समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव हे आता २०२४ च्या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. लवकरच ते समाजवादी पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी आणि पक्षाची उत्तर प्रदेश कार्यकारी समित्यांची स्थापना करतील. एवढंच नाही तर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी येत्या काही महिन्यांमध्ये उत्तर प्रदेशातील ७५ जिल्ह्यांमधल्या ८० लोकसभा मतदारसंघांचा दौरा करण्याचा निर्णय घेतला आहे. आपला पक्ष लोकांपर्यंत पुन्हा एकदा नेण्यासाठी अखिलेश यादव यांनी कंबर कसली आहे. २०२४ च्या निवडणुकांच्या दृष्टीने अखिलेश यादव यांनी तयारी सुरू केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समाजवादी पक्षाच्या अंतर्गत वर्तुळात एक चर्चा सुरू आहे की २०१९ च्या तुलनेत अखिलेश यादव यांना २०२४ ला अधिक आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं. बहुजन समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय लोकदल यांच्यासोबत युती करून सपाने फक्त ३७ जागा लढवल्या होत्या. आता उत्तर प्रदेश सरकारचं अर्थसंकल्प अधिवेशन संपल्यानंतर अखिलेश यादव आपला राज्यव्यापी दौरा सुरू करतील अशी माहिती समाजवादी पक्षाच्या सूत्रांनी दिली आहे.

सपाचे प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांनी अशी माहिती दिली आहे की अखिलेश यादव हे लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी म्हणजेच २०२४ पूर्वी उत्तर प्रदेशातील सर्व जिल्हे आणि मतदारसंघ पिंजून काढतील. या ठिकाणी असलेल्या मतदारांशी संवाद साधतील. अखिलेश यादव यांनी काही दिवसांपूर्वीच विविध जिल्ह्यातील तुरुंगांना भेटी दिल्या. तिथे असलेल्या समाजवादी पक्षाच्या काही नेत्यांचीही भेट त्यांनी घेतली. तसंच त्यावेळी लोकांशी संवाद साधत स्थानिक कार्यकर्ते कशा प्रकारे काम करत आहेत याचाही आढावा घेतला.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांना मोठ्या प्रमाणावर लक्ष्य केंद्रीत करावं लागणार आहे. कारण यावेळी अखिलेश यादव यांनी कुठल्याही पक्षाशी युती न करण्याचा निर्णय घेतला आहे. यादवेतर आणि ओबीसी तसंच दलित मतदार, मागास मतदार यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी अखिलेश यादव यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. अखिलेश यादव यांच्या समोरचं हे आव्हान अशासाठी मोठं आहे कारण सध्या पक्षात अखिलेश यादव यांच्याशिवाय इतर कुठलाही असा चेहरा पक्षात नाही जो या सगळ्यांपर्यंत पोहचू शकेल असंही राजकीय जाणकार सांगतात.

समाजवादी पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अखिलेश यादव हे स्वतः कन्नौजमधून लोकसभा निवडणूक लढवू शकतात. जर त्यांची पत्नी डिंपल यादव मैनपुरी मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवू शकतात. २०१९ च्या निवडणुकीत सपाला अवघ्या पाच जागा जिंकता आल्या. यादव कुटुंबातले प्रमुख सदस्य या निवडणुकीत पराभूत झाले होते. तसंच डिंपल यादव यादेखील त्यावेळी पराभूत झाल्या होत्या. अखिलेश यादव यांचे चुलत भाऊ धर्मेंद्र यादव हेदेखील पराभूत झाले होते. तर त्यांचे आणखी एक बंधू अक्षय यादव हे फिरोजाबादमधून पराभूत झाले होते. त्यानंतर बसपाच्या प्रमुख मायावती यांनीही अखिलेश यादव यांच्यासोबत असलेली युती तोडली होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतही सपाला फक्त पाच जागांवर समाधान मानावं लागलं होतं. त्या निवडणुकीत तर सपाने ७८ जागा लढवल्या होत्या. मात्र म्हणावं तसं यश त्या निवडणुकीतही मिळालं नव्हतं. आता गेल्या वर्षी सलग तिसऱ्यांदा सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अखिलेश यादव यांची निवड झाली. मात्र अद्याप पक्षाच्या कार्यकारिणीची आणि राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा झालेली नाही. ती लवकरच केली जाईल अखिलेश यादव हे उत्तर प्रदेश पिंजून काढतील असं सांगितलं जातं आहे. आता या सगळ्याचा सपाला किती फायदा होणार हे येत्या काळात स्पष्ट होऊ शकणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eye on 2024 akhilesh set to kick off up tour to galvanise sp connect with voters scj