मोहनीराज लहाडे
शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात नगर जिल्ह्यातील कोणाची वर्णी लागणार? याची उत्सुकता व्यक्त होताना ज्येष्ठ नेते, माजीमंत्री राधाकृष्ण विखे आणि आमदार राम शिंदे या दोघांची नावे त्यादृष्टीने चर्चेत आहेत. मंत्रिमंडळात या दोघांची एकाचवेळी वर्णी लागणार की दोघांपैकी एकाची? याबद्दल दोघांच्या समर्थकांत दावे-प्रतिदावे केले जात आहेत. दोघांपैकी एकाला मंत्रिपद मिळाल्यास जिल्ह्यातील भाजपचा ‘अवमेळ’ आणखी बिघडणार आहे, आणि दोघांना एकाचवेळी मिळाल्यास ‘ताळमेळ’ कसा साधला जाणार, याकडे लक्ष वेधले जात आहे. मात्र मंत्रिपदी कोणाचीही वर्णी लागली तरी आगामी काळ हा राष्ट्रवादी काँग्रेससाठी संघर्षाचाच राहणार आहे. याशिवाय परंपरागत बाळासाहेब थोरात-राधाकृष्ण विखे यांच्यातील राजकीय वैमनस्यालाही वेगळे परिमाण मिळण्याची शक्यता आहे.यंदाच्या विधानसभेत भाजपचे विखे, मोनिका राजळे व बबनराव पाचपुते असे तीन आमदार आहेत. आता विधान परिषदेच्या माध्यमातून पुनर्वसन झालेले राम शिंदे चौथे झाले आहेत. गेल्या विधानसभेपेक्षा जिल्ह्यातील भाजपचे संख्याबळ घटलेले आहे. यापूर्वी महाविकास आघाडी सरकारच्या काळात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, शिवसेनेचे शंकरराव गडाख व राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे, अशा तिन्ही पक्षाच्या तिघांना मंत्रिपदे मिळाली होती. जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या अधिक असल्याने पालकमंत्री पदही राष्ट्रवादीकडे होते. आमदार थोरात यांनी नगरचे पालकमंत्री पद स्वीकारण्यास नकार दिला होता.
विधान परिषदेवरील राम शिंदे यांच्या विजयानंतर झालेल्या सत्कार समारंभात माजी राज्यमंत्री शिवाजी कर्डिले यांनी विकास आघाडी सरकारच्या काळात जिल्ह्याला तीन मंत्रिपदे मिळाल्याने भाजपनेही तीन मंत्रिपदे नगरला द्यावीत. विखे, शिंदे व श्रीमती राजळे यांना मंत्रिपदे मिळावीत, अशी मागणी केली होती. जिल्हा भाजपनेही त्यास पाठिंबा दिला आहे.विखे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना यापूर्वीचा मंत्रिपदाचा दीर्घकाळचा अनुभव आहे तर राम शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील मानले जातात. विधानसभेत पराभूत होऊनही विधान परिषदेच्या माध्यमातून त्यांचे पुनर्वसन करण्यात आले. त्यामुळेच या दोघांना पहिल्या टप्प्यात की, एकाला संधी मिळणार याबद्दलचे दावे-प्रतिदावे त्यांच्या समर्थकांकडून केले जात आहेत. जिल्हा भाजपमध्ये राधाकृष्ण विखे व राम शिंदे यांच्यामध्ये फारसे सख्य नाही. आपल्या व अन्य काही उमेदवारांच्या पराभवाला विखे जबाबदार असल्याची तक्रार राम शिंदे व इतरांनी पूर्वी केलेली आहे. शिवाय विखे यांचे चिरंजीव सुजय विखे यांच्याकडे खासदारकी आहेच. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून विखे प्रणित ‘जिल्हा विकास आघाडी’ सक्रिय करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळेच दोघांपैकी एकाला मंत्रिपद मिळणे जिल्हा भाजपसाठी ते ‘अवमेळ’ निर्माण करणारे ठरेल. यामध्ये नगरच्या प्रभारी पदाची जबाबदारी स्वीकारणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्त्वाची ठरेल. ते विखे व शिंदे यांच्यातील ‘ताळमेळ’ कसा साधणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष राहील.
जगताप-लंकेभोवती संशयमहाविकास आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आमदार राम शिंदे यांना कर्जत-जामखेडमध्ये अस्वस्थ करून सोडले होते. शिंदे समर्थक अनेक पदाधिकारी राष्ट्रवादी प्रवेश करते झाले. असाच काहीसा प्रकार पारनेरमध्ये राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी विखे समर्थकांबाबत केला. त्याची परतफेड करण्याचे प्रयत्न आता या नव्या सरकारच्या माध्यमातून होतील. त्यात पुन्हा राष्ट्रवादीचे नगर शहरातील आमदार संग्राम जगताप व आमदार लंके यांनी आपल्या भूमिकांनी संशयाचे वातावरण निर्माण केले आहे. विधिमंडळातील निर्णायक मतदानाच्या प्रसंगी दोघे आमदार अनुपस्थित राहिले. आमदार लंके विधानसभा अध्यक्ष निवडीच्या मतदानासाठी अनुपस्थित राहिले तर आमदार जगताप शिंदे सरकारच्या बहुमत चाचणीच्या मतदानासाठी अनुपस्थित होते. त्यासाठी त्यांनी दिलेली कारणेही शंका घेण्यासारखी असल्याचे दस्तुरखुद्द त्यांच्याच समर्थकांना वाटत आहे. शिवाय भाजप खा. विखे व राष्ट्रवादीचे आ. जगताप यांच्यातील ‘साटेलोटे’ दोन्ही पक्षांना खटकणारे वाटते आहे. शिंदे-भाजप सरकारमध्ये राधाकृष्ण विखे की राम शिंदे या दोघांची वर्णी लागणार की दोघांपैकी एकाची, यावर जिल्ह्यातील आगामी राजकारणाची वाट ठरणार आहे.