छत्रपती संभाजीनगर : गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये वाट्याला आलेल्या चार विधानसभा मतदारसंघापैकी औरंगाबाद पूर्व आणि पश्चिम दोन मतदारसंघातून ‘ पंजा ’ गायब हाेता. सिल्लोड मतदारसंघात कॉग्रेसचा उमेदवार नावाला उभा होता. त्यामुळे कॉग्रेसची जिल्ह्यातील भिस्त केवळ फुलंब्री मतदारसंघावर. त्यामुळे महाविकास आघाडीच्या बोलणीमध्ये काॅग्रेसच्या जागा आदलाबदलीमध्ये वापरा असा संदेश जिल्ह्यातील नेत्यांनी वरिष्ठांपर्यंत पोहचवला आहे. कॉग्रेसच्या काही नेत्यांनी सोमवारी महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांचीही भेट घेतली. मतदारसंघात विजयासाठी समन्वय ठेवण्यावर कॉग्रेसचा भर असेल असे पवार यांनाही सांगण्यात आले.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कॉग्रेसला चार जागा मिळाल्या. त्यातील औरंगाबाद पूर्व हा मतदारसंघ कॉग्रेस हा मतदारसंघ समाजवादी पक्षास सोडण्यात आला. त्यामुळे या मतदारसंघात कॉग्रेसचा ‘ पंजा ’ हे चिन्ह निवडणुकीमध्ये नव्हते. औरंगाबाद पश्चममधील उमेदवार रमेश गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज भरताना चूक केली त्यामुळे या मतदारसंघातूनही कॉग्रेस बाद झाली. सिल्लोड मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी तेव्हा शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे सिल्लोडमध्ये कॉग्रेस उमेदवार केवळ नावाला उभा होता. २०१४ नंतर सिल्लोडमध्ये तसे कॉग्रेसचे संघटन फारसे बाळसे धरू शकले नाही. त्यामुळे फुलंब्रीशिवाय अन्य मतदारसंघामध्ये कॉग्रेसचा दावा तसा गृहीत धरला जात नाही. वैजापूर, गंगापूर, कन्नड या मतदारसंघातील कॉग्रेसचे कार्यकर्ते मात्र पक्ष बांधणीसाठी सातत्याने प्रयत्न करत असतात. जिल्हा बॅकेचे किरण पाटील डोणगावकर यांच्यासह या मतदारसंघात कॉग्रेसचे मतदार विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या बाजूला थांबत. पण यश मात्र, शिवसेनेच्या पदरात पडत असे. त्यामुळे जागावाटपात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे जागा देताना संभाजीनगरच्या विधानसभांचा उपयोग आदलाबदलीसाठी करावा, असे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा >>>मावळमध्ये अजितदादा गटाच्या आमदाराला भाजपचेच आव्हान

कॉग्रेसमधील नेत्यांनी लोकसभा मतदारसंघात चांगला समन्वय राखला होता. आता पुन्हा तो कायम ठेवण्यासाठी काय करता येईल, याचीही चर्चा राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी झाली असल्याचे कॉग्रेसचे नेते व माजी मंत्री अनिल पटेल यांनी मान्य केले. काही जागांचा अट्टाहास न करता महाविकास आघाडी मजबूत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असे ते म्हणाले.