कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीचं पडघम यावर्षी वाजणार आहे. यासाठी सत्ताधारी भाजपा, काँग्रेस आणि जनता दल ( संयुक्त ) यांनी तयारी सुरु केली आहे. अशात आरोप-प्रत्यारोपांची फैरी झडत आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान मोदी यांची तुलना हुकूमशहा अडॉल्फ हिटलर बरोबर केली आहे.
उड्डपी येथे बोलताना सिद्धरामय्या म्हणाले, “ते पंतप्रधान असल्याने कर्नाटकात येऊ शकतात. यावर आमचा कोणताही आक्षेप नाही आहे. पण, येथे येऊन १०० वेळा भाजपा सत्तेत येणार असं पंतप्रधान सांगत असतील, तर स्पष्ट करतो असं होणार नाही. हिटलर सुद्धा आपल्या तोऱ्यात फिरत होता. मुसोलिनी आणि फ्रेंकोचं काय झालं? पंतप्रधान मोदी सुद्धा काही दिवस फिरतील. तसेच, थोडेच दिवस पंतप्रधान मोदींची सत्ता राहिली आहे,” असा हल्लाबोल सिद्धरामय्या यांनी केला.
हेही वाचा : दिल्ली महापालिकेतील गदारोळानंतर अखेर निवडून आलेले नगरसेवक घेणार पहिल्यांदा शपथ!
यानंतर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सिद्धरामय्या यांना प्रत्युत्तर देत काँग्रेसला सवाल विचारला आहे. “सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान मोदींची तुलना हिटलबरोबर केली ही काँग्रेसची भूमिका आहे का? सिद्धरामय्या आजही मल्लिकार्जुन खर्गे यांना पक्षाचं अध्यक्ष म्हणून स्वीकारण्यास तयार नाहीत. ते फक्त राहुल गांधींचं समर्थन करतात. खर्गे नाममात्र पक्षाचे अध्यक्ष आहेत. पण, मोदी हे लोकनियुक्त नेते आहेत. नियुक्त केलेले नाहीत. ते कोणत्या गांधी परिवारातून नाही आहेत,” असा टोला प्रल्हाद जोशी यांनी लगावला आहे.
हेही वाचा : केंद्र सरकारकडून बंदी, तरीही विरोधकांकडून केला जातोय शेअर; बीबीसीच्या माहितीपटावरून राजकारण तापलं!
तर, सिद्धरामय्या यांच्या वक्तव्यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी म्हटलं की, “अशा वक्तव्यांनी पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेला कोणतेही नुकसान होणार नाही. देशातील १३० कोटी लोकांना पंतप्रधानांचं व्यक्तिमत्व माहिती आहे. कोणाच्या बोलण्याने फरक पडणार नाही,” असं बोम्मई म्हणाले.