दीपक महाले
जळगाव : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालकांच्या २० जागांसाठी होणार्या राजकीय रणधुमाळीत दररोज एकापेक्षा एक नवीन गोष्टी घडत आहेत. एकीकडे रावेर गटातून जगदीश बढे यांच्या बिनविरोध निवड निश्चितीने उत्साह, तर दुसरीकडे कार्यकारी संचालकांसह सहा जणांच्या अटकेमुळे राजकीय आणि सहकार क्षेत्र ढवळून निघाले आहे. दूध संघाच्या निवडणुकीसाठी ११४ पात्र उमेदवारांची यादी जाहीर झाली. त्यात मुक्ताईनगर गटात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना घेरण्याची तयारी विरोधकांनी केली आहे. या रणधुमाळीत खडसे कुटुंबियांना दररोज एकेका धक्क्यास सामोरे जावे लागत आहे.
हेही वाचा… ९३ वर्षीय स्वातंत्र्य सैनिक लीला चितळे म्हणतात देशाचे संविधान संकटात
दूध संघावर सत्ता म्हणजे जिल्ह्यातील राजकारणावर बऱ्यापैकी पकड असे मानले जाते. खडसेंच्या ताब्यात असलेल्या संघावर सत्ता मिळविण्यासाठी आता भाजपसह शिंदे गटातील मंत्री, आमदारांनी प्रयत्न सुरू केले आहेत. छाननी प्रक्रियेवेळी मुक्ताईनगर गटातील उमेदवार भाजपचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या अर्जावर माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि खेमचंद महाजन यांनी हरकत घेतली होती. त्यावर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी संतोष बिडवाई यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत हरकत फेटाळल्याने खडसेंना धक्का बसला. एकनाथ खडसेंनी उच्च न्यायालयात त्यासंदर्भात दाखल केलेली याचिकाही फेटाळण्यात आल्याने चव्हाण यांची उमेदवारी कायम राहिली आहे. हा निर्णय एकनाथ खडसे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. मुक्ताईनगर गटातील मंदाकिनी खडसे विरुध्द आमदार चव्हाण यांच्यातील लढतीला आता विधानसभा निवडणुकीप्रमाणे स्वरूप प्राप्त झाले आहे. खडसेंसाठी ही लढत आत्मसन्मानाची झाली आहे.
हेही वाचा… एक शक्ती आहे…जी पुढे ढकलते आहे….कन्याकुमारी पासून पायी चालत असलेल्या तरुणीच्या भावना
दूध संघासाठी १० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तत्पूर्वी, २८ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज माघारीची मुदत आहे. छाननीत १३ जणांचे उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. एकीकडे दूध संघातील अपहार प्रकरणाची चौकशी, तर दुसरीकडे निवडणुकीतील चुरस असे चित्र आहे.
हेही वाचा… शेतकऱ्यांना संपवण्याचे भाजपचे धोरण; राहुल गांधी यांची टीका
रावेर तालुका गटात महाविकास आघाडीचे उमेदवार जगदीश बढे हे विरोधी चारही जणांचे अर्ज बाद झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. एरंडोल तालुका गटात महाविकास आघाडीचे तीन उमेदवार उरले आहेत. त्यामुळे ही जागा बिनविरोध होण्याची शक्यता आहे. चोपडा गटात इंदिराताई पाटील विरुद्ध रोहित निकम अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे, तर जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार यांनी धरणगाव तालुका गटात वाल्मीक पाटील यांच्या उमेदवारी अर्जावर घेतलेली हरकतही फेटाळण्यात आल्याने त्यांची उमेदवारी कायम राहणार आहे. पारोळा तालुका गटात पारंपरिक राजकीय विरोधक असलेले शिवसेना शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. बोदवड मतदारसंघात दूध संघाचे संचालक मधुकर राणे आणि जिल्हा बँकेचे संचालक अॅड. रवींद्र पाटील यांच्यात लढत होईल.
जळगाव तालुका गटातून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरोधात माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांच्या पत्नी छाया देवकर यांची उमेदवारी निश्चित आहे. जामनेर तालुका गटात ग्रामीण विकासमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात जिल्हा बँकेचे संचालक नाना पाटील अशी लढत होण्याची शक्यता आहे. एकूणच दूध संघाची ही निवडणूक जळगाव जिल्ह्यात भाजप-शिंदे गट विरुध्द महाविकास आघाडी अशी होण्याची शक्यता आहे.