Sangamner Vidhan Sabha Election 2024 नगरःलोकसभा मतदारसंघातील पराभवानंतर पुन्हा सक्रिय होताना माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी संगमनेर मतदारसंघातून विधानसभा लढवण्याची घोषणा केली. विखे यांचे परंपरागत विरोधक, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर हा मतदारसंघ. या मतदारसंघातून ते १९८५ पासून सलग विजयी झाले. या पार्श्वभूमीवर सुजय विखे खरेच संगमनेरमधून निवडणूक लढवणार की त्यांची केवळ लक्ष वेधून घेणारी घोषणा होती की पक्षाने उमेदवारी दिली नाही, असे कारण देत ते तेथून निवडणूक लढवणार नाहीत, अशा अनेक शक्यता व्यक्त होत चर्चा सुरु आहेत.
हेही वाचा >>> भाजपच्या छाननी समितीची नवी दिल्लीत बैठक; विधानसभा उमेदवार निश्चितीबाबत चर्चा
दोन-चार दिवसातच जागावाटप व उमेदवारांची यादी जाहीर होईल. त्यातून विखे यांची घोषणा केवळ राजकीय वातावरण निर्मितीसाठी होती की ते आ. थोरात यांच्या विरोधात संगमनेरमधून लढणार, हे स्पष्ट होईलच. जिल्ह्याचे राजकारण विखे आणि थोरात या दोन कुटुंबियाभोवती फिरते. पूर्वी भाऊसाहेब थोरात विरूद्ध बाळासाहेब विखे असा संघर्ष चाले. नंतर तो बाळासाहेब थोरात विरूद्ध राधाकृष्ण विखे या दोन गटात रंगू लागला. विखे काँग्रेसमध्ये असोत की अन्य पक्षात, जिल्हा याच दोन गटात विभागला जाई व जात आहे. सुजय यांच्या रुपाने विखे घराण्यातील तिसऱ्या पिढीने हा वारसा चालू ठेवला आहे. बाळासाहेब थोरात यांच्या वारसदार म्हणून त्यांच्या कन्या डॉ. जयश्री थोरात पुढे येत आहेत.
हेही वाचा >>> मराठीचा डंका अधिक जोमाने वाजणार! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन, मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन
बाळासाहेब थोरात यांच्या गावासह संगमनेरची काही गावे राधाकृष्ण विखे यांच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघात आहेत. मतदारसंघ असो की एकमेकांची साखर कारखानदारी दोघांनी यापूर्वी एकमेकांना अडचणी निर्माण केलेल्या नाहीत. कार्यक्षेत्राबाहेरील आणि जिल्हा पातळीवरील संस्थासाठी मात्र त्यांनी परस्परांना नमोहरम करण्याची संधी सोडलेली नाही. यंदा मात्र या मर्यादा प्रथमच ओलांडल्या गेल्या. गणेश कारखान्यातील सत्तांतरानंतर लोकसभा निवडणुकीत विखे व थोरात दोघांनी परस्परांच्या मतदारसंघात जाऊन एकमेकांच्या विरोधात आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवार देण्याचे जाहीर केले. लोकसभा निवडणुकीत सुजय विखे विरोधातील उमेदवार नीलेश लंके यांना सर्व प्रकारची रसद थोरात यांनी पुरवली, आपली ‘संगमनेर’मधील यंत्रणा ‘नगर’मध्ये उतरवली. सुजय विखे यांचा पराभव झाला. पराभवानंतर पुन्हा सक्रिय होताना सुजय विखे यांनी पहिली घोषणा केली ती म्हणजे संगमनेरमधून विधानसभा निवडणूक लढवण्याची. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनीही निर्णय घेण्यास सुजय सक्षम आहेत, असे सांगत सूचक वक्तव्य केले. थोरात यांनी तर मंत्री विखे यांनीच संगमनेरमधून लढण्याचे आव्हानवजा निमंत्रण दिले. पालकमंत्री विखे यांचे संगमनेरमधील दौरे इतर कोणत्याही तालुक्यात वा मतदारसंघाच्या तुलनेत अधिक होत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर सुजय विखे यांच्या घोषणेकडे पाहिले जाते. काहींना ती गांभीर्याची वाटतेही आणि काहींना त्यातून परस्परांच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप न करण्यासाठी टाकलेल्या दबावाचा अर्थ ध्वनित होत आहे.