परभणी – मराठवाड्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून के. चंद्रशेखरराव यांच्या ‘भारत राष्ट्र समिती’त प्रवेश करणाऱ्यांचा ओघ मोठ्या प्रमाणावर वाढला होता. तेलंगणात जाऊन गळ्यात गुलाबी रुमाल टाकणाऱ्यांमध्ये शेतकरी संघटनेचे कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणावर होते. तेलंगणा विधानसभा निवडणुकीत चंद्रशेखर राव यांचा पराभव झाला आणि पक्षात दाखल झालेले मराठवाड्यातले कार्यकर्तेही सैरभैर झाले. या पक्षाच्या शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष माणिक कदम यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला आहे. अवघ्या काही महिन्यात ‘बीआरएस’चा गुलाबी रंग उडाल्याने काही कार्यकर्त्यांनी वेगळा पर्याय शोधला तर काही अजूनही चाचपडत असल्याचे चित्र आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘शेतमालाला रास्त भाव मिळालाच पाहिजे’ अशी मागणी करत विविध शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून चळवळीत कार्य करणाऱ्या शेतकरी संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांना के. चंद्रशेखरराव यांच्या ‘भारत राष्ट्र समिती’ची भुरळ पडली होती. शेतकरी संघटनांमध्ये कार्यरत असणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात या पक्षात प्रवेश केला. परभणी, हिंगोली, नांदेड हा एकेकाळी शेतकरी संघटनेचा दबदबा असलेला भाग होता. बहुतांश शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राजकीय पर्याय शोधताना महाराष्ट्रातील प्रस्थापित राजकीय पक्ष सोडून हा पर्याय निवडला. शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना अशा ठिकाणी काम करणाऱ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी भारत राष्ट्र समिती जवळ केली होती.

हेही वाचा – मनसेचे परप्रांतीयांविरोधातील ‘खळ्ळ्य खट्ट्याक’ बंद ? महायुतीसाठी भाजपची अट

शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुधीर बिंदू, उपाध्यक्ष कैलास तवार, मराठवाडा विभाग प्रमुख रामजीवन बोंदर, महिला आघाडीच्या सुवर्णा काटे, गणेश पाटील, पवन करवर, शरद करवर, सोमनाथ नागुरे, नवीनकुमार पाटील, बाळासाहेब काळे, आदित्य राजंणकर, यांच्यासह राज्यभरातील दोनशेहून अधिक कार्यकर्त्यांनी भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला होता. माणिक कदम यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व कार्यकर्ते बीआरएस मध्ये दाखल झाले होते. कदम यांनी शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्षे शेतकरी संघटनेत काम केले. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेतही राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्षे काम केले. केवळ शेतकरी संघटनेचे कार्यकर्तेच नव्हे तर अन्यही राजकीय पक्षातल्या कार्यकर्त्यांना बीआरएसचा पर्याय वाटू लागला होता. विशेषतः लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या पक्षाच्या माध्यमातून आपले राजकीय पुनर्वसन करून घेता येईल अशी मनीषा काहींनी बाळगली. तर दुसऱ्या फळीचेही अनेक कार्यकर्ते या पक्षाशी जोडले गेले. अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येसुद्धा या पक्षाद्वारे आपले राजकीय भवितव्य घडवण्याची अनेकांची आकांक्षा होती. शिवाय पक्षकार्यासाठी व कार्यकर्त्यांना बळ पुरवण्यासाठी मोठ्या या पक्षात सढळ हाताने रसद पुरवली जात असल्याचे कार्यकर्त्यांमध्ये बोलले जात होते.

हेही वाचा – साताऱ्यात उदयनराजे यांना महायुतीतूनच विरोध

तेलंगणाच्या लगत असलेल्या काही जिल्ह्यांमध्ये ‘बीआरएस’ने आपले विशेष लक्ष केंद्रित केले होते. पक्षाचे मेळावे घेणे, कार्यकर्त्यांची फळी तयार करणे, हळूहळू जिल्हास्तरावर कार्यालय निर्माण करणे आणि आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने मोर्चे बांधणी करणे या पद्धतीने ‘बीआरएस’चे काम चालले होते मात्र विधानसभा निवडणुकीत तेलंगणात या पक्षाला मोठा फटका बसला त्यानंतर या पक्षात दाखल होणाऱ्यांच्या प्रक्रियेत खिळ बसली. तेलंगणाच्या निकालानंतरही या भागातले अनेक कार्यकर्ते पक्ष नेतृत्वाला भेटून आले मात्र नेतृत्वाचाच उत्साह मावळल्याने कार्यकर्तेही सैरभैर झाले. अवघ्या एक वर्षापूर्वी मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागात प्रचंड संख्येने वाहनांच्या ताफ्यानिशी वाजत गाजत मेळावे, बैठका पार पाडणाऱ्या या पक्षाची हवा ओसरली. महाराष्ट्रातील सर्व प्रस्थापित राजकीय पक्षांमध्ये अनुभव घेऊन अनेकांनी या नव्या छावणीत प्रवेश घेतला पण त्यांचे आता राजकीय भवितव्य टांगणीला लागले त्यामुळे यातल्या काहींनी लगेचच आपापले पर्याय निवडले.

हेही वाचा – मिरजेतील उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यावर काँग्रेसचा बहिष्कार

‘बीआरएस’मध्ये आपण निष्ठेने काम केले. राज्याच्या शेतकरी आघाडीची जबाबदारी पक्ष नेतृत्वाने आपल्यावर सोपवली होती मात्र या पक्षाला आता महाराष्ट्रात काम करण्यात रस उरला नाही असे दिसून आले. बराच काळ वाट पाहिली पण कोणतीच आशा या पक्षात दिसत नव्हती. शेवटी शेवटी तर पक्षाने आपले कामच गुंडाळले. त्यामुळे कुठवर वाट पाहणार ? काहीतरी पर्याय निवडणे आवश्यक होते. एवढी वर्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम केल्यानंतर पुन्हा या प्रश्नावर काम करण्यासाठी व्यासपीठ आवश्यक होते म्हणून राष्ट्रवादीत प्रवेश केला. – माणिक कदम, प्रदेशाध्यक्ष, किसान सेल, (राष्ट्रवादी अजित पवार गट)

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Existence of brs in maharashtra is in danger print politics news ssb