लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी दिल्ली : भाजपमधील वादग्रस्त नेते नितेश राणे यांना प्रवक्त्यांच्या यादीतून वगळून पक्षाने चपराक दिल्याचे मानले जात आहे. नितेश राणेंच्या वाचाळपणामुळे भाजपचे विधानसभा निवडणुकीमध्ये मोठे नुकसान होण्याचा धोका असल्यामुळे राणेंच्या टीका-टिप्पणीवर तूर्त तरी आवर घालण्यात आल्याचे सांगितले जाते.

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आरोपांना तोडीसतोड प्रत्युत्तर देण्याची जबाबदारी भाजपचे खासदार व माजी केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी घेतली होती, तर ठाकरे गटाचे नेते विशेषत: राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांचे आरोप खोडून काढून त्यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल करण्याची जबाबदारी भाजपने नितेश राणे यांच्याकडे दिली होती. त्यामुळे संजय राऊत यांच्याविरोधात भाजपच्या वतीने फक्त नितेश राणे उत्तर देत होते. राऊतांविरोधात बोलण्याची जबाबदारी नितेश यांच्यावर सोपवण्यात आली असून आम्ही बोलणार नाही, असे भाजपच्या नेत्यांचे म्हणणे होते.

हेही वाचा >>>आनंद दिघे यांच्याकडून हिंदुत्वाचे नाही तर संपूर्ण समाजाचे रक्षण- एकनाथ शिंदे

लोकसभा निवडणुकीच्या निकालापर्यंत नितेश राणेंनी पक्षाने सोपवलेली जबाबदारी चोख बजावलेली असली तरी त्यांच्या आक्षेपार्ह भाषेमुळे ठाकरे गटातील नेत्यांविरोधात योग्य प्रतिवाद झालाच नाही. उलट सभ्य भाजपची प्रतिमा खराब झाल्याच्या तक्रारी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वापर्यंत पोहोचल्या असल्याचे समजते. गेल्या काही आठवड्यांमध्ये भाजपच्या केंद्रीय स्तरावरील नेत्यांनी राज्यातील भाजप नेत्यांशी तसेच संबंधितांशी चर्चा करून संघटनेतील नाराजी जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. लोकसभा निवडणुकीतील चुका दुरुस्त करायच्या असतील तर प्रसारमाध्यमांपासून अर्वाच्य भाषा वापरणाऱ्या नेत्यांना लांब ठेवण्याची सूचनाही करण्यात आल्याचे सांगितले जाते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Excluding controversial bjp leader nitesh rane from the list of spokespersons amy
Show comments