नांदेड : अतिशय चुरशीच्या आणि अटीतटीच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजयी विक्रम कोण आपल्या नावावर नोंदवतो, याबाबत कमालीची उत्कंठा दिसून येत आहे. नांदेडमधून तब्बल सहा विद्यामान आमदार निवडणूक रिंगणात असून, माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांची कन्याही नशीब आजमावते आहे. अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती असून, नांदेड उत्तर, दक्षिण, नायगाव, लोहा व मुखेड येथे कमालीची रस्सीखेच पाहायला मिळते.
नांदेड उत्तरमध्ये महायुतीचे उमेदवार आमदार बालाजीराव कल्याणकर असून, प्रतिस्पर्धी म्हणून काँग्रेस आघाडीचे माजी महापौर अब्दुल सत्तार रिंगणात आहेत. नांदेड दक्षिणमध्येसुद्धा चौरंगी लढत असून, महाआघाडीतर्फे काँग्रेसचे आ. मोहन हंबर्डे हे असून, प्रतिस्पर्धी म्हणून महायुतीतर्फे शिंदे शिवसेनेचे आनंदा बोंढारकर आहेत. लोहा मतदारसंघात माजी आमदार व खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या भगिनी आशाबाई शिंदे, शिवसेना ठाकरे गटाचे एकनाथ पवार यांची लढत आहे. मुखेडमध्ये विद्यामान आमदार महायुतीतर्फे डॉ. तुषार राठोड यांच्यासमोर काँग्रेस आघाडीतर्फे माजी आमदार हणमंत पाटील बेटमोगरेकर यांचे आव्हान असेल. तर मुख्यमंत्र्यांचे माजी सचिव बालाजी खतगावकर यांनी तगडे आव्हान उभे केले आहे.
हेही वाचा >>> अमरावती जिल्ह्यात वाढलेल्या मतदानावर दावे-प्रतिदावे
नायगावमध्ये महायुतीतर्फे भाजपचे विद्यामान आमदार राजेश पवार विरुद्ध माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांच्या स्नुषा डॉ. मीनल खतगावकर या काँग्रेस आघाडीतर्फे रिंगणात आहेत. देगलूरमध्ये महायुतीतर्फे भाजपचे माजी आमदार जितेश अंतापूरकर हे रिंगणात आहेत, तर काँग्रेस आघाडीतर्फे निवृत्ती कांबळे मैदानात आहेत. किनवटमध्ये महायुतीचे भीमराव केराम विरुद्ध राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे प्रदीप नाईक यांची थेट लढत आहे. हदगावमध्ये काँग्रेस आघाडीतर्फे आ. माधवराव जवळगावकर यांच्या विरोधात महायुतीने लोकसभेतील पराभूत उमेदवार बाबूराव कोहळीकर यांना पुन्हा रिंगणात उतरवले आहे.
भोकरकडे संपूर्ण राज्याचे लक्ष
● संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या भोकर विधानसभा मतदारसंघात महायुतीतर्फे भाजपच्या श्रीजया अशोक चव्हाण या प्रथमच नशीब आजमावित आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसने अशोक चव्हाण यांचेच एकेकाळचे कट्टर कार्यकर्ते तिरुपती ऊर्फ पप्पू पाटील कोंढेकर यांना रिंगणात उतरवले आहे. येथे सर्वाधिक सुमारे ७६ टक्के मतदान झाले असून, श्रीजया या विक्रमी मतांनी निवडून येतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ● खा. वसंत चव्हाण यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होत आहे. मागील वेळी काँग्रेसने ही जागा पटकाविली होती. या वेळी (कै.) वसंतरावांचे चिरंजीव प्रा. रवींद्र चव्हाण पहिलीच लोकसभा निवडणूक लढवत आहेत, तर महायुतीकडून भाजपचे संतुकराव हंबर्डे हेदेखील आपली पहिलीच निवडणूक लढवत आहेत. दोघांनीही विधानसभेतील आपापल्या सहकाऱ्यांसोबत प्रचारात धावपळ केली. ‘तुम्हारे खत में हमारा सलाम’ या पद्धतीने प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील सहकाऱ्यासोबत त्यांचा प्रचार अनायासे झाला.