महेश सरलष्कर
गेल्या नऊ वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कधीही भ्रष्टाचाराचे आरोप झाले नव्हते. केंद्रातील भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकार धुतल्या तांदळासारखे स्वच्छ होते. मोदी हेच जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते असल्याचे भाजपचे यच्चयावत नेते अभिमानाने सांगत असत. मोदींच्या या कोरीव प्रतिमेला फेब्रुवारीमध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी तडा दिला. अदानी समूहाच्या कथित आर्थिक गैरव्यवहारांवर बोट ठेवून ‘अदानींशी तुमचा संबंध काय’, असा प्रश्न विचारला. आता तर ‘मोदींभोवती असणारे लोक भ्रष्टाचारलोलुप असूनही मोदींना त्याची कोणतीच फिकीर नाही. मोदी आपल्याच दुनियेत मस्त आहेत’, असे थेट शरसंधान साधण्याचे कमालीचे धाडस जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केले आहे. कर्नाटकमधील विधानसभा निवडणूक जेमतेम महिन्यावर आली असताना, तिथे भाजप सरकारचा भ्रष्टाचार हाच कळीचा मुद्दा बनला असताना मोदींच्या प्रतिष्ठेला धक्का देणाऱ्या मलिकांच्या आरोपांत केंद्रातील सत्ता उलथवून टाकण्याची क्षमता आहे.
आता भ्रष्टाचार हाच मुद्दा
दोन लोकसभा निवडणुका तसेच, विविध राज्यांतील विधानसभा निवडणुकांमधील भाजपच्या अभूतपूर्व यशामागे पक्षाची आणि संघाची ताकद असली तरी, मोदी हेच भाजपच्या विजयाचे खरे शिल्पकार होते. कर्नाटकमध्ये देखील बसवराज बोम्मई सरकार भ्रष्टाचाराच्या आरोपांनी पोखरले असताना मोदींचा चेहरा भाजपला वाचवू शकेल असे पक्षाचे नेते बोलून दाखवतात. भाजपसाठी मोदी देव्हाऱ्याप्रमाणे पवित्र आहेत, त्यांना अभद्र गोष्टी शिवू शकत नाहीत, यावर भाजपच्या नेत्यांचा विश्वास आहे. त्यामुळेच अदानी मुद्द्यावरून राहुल गांधींनी मोदींवर भ्रष्टाचाराचे शिंतोडे उडवलेले भाजपला जिव्हारी लागले की, त्यांनी राहुल गांधींना लोकसभेतून बडतर्फ केले. इथे तर सत्यपाल मलिकांनी मोदींविरोधात आरोपांची मालिका उभी केली आहे. भ्रष्टाचारमुक्त कारभार, लोकांचे कल्याण, लोकशाहीवर निष्ठा, राष्ट्रहिताची कळकळ ही सगळी भाजपची व्यवच्छेदक लक्षणे मानली जात होती. त्यांचा मलिकांनी सुमारे एका तासांच्या मुलाखतीत बुरखा फाडला आहे. मलिकांनी भाजपच्या गोटात आणि पंतप्रधानांच्या कार्यालयात खळबळ माजली आहे. समाजमाध्यमांवर मलिकांच्या मुलाखतीने गहजब केला असताना राष्ट्रीय वृत्त वाहिन्यांनी तिची दखलही घेऊ नये, ही बाब पुरेशी बोलकी आहे. मुलाखतीच्या भूकंपाची तीव्रता कमी करण्यासाठी पडद्यामागून कोणत्या हालचाली सुरू असतील याची कल्पना केलेली बरी.
हेही वाचा… भ्रष्टाचाराबद्दल मोदी बेफिकीर!, सत्यपाल मलिकांचा खळबळजनक आरोप
मलीन प्रतिमेचे परिणाम…
कर्नाटकमध्ये ४० टक्के कमिशन खाणारे बोम्मई सरकार, अशी राळ काँग्रेसने उठवली असल्यामुळे स्थानिक प्रश्नांवर निवडणूक न लढवण्याचा निर्णय भाजपने घेतला होता. मोदींच्या झंझावाती प्रचारात गांधी कुटुंबाचा भ्रष्टाचार आणि त्यांचे कथित राष्ट्रद्रोही विचारांवर हल्लाबोल केला की राष्ट्रीय राजकारणातील अनुकूल मुद्द्यांवर कर्नाटकमध्ये भाजप तरून जाईल अशी रणनिती आखली गेली होती. कुठल्याही निवडणुकीत मोदी विरुद्ध राहुल अशी थेट लढत झाली तर फायदा भाजपचा होतो, हे नेहमीचे गणित मांडले गेले होते. पण, मलिकांनी, मोदी भ्रष्टाचाराविरोधात काहीही करत नाही, असा आरोप केल्यामुळे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर मोदींना स्पष्टीकरण देण्याची वेळ आली आहे. मोदी कदाचित लाचखोरी करत नसतील पण, त्यांच्या नावाचा गैरवापर करून मोदींच्या नजिकचे लोक ‘लाभार्थी’ होत असतील तर मोदी त्यांच्या विरोधात कारवाई का करत नाहीत, हा प्रश्न विरोधक विचारतील! अदानीच्या प्रकरणावर मोदींनी चकार शब्द काढलेला नसला तरी इथेही मुद्दा भ्रष्टाचार हाच होता. आर्थिक घोटाळे, भ्रष्टाचार, कर चुकवेगिरीबद्दल अनेक विरोधी पक्षनेत्यांमागे ‘सीबीआय’ आणि ‘ईडी’चा ससेमिरा लावला गेला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही तुरुंगात जातील असे भाजपचे नेते उघडपणे बोलू लागले आहेत. अशावेळी मलिकांचे आरोप मोदींच्या स्वच्छ प्रतिमेला आणि विश्वासार्हतेला धक्का देत आहेत.
