जम्मू-काश्मीरमधील गुरेझ येथील भाजपा नेते व माजी अपक्ष आमदार फकीर मोहम्मद खान यांनी गुरुवारी (ता. २०) स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. श्रीनगरमधील तुलसीबाग इथल्या सरकारी निवासस्थानात त्यांचा मृतदेह आढळला. ते ६२ वर्षांचे होते.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जम्मू-काश्मीर निवडणुकीत भाजपाचे फकीर मोहम्मद खान हे गुरेझ या मतदारसंघातून उभे राहिले होते. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी खान यांच्यासाठी प्रचार केला होता. विजय मिळविण्यासाठी भाजपाने खान यांच्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते. मात्र, नॅशनल कॉन्फरन्सच्या उमेदवाराकडून खान यांचा केवळ ११० मतांनी पराभव झाला होता.
गुरुवारी खान यांनी त्यांच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वत:वर गोळी झाडली. त्यांनी आत्महत्या का केली यासंदर्भात तपास सुरू आहे.

फकीर मोहम्मद खान यांची कारकीर्द

१९९६ मध्ये खान हे पहिल्यांदाच गुरेझ विधानसभेतून अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर २००२ मध्ये त्यांनी पुन्हा निवडणूक लढवली होती; मात्र नॅशनस कॉन्फरन्सच्या नजीर खान यांनी खान यांचा पराभव केला. खान यांनी नंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २००८ आणि २०१४ मध्ये काँग्रेस पक्षाकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली; मात्र दोन्ही वेळा नॅशनल कॉन्फरन्सच्या उमेदवारांकडून हार पत्करावी लागली होती.

२०२० मध्ये खान यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. गेल्या वर्षी जम्मू-काश्मीरमध्ये १० वर्षांनंतर विधानसभा निवडणूक पार पडली. त्यावेळी भाजपाने खान यांना गुरेझ इथून उमेदवारी दिली. आधीच्या निवडणुकांमध्ये खान यांचा निसटत्या फरकाने पराभव झाला होता. आणखी थोडे प्रयत्न केल्यास खान विजयी होतील असा विश्वास भाजपाला होता, म्हणूनच त्यांना उमेदवारी देण्यात आली होती.

रोजगाराचे आश्वासन देत खान यांनी दुर्गम पर्यटनस्थळ असलेल्या गुरेझमध्ये जोरदार प्रचार केला होता. खान पराभूत झाल्यामुळे काश्मीरमध्ये भाजपाची पाटी कोरीच राहिली. मात्र, त्यांनी लढवलेल्या १९ जागांवर त्यांना ५.८ टक्के इतकीच मते मिळाली. २०१४ मध्ये काश्मीरमध्ये ३३ जागा भाजपाने लढवल्या. त्यापैकी विजय मिळालेल्या एका जागेवर त्यांना २.५ टक्के इतकीच मते मिळाली होती.

खान यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करीत जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी “ही अतिशय दु:खद घटना” असल्याचे म्हटले आहे.

खान यांचं निधन हे ‘पक्ष आणि समाजाचं नुकसान’ असल्याचं जम्मू-काश्मीर भाजपा अध्यक्ष सुनिल शर्मा यांनी म्हटले. “खान यांनी राज्याच्या राजकारणावर कधीच न पुसली जाणारी छाप उमटवत आपले पूर्ण आयुष्य सार्वजनिक सेवेसाठी समर्पित केले” असेही शर्मा यांनी सांगितले.

खान यांनी काश्मीरातील जनतेसाठी सातत्याने योगदान दिलं. त्यांच्या हिताचा विचार हेच त्यांच्यासाठी प्राधान्य होतं. त्यांच्या जाण्याने अपरिमित नुकसान झालं आहे अशा शब्दांत भाजपाचे काश्मीर अध्यक्ष शर्मा यांनी श्रद्धांजली वाहिली.