प्रबोध देशपांडे
अकोला शिवसेनेतील माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांचा गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गळाला लागल्याची माहिती आहे. मुंबईत गोपीकिशन बाजोरिया यांची शिंदे गटातील नेत्यांसोबत बैठक झाल्याचे कळते. बाजोरिया पिता-पुत्रासह शिवसेनेतील काही निवडक पदाधिकारी शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
हेही वाचा- गुलाबराव पाटील यांचा प्रभाव केवळ जळगाव ग्रामीण मतदारसंघातच ?
एकनाथ शिंदे यांच्यासोबत सूरत आणि गुवाहाटी येथे गेलेले बाळापूरचे आमदार तथा जिल्हा प्रमुख नितीन देशमुख नंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे परतले होते. त्यामुळे अकोला जिल्ह्यातून शिंदे गटात कोण सहभागी होणार, असा प्रश्न चर्चेत असतानाच शिवसेनेतील नाराज बाजोरिया गट शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही वर्षांपासून अकोला शिवसेनेत प्रचंड गटबाजी उफाळून आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत मविआकडे मोठे संख्याबळ असतानाही शिवसेनेचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया यांना पराभवाचा धक्का बसला. तेव्हापासून शिवसेनेत उभी फूट पडली. या निवडणुकीत आ. नितीन देशमुख यांनी भाजपला मदत केल्याचा आरोप पक्षातूनच करण्यात आला. शिवसेनेचे अकोल्याचे माजी जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर यांनी अनेकदा शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांच्यावर आरोप केले.
हेही वाचा- राज्यसभेतील कामकाज कमी झाल्याने मावळते उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू नाराज
अनेक तक्रारी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे झाल्या. त्या पत्रावरून कारवाई करण्याऐवजी पक्ष नेतृत्वाकडून देशमुख यांनाच बळ देण्यात आले. त्यामुळे बाजोरिया गट नाराज झाला अंतर्गत असंतोष पसरला. अकोल्यातून शिंदे गटाला सक्षम समर्थकांची गरज होतीच. शिंदे गटाकडून त्याची चाचपणी करण्यात येत असतानाच माजी आमदार बाजोरिया यांनी शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचे कळते. अद्याप त्यांनी अधिकृतपणे भूमिका जाहीर केली नाही. गोपीकिशन बाजोरिया सध्या मुंबईत असल्याची माहिती आहे. त्यांचे पुत्र व हिंगोली-परभणी स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार विप्लव बाजोरिया हेही त्यांच्यासोबत शिंदे गटात सहभागी होण्याची चिन्हे आहेत. अकोला जिल्ह्यातील काही पदाधिकारी त्यांच्यासोबत जाण्याची शक्यता असल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसू शकतो.