पकड ढिली होण्याचा धोका?
भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून मोदींभोवती संशयाचे वातावरण गदड होत गेले तर कर्नाटकमध्ये ते गांधी कुटुंबाच्या भ्रष्टाचाराबद्दल कसे बोलणार? मलिकांच्या आरोपांमुळे भाजपभोवती वादळ घोंगावू लागले असून कर्नाटक भाजपच्या हातून निसटू शकते. मग, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढमध्ये कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागेल याची जाणीव भाजपला झालेली असेल. लोकसभा निवडणुकीसाठी जेमतेम वर्षभर राहिले असताना, कर्नाटकमध्ये भाजपच्या नेत्यांनी केलेली बंडखोरी भाजपच्या पोलादी शिस्तीचा भंग ठरते. गुजरातमध्ये मुख्यमंत्र्यांसह अख्खे मंत्रिमंडळ बदलले गेले, विद्यमान आमदारांना घरी पाठवले गेले. तरीही, कोणी एक चकार शब्द काढला नाही. कर्नाटकने मोदींचे ‘गुजरात प्रारुप’ मोडून काढले असे म्हणता येईल. भाजपमधील बंडखोरीची सुरुवात हिमाचल प्रदेशातून झाली होती. मोदींची उजळ प्रतिमा आणि शहांची करडी नजर यांच्या मिश्रणामुळे पक्षावर दोघांचे पूर्ण नियंत्रण राहिले. कर्नाटकमध्ये बंडखोरांनी त्यांच्या वर्चस्वाला जणू झुगारून दिले आहे. पुढील तीनही विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुकीत बंडखोरीची ही लागण पक्षांतर्गत पसरली तर, ‘सीबीआय’- ‘ईडी’च्या उपयुक्ततेवरही प्रश्नचिन्ह लागेल. मलिकांच्या आरोपांनी मोदी-शहांच्या पक्षांतर्गत वर्चस्वाला धक्का लागला तर भाजपमधील अनेक मोदीविरोधक नवी राजकीय समीकरणे जुळवू लागतील. ‘हिंडनबर्ग रिसर्च’ संस्थेच्या अहवालामुळे अदानीसारखे एखादे प्रकरण ऐरणीवर आले. मोदी-शहांची पक्षांतर्गत पकड ढिली झाली तर कदाचित अनेक प्रकरणे उघडकीस येऊ शकतील. अदानी संदर्भातील वेगवेगळी माहिती संसदेच्या विरोधी खासदारांपर्यंत कुठल्या उद्योग लॉबीने पोहोचवली याचा कानोसा घेता येऊ शकतो.
विरोधकांच्या एकजुटीला वेग
जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिकांच्या आरोपांमध्ये केंद्र सरकार उथवण्याची क्षमता असल्याचे कोणीही नाकारू शकत नाही. मलिकांच्या आरोप विरोधकांच्या एकजुटीसाठी चुंबकाचे काम करू शकतील. विरोधकांच्या महाआघाडीचे प्रयत्न नुकतेच सुरू झाले आहेत, त्यांच्यामधील विसंवाद कमी करण्यास राहुल गांधींची बडतर्फी उपयोगी पडली होती. आता तर मोदींविरोधात ‘स्फोटके’ हाती लागली आहेत. शरद पवारांनी कितीही थोपवून धरण्याचा प्रयत्न केला तरी आता अदानीचे प्रकरण चिघळू शकेल. मलिकांच्या आरोपांवरून काँग्रेसने मोदींविरोधात आघाडी उघडलेली आहे. त्यामध्ये इतरही विरोधी पक्ष हळुहळू सामील होतील. कर्नाटकमध्ये भ्रष्टाचारासंदर्भात मोदींवर झालेले आरोप हा राष्ट्रीय मुद्दाच स्थानिक प्रचाराचा मुद्दा बनेल. मोदींना कर्नाटकमध्ये गांधी कुटुंबाच्या आधारावर निवडणूक लढवणे अवघड जाईल. भ्रष्टाचाराच्या नावाखाली ‘सीबीआय’-‘ईडी’चा जाच विरोधी पक्षनेत्यांना सहन करावा लागला होता. खरेतर विरोधक एकत्र येण्याचा हा समान धागा आहे. पण, आता विरोधकांचे लक्ष्य मोदींच्या वर्तुळातील लोकांच्या, भाजप आणि संघातील नेत्यांच्या भ्रष्टाचारांच्या प्रकरणांवर केंद्रीत झालेले असेल. नितीशकुमारांच्या दिल्लीवारीत विरोधकांच्या एकजुटीचा पहिला टप्पा पार झालेला आहे, मलिकांच्या आरोपांनी बिगरभाजप पक्षांच्या ऐक्याला अधिक वेग येऊ शकेल. सध्या शासन-प्रशासनावरील नियंत्रणामुळे आणि विभक्त विरोधकांमुळे लगेचच मोदी सरकार कोसळेल असे नव्हे पण, मलिकांच्या आरोपांनी पायाखालील वाळू सरकली याची जाणीव भाजपला झालेली आहे.