प्रेसिडेन्सी सेंट्रल करेक्शनल होमच्या उच्च-सुरक्षा कक्षात पहिली खडतर रात्र घालवल्यानंतर, तृणमूल काँग्रेसचे माजी मंत्री पार्थ चॅटर्जी यांना शनिवारी दुपारी एक बेड आणि खुर्ची देण्यात आली आहे. तुरुंग अधिकाऱ्यांनीही त्यांची ‘चॉप-मुरी खाण्याची इच्छा मान्य केली आहे. शुक्रवारी, विशेष न्यायालयाने त्यांना आणि त्यांची सहकारी असणाऱ्या अर्पिता मुखर्जी यांना शाळेतील नोकऱ्यांच्या घोटाळ्याप्रकरणी १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले होते. त्यानंतर त्यांना तुरुंगात आणण्यात आले. त्यांनी अख्खी रात्र शौचालयाच्या कमोडवर बसून काढली. 

एकेकाळी पश्चिम बंगालमधील सर्वात शक्तिशाली नेत्यांपैकी एक आणि तृणमूल काँग्रेस सरकारमधील क्रमांक ३ चे नेते असणाऱ्या चॅटर्जी यांना तुरुंगात कोणतेही विशेषाधिकार दिले गेले नाहीत आणि तुरुंगातील उच्च सुरक्षित पोइला बैश विभागात ठेवण्यात आले आहो. दरम्यान, तुरुंग अधिकाऱ्यांनी चॅटर्जी यांच्या सेलमधील कमोडची दुरुस्ती करून घेतली.

एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार इतर कैद्यांसोबत संवाद कमी करण्यासाठी चटर्जी यांच्यावर उच्च सुरक्षा सेल ब्लॉकमध्ये २४/ ७ पाळत ठेवली जात आहे. तुरूंगातील वरिष्ठ अधिका-यांना दर तासाला त्याच्या कक्षात जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अलीपूर वुमेन्स सेंट्रल करेक्शनल होममध्ये पार्थ चॅटर्जी यांच्या सहकारी अर्पिता मुखर्जी यांना ठेवण्यात आले आहे. ही जागा पार्थ यांना ठेवण्यात आलेल्या तुरुंगापासून पाच मिनिटांच्या अंतरावर आहे. एका अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले की मुखर्जी यांना तुरूंगात आणले तेव्हापासून त्या अस्वस्थ होत्या आणि रडत होत्या. त्यांनी रात्रीचे जेवण घेतले नाही.

पार्थ चॅटर्जी यांनी पश्चिम बंगाल सरकारमध्ये शिक्षण आणि उद्योग यासारखे खाते सांभाळले आहे आणि टीएमसीचे ते सरचिटणीस होते. त्यांना २३ जुलै रोजी सक्तवसुली संचालनालयाने शाळांमधील नोकरी घोटाळ्याप्रकरणी त्यांना अटक केली होती. त्यांची सहकारी अर्पिता मुखर्जी यांच्याशी जोडलेल्या मालमत्तेमधून ५० कोटींहून अधिक रोख रक्कम जप्त केल्याचा ईडीचा दावा आहे. पोइला बैश हा तुरुंगातील सर्वात सुरक्षित सेल ब्लॉक आहे. जो सतत निगराणी खाली असतो.. या सेलमध्ये अमेरिकन सेंटर हल्ल्याचा मास्टरमाईंड आफताब अन्सारी यासह गंभीर गुन्ह्यांसाठी दोषी ठरलेले आणि मृत्युदंडाची शिक्षा भोगणारे कैदी आहेत.

ब्लॉकमधील इतरांप्रमाणे, चॅटर्जीच्या ६ फूट बाय ८ फूटच्या सेलमध्ये अंथरुणासाठी जमिनीवर ब्लँकेट, छतावरील पंखा, कमोड आणि वॉटर फिल्टर आहे. कुठल्याही प्रकारचे फर्निचर नाही. वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्यांनी शनिवारी दुपारी चॅटर्जी यांची भेट घेतली. त्यानंतर, दुपारी उशिरा त्यांना त्यांच्या कोठडीत एक लोखंडी खाट आणि एक खुर्ची देण्यात आली. तुरुंगात त्यांना जेवणासाठी चपाती, भाजी आणि डाळ देण्यात येत असल्याचे तुरुंगातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. 

Story img Loader