही स्थान दिले नाही. राजकीयदृष्ट्या ही बाब महत्त्वाची मानली जात आहे.
२०१९ ची लोकसभा निवडणूक तसेच अलीकडे पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत काँग्रेसचा दारूण पराभव झाला. दरम्यानच्या काळात पक्षातील २३ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र पाठवून काही मुद्दे उपस्थित केले होते. त्या पत्रावर महाराष्ट्रातून पृथ्वीराज चव्हाण यांचीही स्वाक्षरी होती. तेव्हापासून ते पक्षनेतृत्वापासून दुरावले होते.अलीकडच्या काळात सोनिया गाधी यांनी पक्षातल्या वेगवेगळ्या नेत्यांशी स्वतंत्रपणे वा गटागटाने संवाद साधला होता. पत्रावर सह्या करणाऱ्या काही नेत्यांनी नंतर नेतृत्वाशी जुळवून घेतले; पण पृथ्वीराज चव्हाण यांना मात्र गांधी यांनी विशेष महत्त्व दिले नाही, अशी चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी ते गांधी यांना भेटलेही होते. चव्हाण यांचा दीर्घ अनुभव, राजकीय व अन्य प्रश्नांवरील त्यांचे आकलन, त्यांची मांडणी, भाषेवरील प्रभुत्त्व इत्यादी बाबी लक्षात घेता पक्षाच्या शिबिरात त्यांना महत्त्वाची जबाबदारी देणे अपेक्षित होते; मात्र दिल्लीतील नेत्यांनी अशोक चव्हाण यांच्यासह प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक, आ.प्रणिती शिंदे प्रभृतींना सामावून घेतले.
उदयपूर येथील चिंतन शिबिरामध्ये राजकीय ठराव मांडण्यासाठी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापण्यात आली होती. त्यात इतर ज्येष्ठ नेत्यांसोबत अशोक चव्हाण यांचा समावेश करण्यात आला. आर्थिक ठरावाच्या समितीत महाराष्ट्रातून प्रणिती शिंदे यांचा समावेश आहे. ‘शेती व शेतकरी’ या विषयावरील ठरावाच्या समितीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचा समावेश आहे. अन्य एका समितीच्या प्रमुख पदाची जबाबदारी मुकुल वासनिकांकडे देण्यात आली आहे. महाराष्ट्रातून या चार नेत्यांचा पक्षसंघटनेतील कामात समावेश केला जात असताना पक्षात ज्येष्ठ असलेेल्या पृथ्वीराज चव्हाण यांना कोठेही स्थान मिळालेले नाही.
राहुल ब्रिगेडमधील तरुण नेते राजीव सातव यांचे गतवर्षी अकाली निधन झाल्यानंतर काँग्रेसच्या राष्ट्रीय पक्ष संघटनेेत महाराष्ट्रातून कोणालाही महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले नाही. दरम्यान, काँग्रेसचे महासचिव के.सी.वेणुगोपाल आणि अशोक चव्हाण यांच्यात चांगला समन्वय निर्माण झाला. चव्हाण नियमित त्यांच्या संपर्कात असल्याचे कार्यकर्ते सांगतात. या समन्वयामुळेच अलीकडे चव्हाणांचे विश्वासू सहकारी अमर राजूरकर यांची महाराष्ट्र विधान परिषदेतील पक्षाचे गटनेते म्हणून निवड झाली होती.
काँग्रेसच्या बहूचर्चित चिंतन शिबिराची चर्चा आता सुरू असतानाच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबईत ‘लोकसत्ता’च्या एका कार्यक्रमात पक्षासंदर्भात अतिशय परखड मतप्रदर्शन केेले. भाजपला सक्षम पर्याय देण्यात कमी पडल्यास काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही पुढच्या पिढीचे गुन्हेगार ठरू, असे वक्तव्य त्यांनी केल्यानंतर पक्षश्रेष्ठी त्याबाबत काय कृती करतात, याकडे लक्ष लागले आहे.