सिद्धेश्वर डुकरे
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी त्यांच्या ८२ व्या वाढदिवसा निमित्त पक्षाने नव्या पिढीला प्रोस्ताहित करण्याच्या भुमिकेत अधिक लक्ष घालण्याचे आवाहन पक्षातील प्रस्थापित नेतेमंडळींना केले आहे. पवारांच्या वक्तव्याने युवा पदाधिकाऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असल्यातरी पक्षाचे आतापर्यतची वाटचाल पाहता राष्ट्रवादीत सरसकट नव्या नेतृत्वाला संधी मिळण्याची शक्यता कमीच असल्याचे मत व्यक्त केले जाते.
राष्ट्रवादी काँग्रेस हा प्रस्थापित नेत्यांचा पक्ष आहे, असे नेहमी म्हटले जाते. नव्वदच्या दशकापर्यत काँग्रेस पक्षात तयार झालेली तरूण नेत्यांची फळी पुढे शरद पवार यांच्यासोबत काँग्रेस पक्षातून बाहेर पडली. यामध्ये सांगली जिल्ह्यातून स्व.आर.आर.पाटील, जयंत पाटील, पुणे जिल्ह्यात दिलीप वळसे-पाटील, अजित पवार, सोलापुरात मोहिते-पाटील घराणे, दिलीप सोपल, मराठवाड्यात राजेश टोपे, जयदत्त क्षिरसागर अशा कितीतरी नावांचा उल्लेख करता येईल. या सगळ्यांची राजकीय कारकिर्द काँग्रेस पक्षात घडली. काँग्रेस पक्षात उदयास येऊन तयार झालेली हे नेतृत्वं होते.
हेही वाचा… औरंगाबाद: राष्ट्रवादीचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर शिवसेनेत
काँग्रेस पक्षातून बाहेर पडताना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना होताना वर उल्लेख केलेल्या ” यंग ब्रिगेड”ची फळी पवार यांना आपसुक मिळाली. शिवाय पवार यांनी इतर पक्षातून आलेल्या नेत्यांना पक्षात संधी दिली. शिवसेनेतून बाहेर पडलेले छगन भुजबळ, गणेश नाईक यांच्यासरख्या नेत्यांनी राष्ट्रवादी पक्षाला संघटनात्मक बळ दिले.पक्षाच्या विस्ताराच्या कक्षा रूंदावण्यास मदत झाली. भुजबळ-नाईक यांच्या नंतर देखील राष्ट्रवादी पक्षाने शिवसेनेत तयार झालेल्या अनेक नेत्यांना घेतले. या तयार झालेल्या नेत्यांच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधीमंडळात आणि रस्त्यावर राष्ट्रवादीचा दबदबा राखला.
हेही वाचा… गंगापूर मतदारसंघात राष्ट्रवादीकडून नवी पटमांडणी; आमदार सतीश चव्हाण यांच्याकडून पेरणी
सुरूवातीच्या काळात काँग्रसमधील आणि नंतर शिवसेनेत तयार झालेले, घडलेले तरूण रक्ताचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कामी आलेले आहे. हे नेतृत्व सध्या पक्षात ज्येष्ठांच्या पंक्तित बसलेले आहे.सुनिल तटकरे, अजित पवार, जयंत पाटील,दिलीप वळसे आदी नेत्यांनी वयाची साठी पार केली आहे.तर भुजबळांनी अमृतमहोत्सवी वर्षे साजरे केले आहे.
हेही वाचा… डॉ. देवेंद्र वानखडे : लोकपाल आंदोलनातून राजकारणात
तरूण नेतृत्व उदयास येण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या पवार यांच्या भुमिकेचा आणि प्रत्यक्ष २० वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील तरूण नेतृत्वाचा विचार केला तर वस्तुस्थिती काही वेगळीच असल्याचे स्पष्ट होते. विधान परिषदेचे विरोधी पक्ष राहिलेले ,माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी पक्षात स्थान सिद्ध केले असले तरी भाजपचे गोपिनाथ मुंडे यांच्या तालमित धनंजय यांचे नेतृत्व तयार झाले आहे. दुसरे आमदार रोहित पवार, त्यांना पवार घराण्याचे संस्कार व वारसा आहे. मावळचे आमदार सुनील शेळके, जुन्नरचे आमदार अतुल बेनके, पारनेरचे आमदार निलेश लंके, बीडमधील संदीप क्षीरसागर, संजय बनसोडे, राहुल नवघरे आदी तरूण आमदार सध्या राष्ट्रवादीत आहेत.परंतू त्यांची आमदारकीची पहिलीच वेळ आहे. यांच्या नेतृत्वाचा कस अद्याप लागायचा आहे.
हेही वाचा… कोल्हापुरातील खराब रस्त्यावरून राजकारण तापले
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या जेष्ठांच्या यादीत असलेली नेते मंडळी पक्षात उदयाला येणाऱ्या नव्या नेतृत्वाला पक्षाच्या ध्येयधोरण पातळीवर अथवा लोकप्रतिनीधी म्हणून काही स्वतंत्र विचार करायला,निर्णय घ्यायला स्वातंत्र्य देण्याची शक्यता कमीच आहे. यातूच मागे एका कार्यक्रमात आता ज्येष्ठांचे मार्गदर्शन घ्यायचे, निर्णय आपणच घ्यायचे, असे सूचक विधान अजित पवार यांनी केले होते.